रस्ता चुकावयाचे नाना प्रकार झाले

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 September, 2013 - 12:33

ऐकून घे जरासे, सांगून फार झाले !
दुर्लक्षिणे सख्याचे हे कैकवार झाले

कबुलीजबाब माझा शिक्षेस पात्र ठरला
माझ्या मनातुनीही मी हद्दपार झाले

महती सहा ऋतूंची वर्णू नकाच कोणी
माझ्यातही कितीदा हे फेरफार झाले

केव्हातरी अचानक रस्त्यात भेटलेलो
रस्ता चुकावयाचे नाना प्रकार झाले

काळीज लावलेले होते समर्पणाला
पाठीवरी तरीही कित्येक वार झाले

आकाश गाठण्याचा पर्याय फक्त उरला
बाकी नऊ दिशांचे तर बंद दार झाले

नशिबावरी तशीही नव्हतीच भिस्त माझी
जे कनवटीस होते तेही पसार झाले

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महती सहा ऋतूंची वर्णू नकाच कोणी
माझ्यातही कितीदा हे फेरफार झाले

आकाश गाठण्याचा पर्याय फक्त उरला
जेव्हा दिशा-दिशांचे बंदिस्त दार झाले <<<अप्रतिम!

आवडली गझल. Happy

आकाश गाठण्याचा पर्याय फक्त उरला
जेव्हा दिशा-दिशांचे बंदिस्त दार झाले

Happy

'बंदिस्त' हा शब्द बंद ह्या अर्थाने वापरतात की बांधीव ह्या अर्थाने?

काळीज लावलेले होते समर्पणाला
पाठीवरी तरीही कित्येक वार झाले

नशिबावरी तशीही नव्हतीच भिस्त माझी
जे कनवटीस होते तेही पसार झाले<<<

आवडले

कसलीच सुंदर आहे गझल ही!
मी माझ्या डेस्कवर लावणारेय लिहून!
पुन्हा पुन्हा वाचली!
तायडॅ! जियो!!!!!!!

महती सहा ऋतूंची वर्णू नकाच कोणी
माझ्यातही कितीदा हे फेरफार झाले

केव्हातरी अचानक रस्त्यात भेटलेलो
रस्ता चुकावयाचे नाना प्रकार झाले

आकाश गाठण्याचा पर्याय फक्त उरला
जेव्हा दिशा-दिशांचे बंदिस्त दार झाले<<<

सुप्रियाताई, अप्रतिम शेर आहेत हे! सुंदर! Happy

'बंदिस्त' हा शब्द बंद ह्या अर्थाने वापरतात की बांधीव ह्या अर्थाने?

बंदिस्त चा एक अर्थ मोकळा नसलेला, कैद किंवा अडकून पडलेला असा आहे.
बंदिस्त दार चा बंद दार अश्या अर्थाने वापर योग्य वाटत नाही.
दुस-या कोणता अर्थ अपेक्षित असेल तर कल्पना नाही.

नशिबावरी तशीही नव्हतीच भिस्त माझी
जे कनवटीस होते तेही पसार झाले

व्वा.

आकाश गाठण्याचा पर्याय फक्त उरला
जेंव्हा चहूदिशांचे रस्ते फरार झाले

आपण "कुणी"असे म्हणालात म्हणून मी पर्याय दिला .. राग मानू नये Happy

बंदिस्त दार चा बंद दार अश्या अर्थाने वापर योग्य वाटत नाही.
>>
का? म्हणजे वाटा बंद झाल्या, दार बंद झाले असा अर्थ नाही का लागतेय यातुन?
(मलाच हा अर्थ लागला आणि म्हणुनच मला तो शेर जास्त आवडला)

का? म्हणजे वाटा बंद झाल्या, दार बंद झाले असा अर्थ नाही का लागतेय यातुन?
(मलाच हा अर्थ लागला आणि म्हणुनच मला तो शेर जास्त आवडला)

मला का योग्य वाटत नाही, ह्याला काय उत्तर देणार. वैयक्तिक मत अशी सूट घेतो.
आपल्याला योग्य अर्थ लागला आणि त्यामुळेच शेर जास्त आवडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

इथे एकूणच प्रामाणिक मत द्यायचे म्हणजे कवी-कवियित्रींच्या सग्यासोय-यांच्या तोफेला तोंड देण्यासारखे आहे.
ह्यापुढे आवडली की नाही आवडली इतकेच लिहीन.

धन्यवाद.

आकाश गाठण्याचा पर्याय फक्त उरला
जेव्हा दिशा-दिशांचे बंदिस्त दार झाले

हाच शेर (खयाल) आवडला मलाही. बंदिस्त = बंद नाही, हे बरोबर आहे.
'जेव्हा न मज दिशांचे उपलब्ध दार झाले' असा काहीतरी बदल करता येईल.

-------------------------------------------------------------------

इथे एकूणच प्रामाणिक मत द्यायचे म्हणजे कवी-कवियित्रींच्या सग्यासोय-यांना तोंड देण्यासारखे आहे.

सहमत आहे.
तुमचे 'सगे' वेगळे असल्याने तुम्हाला आता लक्षात आले असेल.

सहमत आहे.
तुमचे 'सगे' वेगळे असल्याने तुम्हाला आता लक्षात आले असेल.<<<<<< Uhoh .. Wink

जेव्हा न मज दिशांचे उपलब्ध दार झाले'<<<< मस्तच

जेव्हा दिशादिशांचे बंदिस्त दार झाले<<<

हा शेर टेक्निकली चुकलेला आहे. दिशांची दारे बंदिस्त झाली तर आकाश (आकाशाची दिशा) गाठण्याचाही पर्याय उरू शकणार नाही.

पण बंदिस्त हा शब्द बांधीव या अर्थाने अजिबात वापरत नाहीत, निदान माझ्या अनुभवात तरी!

पुढील चर्चा निव्वळ राजकीय व 'अगझल' चर्चा आहे.

'बाकी नऊ दिशांचे बंदिस्त दार झाले' हे बहुधा चालावे!

इट्स रिअली अमेझिंग दॅट पीपल आर डिस्कसिंग टू सच अ‍ॅन एक्स्टेंट! ग्लॅड टू नो!

हे खरे आहे की बंदिस्त दार म्हणजे बंद दार नाही.

तेव्हा,

आकाश गाठण्याचा पर्याय फक्त उरला
बाकी नऊ दिशांचे तर बंद दार झाले

असे करता यावे!

थोडक्यात, बंदिस्त हा शब्द अनाठायी आहे, पण विरुद्धार्थी किंवा भलत्याच अर्थी नाही.

चुभुद्याघ्या

Pages