पिंक-कलर्ड रुईया फाईल

Submitted by ललिता-प्रीति on 31 August, 2013 - 04:13

"दुसरं काहीतरी लिही," मॅडमनी सांगितलंय.
का म्हणून?
उद्या म्हणाल....उद्या म्हणाल....काय बरं?
आर्याला योग्य उपमाच सुचेना. उद्याचं परवावर जायला लागलं. तिनं हातातली डायरी खाटकन बंद करून टाकली. डाव्या हातानं स्वतःलाच एक टप्पल मारून घेतली. अशी डाव्या हाताची टप्पल बसली, की समजावं, काहीतरी बिनसलंय. बिनसलं, की पहिली तिला आठवते अर्पिता; आणि मग श्वेता. अर्पिताच्या तुलनेत श्वेता हे तसं ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. केवळ आर्या सांगतेय, म्हणून श्वेता तिचं ऐकते, तिनं लिहिलेलं वाचते, तिच्याशी चर्चा करते, गप्पा मारते; आर्याला तरी काय, तेवढंच हवं असतं; कारण "अशा चर्चेतूनच काहीतरी क्लू मिळतो" हे मॅडमचं म्हणणं तिला पुरेपूर पटतं. तिला मॅडमचं सगळंच पटतं, नेहमीच आणि अर्पिताला तेच आवडत नाही.
"फार मॅडम, मॅडम करत असतेस तू, स्वतः स्वतःचं काही आहे, की नाही तुला?" अर्पिताची नाराजी नेहमी या वाक्याचं बोट धरूनच अवतरते.
"मग काय तुझ्यामागे ताई, ताई करू?" अर्पिताला त्यात प्रॉब्लेम काय वाटतो तेच आर्याला कळत नाही कधी.
"पण दुसर्‍याच्या नावाचा जप हवा कशाला?"
"सगळे तुझ्यासारखे स्वयंभू नसतात, म्हणून."
अर्पिता जे काय काय बोलते, करते, त्याला आर्यानं ‘स्वयंभूपणा’ असं नाव दिलेलं आहे. तिला त्या स्वयंभूपणाचं कौतुक वाटतं, आदर वाटतो आणि असूयापण. तो स्वयंभूपणा, कितीही प्रयत्‍न केले तरी, आपल्या स्वभावात येणं शक्य नाहीय हे तिला पक्कं माहित आहे. पण मग त्यामुळे अर्पितासमोर बर्‍याचदा दबून वागावं लागतं तिला, नाही म्हटलं तरी. तिनं मागे एकदा हे सगळं चक्क मॅडमनाही सांगून पाहिलं होतं; श्वेतानंच तिला तसं सुचवलं होतं. खरं म्हणजे, तेव्हा श्वेतानं तिला मॅडमवर "छू" केलेलं होतं, पण तिला ती कल्पना भलतीच आवडली की! श्वेता नसती, तर आपलं काय झालं असतं - असंही तिच्या मनात येऊन गेलं. मॅडमनी तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि नेहमीप्रमाणे - तिच्या म्हणण्यानुसार, उच्च भाषेत - तिची समजूत काढली, की मुळात आपला स्वभाव त्यातल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वतःलाच आधी आवडायला हवा; परिस्थितीनुरूप त्यात थोडेफार बदल घडत असतातच; पण तरी, इतरांशी वारंवार तुलना करून त्याची अस्सलता घालवू नये, स्वतःला कमी लेखू नये, पण त्याचवेळेस स्वतःशी प्रामाणिकही रहावं.
मग, ती यावेळीही स्वतःशी प्रामाणिकच राहिलीय की... मग तरी मॅडम "दुसरं काहीतरी लिही" असं का म्हणाल्या तेच तिला कळत नाहीये.
हे म्हणजे...हे म्हणजे...
"बंदुकीतून सुटलेली गोळी परत घेण्यासारखं झालं!"
मगाचची ती परवावर गेलेली उपमा तिला आत्ता इतक्या वेळानं आठवली. हातातल्या बंदूकीतून गोळी झाडणार्‍या आणि ती लगेच परत घेणार्‍या मॅडम तिच्या नजरेसमोर उभ्या राहिल्या. तिला हसूच आलं त्या कल्पनेनं. मॅडमचा पुरता रजनीकांतच करून टाकला की आपण, तिला वाटलं. पण तिच्या दृष्टीनं रजनीकांतच्याही वर मॅडमचाच नंबर लागतो. आजवर त्यांचा प्रत्येक शब्द तिनं झेललाय, त्या सांगतील ती पूर्व दिशा मानलीय. मात्र हे सगळं अर्पिताला ती पटवून देऊ शकत नाही. गोळी परत घेण्याहूनही महाकठीण काम आहे ते. बरं, एकंदरच ‘मॅडम’ या मुद्द्यावरून अर्पिताच्या वाटेला मुळीच न जाण्याचाही ती अनेकदा विचार करते; दरवेळी तो प्रत्यक्षात उतरतोच असं नाही. यावेळेला मात्र तो उतरवायचाच हे तिनं ठरवून टाकलेलं आहे; पण ते ही तिच्या हातात असेलच असं नाही.

----------

अर्पिताला काहीतरी कुणकूण लागलेली आहेच. त्यामुळे ती पूर्ण तयारीनिशी आर्याची वाटच पाहतेय. त्यादिवशी तिनंच तर आर्याला वाटेत मॅडमच्या घरापाशी सोडलं होतं. आर्याची मॅडमकडे फेरी झाली, की पुढल्या काही दिवसांत ती अर्पिताचं डोकं खायला येतेच येते. मग तिचा प्रत्येक मुद्दा खोडून काढायचा आपला जन्मसिध्द हक्क बजावताना अर्पिताला जाम म्हणजे जाम मजा येते.
"जा म म जा", पॅलिण्ड्रोम, तिच्या मेंदूनं उगीचच एक निरिक्षण नोंदवलं. भौतिक. भौतिक तर भौतिक. पण आर्या तर नेहमी आधिभौतिकातलंच काहीतरी बोलत असते. म्हणजे ती जे काय काय बोलते, करते, त्याला अर्पितानं तरी ‘आधिभौतिक’ असं नाव दिलेलं आहे. तिचं म्हणणं असं असतं, की आर्यानं आधी भौतिक बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे; नुसतं वैचारिक, तात्त्विक, आदर्श बोलून, लिहून रात्रीची शांत झोप मिळत नाही. म्हणजे मिळते; म्हणजे येते; झोप येते. आर्याची ‘आधिभौतिक’ बडबड सुरू झाली, की अर्पिताला आधी कंटाळा येतो; आणि मग तिचे मुद्दे खोडून काढायचा उत्साह संपला, की झोप येते. पण, "ताई, तुझ्याशिवाय मला कोण आहे गं बोलायला?" हे आर्जव त्या झोपेला परतवूनही लावतं.
यावेळचं आर्याचं हे जे ‘बोलणं’ आहे, त्याची आडूनआडून प्रस्तावना त्या दिवशी अ‍ॅक्टिव्हावर मागे बसल्या बसल्या करून झालेलीच आहे. ट्रॅफिक आणि चेहर्‍याला गुंडाळलेला रुमाल या दोन्हीचं निमित्त करून तेव्हा अर्पितानं त्यावर फार काही टिप्पणी करण्याचं टाळलं. पण त्याचा वचपा येत्या काही दिवसांत निघेल हे तेव्हाच तिच्या लक्षात आलेलं होतं.
यावेळेला तिनं सणकून विचार करून ठेवलेला आहे; आर्याची-जवळपास-कान‌उघडणीच करण्याचं ठरवलेलं आहे. उगीच कुठलीतरी, काहीतरी, बारीकशी घटना पाहिली, वाचली, ऐकली, की लगेच सरसावून त्यावर आधारित एक कथा पाडण्याची आर्याची ही जी सवय आहे, ती अर्पिताला पसंत नाहीय, मुळीच; आणि तिला ही सवय मॅडममुळेच लागली असं तिचं ठाम मत आहे. तिच्या मनात मॅडमबद्दल नाराजी आहे, ती मुख्यत्त्वे याच कारणामुळे. कोणे एके काळी कॉलेजच्या विशेषांकात आर्यानं एक-दोन लेख काय लिहिले, मॅडमनी तिला लगेच आपल्या पंखांखालीच घेतलं. तिचं इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं, की तिला वाटायला लागलं - वाट्टेल तो विषय असू दे, त्यावर आपण काहीही लिहू शकतो! या विचारानं तिचा हळूहळू ताबाच घेतला. डोक्यात एखादी कल्पना नुसती फडफडून जरी गेली, तरी लगेच तिला मॅडमशी ‘डिस्कशन’चे वेध लागायचे. सुरूवातीला "मॅडमकडे जरा काम आहे" असं सांगून जाणारी आर्या, नंतर नंतर "डिस्कशनला चाललेय" इतकंच सांगून बाहेर पडायची. तेव्हापासून शेपूची भाजी, कांद्याची आमटी, राजकुमारचा अभिनय आणि रीमिक्स गाणी, यांच्यासोबत ‘डिस्कशन’ हा शब्दही अर्पिताच्या नावडत्या गोष्टींच्या यादीत जाऊन बसलेला आहे. लेख म्हणू नका, ललित म्हणू नका, कथा म्हणू नका, पहावं तेव्हा आर्या काहीतरी लिहीत बसलेली असायची, नाहीतर मॅडमशी फोनवर बोलत बसलेली असायची. त्यांच्याच ओळखीनं कुठल्याशा मासिकात, एक-दोन स्थानिक वर्तमानपत्रांत तिचे लेख प्रकाशित झाले. तुरळक पत्रं आली. मूठभर फोन आले. अर्पिताला त्या सगळ्याचं कौतुक होतं, नाही असं नाही, पण नंतर नंतर सगळं अति व्हायला लागलं; तिला. मध्यंतरी काही वर्षं यात जऽरा खंड पडला होता. अर्पिताला वाटलं, आर्याच्या डोक्यावरचं ते लिखाणाचं भूत उतरलंय. पण कसलं काय, रिकामा वेळ खायला लागला, म्हणताना आर्याचं पुन्हा सुरू झालं. दरम्यान मॅडमही कॉलेजच्या नोकरीतून निवृत्त झालेल्या होत्या. त्यांच्यापाशीही वेळच वेळ होता. शिवाय, आर्यानं आता स्वतःच स्वतःची बढती करून घेतलेली होती. लेख-बिख काही नाही, ती आता फक्‍त कथाप्रकारच हाताळणार होती; "कथेच्या बांधेसूद घाटात आणि मर्यादित अवकाशात वाचकांना अमर्याद मुशाफिरी घडवणार होती."
त्याच अमर्याद की काय मुशाफिरीच्या एका नव्या स्टेशनात आर्या-एक्सप्रेसनं नुकताच नांगर टाकलेला आहे. त्या स्टेशनाचं नाव आहे : पिंक-कलर्ड रुईया फाईल!
"काय?" विषय ऐकूनच अर्पिताला झीट आली. "हे कुठून उगवलं तुझ्या डोक्यात?"
आर्याला हा प्रश्‍न अपेक्षितच होता. त्यामुळे त्यावरचं तिचं उत्तरंही तयार होतं. "उगवलेलं नाही, पाहिलंय मी, प्रत्यक्ष."
"काय पाहिलंय? कुठे?"
"गेल्या महिन्यात अविच्या कलिगच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो होतो ना आम्ही, त्यादिवशी ट्रेनमधे..."
"ट्रेनमधे पिंक-कलर्ड रुईया फाईल पाहिलीस? बरं, मग?" अर्पिता जराशी बुचकळ्यातच पडली होती.
"फाईल नाही पाहिली, फाईलबद्दल लिहिलेली एक चिठ्ठी चिकटवली होती डब्यात, ती पाहिली."
".........."
"ताई, इतकी गर्दी होती डब्यात, पण माझ्याखेरीज कुणाचंही लक्ष गेलं नाही त्या चिठ्ठीकडे. कुणाचीतरी रुईया कॉलेजची फाईल हरवली होती. सर्टिफिकेटस्‌ची. सापडली तर या-या नंबरवर संपर्क साधा असं लिहिलेलं होतं, खाली एक मोबाईल नंबर दिलेला होता. हातानं लिहिलेली एवढीशी वीतभर चिठ्ठी होती."
"बरं, मग?"
"मग मी विचार करायला लागले, की जिची फाईल हरवलीय, तिला ते कळल्यावर काय झालं असेल! त्यात तिची प्रॅक्टिकल्स्‌ची शीटस्‌ असू शकतात, इतर काही महत्त्वाची कागदपत्रं असू शकतात. तिच्या घरात केवढा गोंधळ उडाला असेल त्यावरून, आई-वडिलांची बोलणी खावी लागली असतील तिला, कॉलेजमधेही ग्रेडस्‌ घसरल्या असतील. तिच्या मित्र-मैत्रिणींच्यात त्यावरून काय काय संवाद झाले असतील, ती फाईल शोधण्यासाठी त्यांनी तिला काय-काय उपाय सुचवले असतील..."
"आणि मग तू त्यावरून एक कथा लिहिलीस," आर्याचं वाक्य अर्धवट तोडत अर्पिता म्हणाली. एव्हाना कंटाळा कोपर्‍यावरच्या एटीएमपाशी बसमधून उतरलेला होताच.
"हो," आर्या तिच्याकडे कौतुकानं पाहत म्हणाली.
"आणि ती परवा मॅडमना वाचायला दिलीस..."
"हो, म्हणजे नाही," आर्या गडबडत म्हणाली. ती आली तेव्हापासूनच हे ‘हो, म्हणजे नाही’ अर्पिताला जाणवलेलं होतं. "म्हणजे, परवा त्यांना वाचायला एक कथा दिली मी, पण ती ही नाही," आर्या पुढे म्हणाली. तिनं जो रस्ता अर्पितासाठी बंद करून टाकायचा ठरवला होता, त्याचा विषय निघालाच शेवटी!
तिला नुसतं ‘हो’ म्हणून गप्प बसणं शक्य होतं. पण अर्पिताशी बेमालूम, जेवढ्यास तेवढं बोलायला तिला जमतच नाही कधी.
"ही गेल्या महिन्यातच दिली होती. मला आधी त्याबद्दलच बोलायचंय," ती म्हणाली.
आधी?? एकाच वेळी दोन दोन स्टेशनांत गाडी गाठण्याच्या कल्पनेनं अर्पिताला कसंसंच झालं. "त्यानंतर परवाच्या कथेबद्दल बोलणारेस?" तिनं विचारलं.
"माहित नाही."
"म्हणजे?"
"म्हणजे, त्या कथेबद्दल तुझ्याशी डिस्कस करायचं, की नाही, ते अजून ठरवलेलं नाही मी," आर्या त्यावर पुटपुटत म्हणाली आणि ‘नो एण्ट्री’ची पाटी लावण्याची दुसरी संधीही तिनं हातची घालवली.
"वा! म्हणजे इतर वेळी आधी ठरवून मग पिडतेस का मला?"
"ऐक की गं, ताई..."
"बरं, बोल..."
"मी कल्पनाशक्‍ती लढवून त्या पिंक कलर्ड फाईलवर आधारित एक मस्त कथा लिहिली; विनोदी, गंभीर, अशा सगळ्या छटा असलेली; आणि मॅडमना दाखवली. प्रथमच इतकी मोठी, लांबलचक आणि सविस्तर कथा लिहिली होती मी."
"त्यांना ती आवडलीच असणार. तू त्यांना बाराखडी जरी लिहून दिलीस, तरी त्या ‘कित्ती सुरेख लिहिलंयऽऽ’ म्हणून कौतुक करतील," अर्पिता तोंड वेंगाडत म्हणाली.
"नाही आवडली," आर्याच्या आवाजात गुन्ह्याची कबुली देतानाचा खजील सूर होता.
तिनं सांगितलं, की मॅडमना मूळ कल्पना आवडली होती, पण कथाविस्तार त्यांना विशेष भावला नव्हता. त्यांचा मुख्य मुद्दा असा होता, की ती अनुभवाधारित कथा नव्हती. त्यामुळे त्यात अस्सलता येत नव्हती, म्हणावी तितकी. तिला त्यांचं हे म्हणणं पटलेलं दिसत नव्हतं. तिच्या मते, अशामुळे लिहिणार्‍याच्या कल्पनाशक्‍तीचा अवमान होतो.
‘अपमान’ नाही, बरं का, ‘अवमान’.
मॅडमनी तिला सुचवलं, की अशी काहीतरी घटना कानावर येते, मग त्यावर कथा लिहिण्याच्या दृष्टीनं आपण विचार करतो; त्यादरम्यान ज्या-ज्या वैचारिक आवर्तनांतून आपल्या मनाचा प्रवास घडतो, त्यालाच तू शब्दबध्द कर.
बापरे!
"पण वाचकांना प्रत्यक्ष घटनांमधे इण्टरेस्ट असतो ना," तिनं आपले हरकतीचे मुद्दे मांडायला सुरूवात केली. "त्यांना त्या फाईलचा प्रवास वाचायचाय, किंवा त्या फाईलविना त्या मुलीची जी घालमेल झाली असेल, जो काही गहजब उडाला असेल, त्याबद्दल वाचायचंय किंवा सुखांत करायचा झाला, तर त्या मुलीला अखेर ती फाईल परत मिळते असं वाचायला त्यांना आवडेल. वाचकांना काय वाचायला आवडतं, ते आधी पहायला नको का?"
"एक मिनिट!"
".........."
"एका मुलीच्याच हातून ती फाईल हरवली असेल असं कशावरून ठरवून टाकलंस तू? मुलीच कायम असला वेंधळेपणा करतात हे जे सतत डिपिक्ट केलं जातं, ते मला बिलकुल आवडत नाही," अर्पिता तावातावानं म्हणाली.
"लेडीज डब्यात सूचना लावली होती, म्हणजे कुणीतरी मुलगीच असणार, ना?"
"असंच काही नाही, तिच्या भावाच्या किंवा वडिलांच्या हातूनही ती हरवलेली असू शकते..."
"च्च्‌! फाईल हरवणारी व्यक्‍ती स्त्री आहे, की पुरूष, हे महत्त्वाचं नाहीये, गं!" चर्चेला निराळा फाटा फुटल्यामुळे आर्याची थोडीशी चिडचिड झाली.
"नाही कसं?" अर्पिता ठासून म्हणाली. "कर्ता स्त्रीलिंगी आहे, की पुल्लिंगी, त्यानुसार पुढच्या क्रिया चालणार; घटनाक्रम त्यानुसार बदलणार."
"हो, बरोबर; पण तो मुद्दा आत्ता याक्षणी दुय्यम आहे."
"‘मॅडम काय म्हणाल्या’ हा एक मुद्दा सोडून तुझ्या दृष्टीनं अन्य सगळेच मुद्दे दुय्यम असतात," अर्पिताची एक नेहमीची टिप्पणी आली.
आर्यानं त्याकडे दुर्लक्ष करून पुढे बोलायला सुरूवात केली. तिनं सांगितलं, की मॅडमना तिचं लिखाण वरवरचं वाटत होतं. त्यापेक्षा एखादी सविस्तर, अनुभवाधारित कथा लिहावी असं त्यांनी तिला सुचवलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिनं तो प्रसंग अनुभवलेला नव्हता, ऐकलेला नव्हता, कुठे आसपास घडतानाही पाहिलेला नव्हता, मग ती त्यावर कसं आणि कितीसं लिहिणार? आपल्या कल्पनाशक्तीचा ती वापर करेल, पण been there, done that हा भाव, जो शब्दांशब्दांत उतरायला हवा, तो कसा उतरणार?
लहान मुलं एकमेकांच्या तक्रारी सांगताना ज्या सुरात बोलतात, तशा सुरात आर्या बोलत होती.
अर्पिताला मात्र तिचं बोलणं ऐकून एकदम "युरेका" असं ओरडावंसं वाटलं. आर्याचं लिखाण, मॅडमनी केलेलं त्याचं कौतुक या सगळ्यात आपल्याला रस का वाटत नाही, कंटाळा का येतो, यावर ती अनेकदा विचार करायची. त्याचं कारण तिला आत्ता समजलं. फक्‍त आजवर अशा शब्दांत तिला ते स्वतःलाही सांगता आलेलं नव्हतं.
प्रथमच, अगदी प्रथमच, मॅडमकडे ती एका निराळ्या दृष्टीकोनातून पहायला लागली.
"पण मग, याच कल्पनेवर कथा लिहावी हे जे मला मनापासून वाटलंय, त्याच्याशी कसं प्रामाणिक राहणार मी?" आर्या सांगत होती, "आणि पायाभरणीच प्रतारणेची झाली, तर मग त्यावर कळस तर विश्वासघाताचाच चढणार ना!"
"प्रतारणा आणि विश्वासघाताचा संबंध कुठे आला इथे?" अर्पितानं गोंधळून जाऊन विचारलं. निराळ्या दृष्टीकोनाच्या गल्लीत शिरल्या शिरल्या लगेच अबाऊट-टर्न करण्याची तिची इच्छा नव्हती.
"त्याच नेहमी म्हणत असतात, की स्वतःशी प्रामाणिक रहायला हवं. हे म्हणजे, ‘लोकां सांगे ब्रम्‍हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ असं झालं," आर्या एकदम बोलून गेली. प्रथमच, अगदी प्रथमच, तिच्या तोंडून मॅडमच्या विरोधातले शब्द बाहेर पडले होते.
तिच्या ते लक्षात आलं आणि तिनं आपली जीभ चावली;
अर्पिताच्या ते लक्षात आलं आणि ती त्या निराळ्या दृष्टीकोनाच्या गल्लीत अधिकच आत आत जात राहिली.

----------

शाळा संपली आणि आर्या मुंबईत आली इतकं श्वेताला माहित होतं. कॉलेज झालं. मग नोकरीसाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा, हे झालं. त्याच जगदीशानं भाळी ज्याचं नाव लिहिलं होतं, त्याचे हात क्र. ३ आणि ४ मिळाले, मग त्या चार हातांनी मिळून अजून दोन हातांची निर्मिती केली. हे ही सगळं श्वेताला माहित होतं. तिची आणि आर्याची नवनिर्मिती एकाच प्ले-स्कूलमधे जात होती, तेव्हापासूनची त्यांची ओळख होती. त्या ओळखीचं ‘मैत्री’ म्हणून बारसं होईस्तोवर ती नवनिर्मिती पहिली-दुसरीत गेलेली होती.
आता नवनिर्मितीला शिंगं फुटण्याचे दिवस येऊन ठेपले होते. खरं म्हणजे आता त्यांच्यातला चर्चेचा ‘हॉट टॉपिक’ शिंगांचाच असायला हवा होता.
पण त्याऐवजी श्वेताला आज निराळंच काहीतरी कळत होतं, प्रथमच, नव्यानेच.
ती पहिल्या चेंडूवर क्लीन-बोल्ड झाल्यासारखी किंवा पहिल्या अर्ध्या मिनिटातच प्रतिस्पर्ध्यांकडून दोन गोल चढवले गेल्यासारखी उभी होती. आळीपाळीनं एकदा हातातल्या कागदांकडे आणि एकदा आर्याकडे पाहत होती.
"एऽऽ, इतका काही शॉक वगैरे वाटून घेऊ नकोस, खूप जुनी झाली आता ती घटना," आर्या तिचा हात धरून तिला हलवत म्हणाली.
"घटना जुनी असली, तरी शॉक ताजा आहे, कळलं ना?"
इतकी वर्षं ताकास तूर लागू न देणार्‍या आर्यानं आताच हा विषय का काढला, असा श्वेताला प्रश्न पडला होता. खरं म्हणजे, आर्याचे वडील अपघातात गेलेले होते हे श्वेताला माहित होतंच. त्यामुळे ताकास तूर नाही, पण मूग तरी लागलेलाच होता. आता, असं कळलं, तरी त्या अपघाताचं वर्णन तिखट-मीठ लावून कुणी सांगतही नाही आणि ऐकत तर त्याहून नाही. त्यामुळे अपघात म्हणजे कसा, कुठे, कधी याची श्वेतानं कधीच चौकशी केली नव्हती.
"कधी"ची केली होती म्हणा; त्याचं उत्तर होतं, आर्या शाळेत असतानाच. आणि एवढी माहिती पुरेशी होती.
"मला इतक्या वर्षांत काहीच कसं नाही सांगितलंस?" श्वेतानं विचारलं. अजूनही तिचा आवाज ‘शॉक्ड्‌ इन ऑ’च होता.
"कधी विषयच नाही निघाला."
"हो, ते ही खरंच..." श्वेता गुळमुळीतपणे म्हणाली. तिला कळत नव्हतं, की इतक्या वर्षांत कधीच खोदून चौकशी केली नाही हे आपण चूक केलं, की बरोबर.
"पण अनुभवाधारित कथा लिहिण्याचा विषय निघाल्यावर मला हेच आठवलं आधी," आर्यानं साधं-सरळ विधान केलं, प्रांजळपणे.
श्वेता ते ऐकून बुचकळ्यात पडली. "असा विषय कधी निघाला होता??" तिनं विचारलं.
"आपला नाही गं, माझा आणि मॅडमचा निघाला होता."
"मॅडम म्हणाल्या म्हणून तू हे लिहिलंस?? त्यांना माहित होतं हे?"
आर्यानं मॅडमना सांगितलं, पण आपल्याला मात्र अंधारात ठेवलं, याचा श्वेताच्या आवाजात विषाद डोकावला.
"नाही, त्यांनाही हे वाचल्यावरच कळलं सविस्तर," आर्या त्यावर उत्तरली.
विषादाचा त्वरित हकालछकडाही झाला.
"पण त्या अजून मला पुढे काही बोललेल्या नाहीयेत. मला सांग, कशी झालीय कथा? त्यांना आवडली असेल का?" आर्यानं अजिजीनं विचारलं.
श्वेता आणि आर्याचा हात सुटतो तो या प्रश्नापाशी. श्वेताला हे असलं लांबलचक गद्य वाचायचा महाभयंकर कंटाळा येतो. तिला फक्‍त कविता वाचायला आवडतात. पण केवळ आर्याला बरं वाटावं म्हणून ती तिनं लिहिलेलं सगळं अगदी इमानदारीत वाचते;
आवडलं अथवा नाही याचा प्रश्नच नसतो.
आर्याच्या प्रश्नाला बगल देत तिनं विचारलं, "अर्पितानं वाचली? ती काय म्हणाली?"
"ताईला अजून मी दिलेली नाहीय वाचायला. मला भीतीच वाटतेय. ती यावर कशी रिअ‍ॅक्ट होईल काही सांगता येत नाही."
"!!!!!!!!!!"
आर्यानं स्पष्ट केलं, की आधी तो अपघात, घरात उडालेला करूण गोंधळ, मग त्यानंतरची महिन्याभराची अनिश्चितता यातल्या कशाबद्दलही अर्पिताला चर्चा केलेली कधीच आवडली नाही. तेव्हाही तिनं भिंतीवर लावलेला बाबांचा फोटो सहा-एक महिन्यांतच काढायला लावला होता; स्पष्टपणे सांगून, की बाबा आपल्या गप्पांमधे, आठवणींमधे, घरातल्या फोटो-अल्बम्स्‌मधे जिवंत असताना भिंतीवरच्या त्या फोटोला गंधाचा टिळा, हार हा विरोधाभास कशाला? आईनं त्यावेळी तिचं इतक्या निमूटपणे कसं काय ऐकलं याचं आर्याला आजही आश्चर्य वाटतं. तो कपाटात दडपलेला फोटो थेट अर्पिताच्या लग्नानंतरच पुन्हा बाहेर निघाला. लग्नाच्या वेळीही अर्पितानं सर्वांना दम भरला होता, की उगीच बाबांच्या आठवणी काढून अश्रू ढाळत बसायचं नाही, आठवण तर निघणारच, पण ती आनंदानं काढा.
"मला खासकरून तेव्हाचा हे ऐकल्यावरचा माझ्या आजीचा चेहराच आठवतो," आर्या हसत म्हणाली. "आजीची भलतीच पंचाईत करून ठेवली होती ताईनं. नाहीतर आमची आजी म्हणजे ठुस्स झालं, की डोळ्यांना पदर लावणारी. बाबाही तिची यावरून सारखी चेष्टा करायचे."
".........."
"कसं कोण जाणे, पण सगळ्यांनी ऐकलं तेव्हा ताईचं! तर थोडक्यात हे कारण आहे, तिला अजून वाचायला न देण्याचं."
श्वेता काही बोलली नाही. काय बोलणार? अनुभवाधारित कथा वगैरे मरू दे, तिला या नव्याने समोर आलेल्या गोष्टीच आता काही दिवस पुरणार होत्या. त्या नादात, या वेळी आर्याला "छू" करण्याचा विचारही आपल्या डोक्यात आला नाही, हे देखील तिला जाणवलं नाही.

----------

श्वेतानं "छू" केलेलं नसलं, तरी आर्यानं मॅडमनाही आपली कथा वाचायला दिलेली होतीच. त्यांना ते वाचून श्वेताप्रमाणेच बर्‍यापैकी धक्का वगैरे बसला. पुढचे ८-१५ दिवस त्या तिला काहीच बोलल्या नाहीत. मग मात्र एक दिवस त्यांनी आपणहून तिला घरी बोलावून घेतलं आणि सरळ तिला प्रश्न केला, "मला एक सांग, आर्या, तुला अलिप्‍तपणे सगळं मांडायचंय, की वाचकांची सहानुभूती मिळवण्यासाठी तू हे करते आहेस?"
".........."
"नाही, शेवटी तू ‘सत्य घटनेवर आधारित’ असं लिहिलंयस, म्हणून विचारलं."
"मग तसं नको का लिहू?"
"तेच म्हणतेय मी. तुझं आधी नक्की ठरू दे, की तुला यातून काय अभिप्रेत आहे, मग आपण पुढे बोलू."
"मला...मला अनुभवाधारित कथा लिहिणं अभिप्रेत आहे," आर्यानं चाचरत उत्तर दिलं. तिला मॅडमच्या बोलण्याचा रोख आवडला नव्हता किंवा कळला नव्हता किंवा पटला नव्हता, एक काहीतरी.
"आर्या, जरा स्पष्ट बोललं तर चालेल ना?" आपलं म्हणणं जरासं निराळ्या पध्दतीनं मांडण्याचा विचार करत मॅडमनी विचारलं.
".........."
"हाताचा धक्का लागून देवासमोरचं निरांजन तुझ्या बाबांच्या अंगावर पडलं किंवा तोल जाऊन ते डोक्यावर पडले तेव्हा तू तिथे होतीस?"
"नाही, बाबा तेव्हा एकटेच होते घरात. मी...मी लिहिलंय की तसं. आम्ही दोघी सुट्टी होती म्हणून मामाकडे गेलो होतो आणि आई काहीतरी निरोप सांगायला शेजारी गेली होती."
"मग मला सांग, ही अनुभवाधारित कथा कशी काय होते?"
"???????"
मॅडमनी तिला सांगितलं, की तिची ही कथाही त्या पिंक कलर्ड फाईलप्रमाणेच होत होती, वरवरची! ते ऐकून आर्याला धक्काच बसला. तिला कळेच ना, की मॅडमना तिच्याकडून नक्की अपेक्षा तरी कशा प्रकारच्या लिखाणाची होती. मॅडम पुढे सांगत होत्या, फाईल हरवणं हा देखील एक अपघातच, त्या मुलीच्या दृष्टीकोनातून. अगदी अचानक, अनपेक्षितपणे ती फाईल हरवते; त्या मुलीला जेव्हा ते कळतं, तेव्हा तिला धक्का बसतो, तिच्या सुरळीत आयुष्यात हाहाःकार माजतो, कारण तो गोंधळ निस्तरणं तिला खूप जड जाणार असतं---म्हणजे तसं आर्यानंच त्यात दर्शवलेलं होतं. तिनं ती कथा लिहिताना, त्या फाईलमधली सर्टिफिकेटस्‌ आपांपसांत बोलतात, त्यावर ती पिंक कलर्ड फाईल त्यांना गप्प करू पाहते, त्या निष्काळजी मुलीला चांगली अद्दल घडायला हवी अशी इच्छा व्यक्त करते आणि त्यातून कथा उलगडत जाते, असा रुपकात्मक बाज वापरला होता.
"त्याच रूपकाला तू या कथेत सामावून घे," मॅडमनी सुचवलं, "प्रत्यक्ष अपघातापेक्षा नंतर तुझ्या उपस्थितीत काय काय घडलं, तुझ्या मनात कुठले विचारतरंग उठले, पुढे परिस्थिती कशी कशी बदलत गेली, आज तुला त्याबद्दल काय वाटतं, या सगळ्याला सामावून घे. आणि ते करण्यासाठी तुला आधी हे ठरवावं लागेल, की तुला ही कथा कशासाठी लिहायची आहे; निव्वळ तेव्हाची तुमची दारूण परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी, की अलिप्तपणे एका कुटुंबाची कथा मांडण्यासाठी..."
त्या पिंक कलर्ड फाईलच्या मुळीच न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या घटनेच्या संदर्भात जर संबंधित सर्वांना काय वाटलं असेल याचा तिनं विचार केला होता, मुळात संबंधित कोण कोण असावेत हे देखील ‘विचारपूर्वक’ ठरवलं होतं, तर मग या कथेच्या बाबतीत तर सहज उपलब्ध अशा दृष्टीकोन-वैविध्याचा कथानकात उपयोग करून घ्यायलाच हवा असं मॅडमना मनापासून वाटत होतं. त्यानंतरची पायरी म्हणजे फाईलच्या रूपकाचा कथेत उपयोग करून घेणे.
हे ऐकून ती विचारात पडली. ‘दृष्टीकोन-वैविध्य’, म्हणजे मुख्यत्त्वे आई आणि ताई. आईशी ती या विषयावरून वाटेल तेव्हा आणि वाटेल तितकं बोलू शकणार होती. खरा प्रश्न होता अर्पितासमोर हा विषय कसा काढायचा, याचा. नुसता प्रश्न नाही, एक मोठा स्पीड-ब्रेकरच होता तो आर्या-एक्सप्रेसच्या वाटेतला; तो देखील साधा नाही, तर चांगला तीन टेंगळांचा!
तशीच विचार करत करत ती घरी आली. रस्त्यातले स्पीड-ब्रेकर ओलांडताना तिला अर्पिताला धक्के मारल्याचे भास झाले. सिग्नलच्या दिव्याच्या लाल रंगाच्या जागी ‘पिंक कलर’ दिसायला लागला. त्या दिव्याच्या काटकोनात असलेल्या दिव्याची एक हिरवी उभी रेष या बाजूनं दिसत होती. सेकंदांचे लाल आकडे कमी कमी होत होते. थोड्याच वेळात ते शून्यावर पोहोचले असते. मग त्या हिरव्या रेषेची लाल रेषा झाली असती, तिच्या समोरचा दिवा हिरवा झाला असता. मग तिकडे थांबलेल्या वाहनांना इकडची हिरवी रेष दिसली असती. दृष्टीकोनात फरक पडला, तरी दिसणार एकसारखीच बाब - उभी हिरवी रेष! पण तरीही प्रत्येकाची त्यावरची प्रतिक्रिया निरनिराळी असू शकते. कुणी हिरवा दिवा लाल झाल्यावरही आपलं वाहन दामटतं; तिकडची हिरवी रेषा निरखता निरखता कुणाचं आपल्या लाल दिव्याकडे दुर्लक्ष होतं, मग आसपासचे काही पुढे निघून जातात, आपण चुकीच्या गोष्टीला महत्त्व देत होतो हे त्याला जाणवतं. चुकीच्या गोष्टीला महत्त्व देणं केव्हाही चुकीचंच. जसं त्या फाईल हरवणार्‍या मुलीनं तिच्या कथेत केलं होतं. गाडी स्टेशनात शिरत असताना, उतरायची वेळ आलेली असताना आलेल्या एका फोनला उत्तर देण्याची चूक तिनं केली, बोलण्याच्या नादात फाईलची पिशवी गाडीतच विसरली. लक्षात आलं, तोपर्यंत गाडी पुढच्या स्टेशनात पोचलेली होती. त्याक्षणीचा त्या मुलीचा चेहरा कसा झाला असेल यावर विचार करून त्याचं वर्णन करण्यात आर्यानं अर्ध-एक पान खर्ची घातलं होतं, जे करताना तिला, तिच्या स्वतःच्याच मते, "बहुत पापड बेलने पडे थे!" त्या तुलनेत, अपघाताच्या कथेतल्या संबंधित व्यक्तींच्या मनोवस्थेचं वर्णन करणं निश्चितच सोपं होतं; तिला पटलं.
पण अर्पितासमोर हा विषय काढायचा कसा? काढायचा कसा? काय करता येईल त्यासाठी? विचारांच्या नादात गल्लीच्या तोंडाशी नव्याने बनलेला स्पीड-ब्रेकर ती विसरली; त्यावरून गाडी घालताना तिला जोरदार धक्का बसला; मेंदूत काहीतरी हललं आणि...
तिच्याही मदतीला "युरेका!" आलंच धावून...

----------

Tai, tu pls pls chidu nakos, pan he vachun bagh, ani kasa vattay te mala kalav, pls... अशी एक ओळ आणि सोबत जोडलेली एक पीडीएफ फाईल.
arya-writes@yahoo.co.inकडून आलेलं हे ई-मेल पाहून अर्पिताला आधी आश्चर्य वाटलं आणि मग दोन-दोन प्लीजसोबत "तू चिडू नकोस" आणि त्यावर तिसरं "प्लीज" फ्री, हे सर्व पुन्हा वाचल्यावर तर ती बुचकळ्यातच पडली. तिला आर्याकडून जी ई-मेल्स येतात, ती, खरं म्हणजे, आश्चर्यचकित होण्याच्या किंवा बुचकळ्यात पडण्याच्या लायकीची नसतात. कारण बहुतेकवेळा ती फॉरवर्डेड ई-मेल्स्‌च पाठवत असते; "must read", "ultimate", "don't miss" अशी शीर्षकं असलेली, उगीच नसती ‘फिलॉसॉफी झाडणारी’! अर्पिताला ते पाल्हाळ लावणारे मजकूर वाचायचा प्रचंड कंटाळा येतो. असले प्रकार तिच्या दृष्टीने अर्थहीन असतात. अशा काही ई-मेल्स्‌ची देवाणघेवाण करून लोकांना मानसिक आधार मिळतो, त्यांच्या विचारधारणेत बदल घडू शकतो यावर तिचा मुळीच विश्वास नाही. एकवेळ एखादा विनोद, नाहीतर पुणेरी पाटी आलेली आवडते तिला, त्यातून २-४ सेकंद, तात्पुरती का होईना, पण करमणूक तरी होते. पण हे असलं ई-तत्त्वज्ञान म्हणजे पार "ईऽऽ...तत्त्वज्ञान?!", रीमिक्स गाण्यांसारखं, फोल; असे मजकूर वाचून माणसं भारावून वगैरे कशी जाऊ शकतात हा तिला पडणारा मुख्य प्रश्न असतो. त्यामुळे अशा ई-मेल्स्‌ना सरळ ‘DELETE’चा रस्ता दाखवणं हा तिनं त्यावर शोधलेला उपाय आहे. फक्‍त एक क्लिक आणि नको असलेली गोष्ट पुढ्यातून त्वरित गायब!
पण आजचं आर्याचं हे ई-मेल त्यापैकी नव्हतं; त्यामुळे ‘DELETE’चा नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्या पीडीएफचं दर्शन घेणं तर भाग होतं. तिनं ती फाईल उघडली. ते आर्याच्या हस्ताक्षरातले काही कागद होते, स्कॅन केलेले.
आश्चर्य गुणिले दोन अधिक बुचकळ्यात गुणिले दोन!
तिनं वाचायला सुरूवात केली. अडीचाव्या ओळीला तिच्या लक्षात आलं, की ती आर्यानं पाडलेली एक नवीन कथा होती. तिला कळेना, की आर्यानं आज हे नवीन खूळ काय काढलं? तिनं पुढे वाचायला सुरूवात केली. एक-दीड पान वाचून होई-होईतोवर तिच्या चेहर्‍यावरचे आश्चर्याचे, बुचकळ्यात पडल्याचे भाव हळूहळू मावळले आणि त्याची जागा आधी त्रासिकपणानं आणि नंतर गडद आठ्यांनी घेतली. एक-दीडची दोन पानं झाली, तीन झाली, चार झाली, करत करत ती अखेरपर्यंत वाचत गेली. दोन-चारदा निरुद्देशपणे वर-खाली स्क्रोल करून झालं. तपशील तर सर्व जागच्या जागी होते. घटनाही जशाच्या तशा मांडल्या गेल्या होत्या. त्यात खरेपणा होता. सरळसोटपणा होता, जरासा सरधोपटपणाही होता. पण मुळात जो विषय निवडला गेला होता, त्याचं काय?
त्या तिसर्‍या फ्री ‘प्लीज’ला आता हळूहळू अर्थ प्राप्‍त होऊ लागला.
आर्यानं अगदी बरोबर ओळखलंय; बाबांच्या अपघातावर आधारित कथा वाचून अर्पिताला राग आलाय.
आत्ता दोघी आमोरासमोर असत्या, तर कदाचित त्यांच्यात यावरून जोरदार खडाजंगीच झाली असती. कारण, अर्थातच त्या अपघाताबद्दलची चर्चा, गप्पा अर्पिताला मुळीच आवडत नाहीत. चार-चौघांत, शेजारी-पाजारी त्याबद्दल सांगणं म्हणजे तिला तिरस्करणीय कृत्य वाटतं. आपण आपलं दु:ख कुरवाळतोय, त्याचं भांडवल करून समोरच्याची सहानुभूती मिळवायचा प्रयत्‍न करतोय अशी भावना होते तिची. बरं, शेजारी-पाजारी नाही तर नाही, पण दोघी आपांपसांत त्याबद्दल कधी बोलल्या असतील, तर ते देखील नाही. तो अपघात घडला, तेव्हा आर्याचं अर्धवट कळतं वय होतं. तेव्हा नक्की काय काय झालं होतं, हे अर्पिताकडून जाणून घ्यावं असं तिला अनेकदा वाटायचं. पण जेव्हा कधी ती अर्पिताजवळ हा विषय काढायची, तेव्हा तिला उत्तरं देणं अर्पितानं एकतर टाळलेलं होतं किंवा विषय बदलून टाकलेला होता. अर्पिताच्याही नकळत तिच्या नजरेत आर्याला एक प्रकारची जरब दिसायची; त्या घटनेबद्दलची, की तिला दटावून गप्प करण्यासाठीची, ते तिला कळायचं नाही. म्हणूनच आर्यानं हा ई-मेलचा मार्ग पत्करला होता. त्यामुळे ती आता तिच्या ‘स्वयंभू’ ताईशी बिचकत बोलणार नव्हती, तर arp.samant@gmail.com या ई-मेल आयडीशी हितगूज करण्याचा प्रयत्‍न करणार होती.

----------

बाबांच्या अंगातल्या स्वेटरनं पेट घेतला. जवळ ठेवलेल्या देवाच्या वस्त्रावर डब्यातलं तेल सांडलं. ते ही पेटलं. बाबा घाबरून पाटावरून उठून धडपडत बाजूला झाले, खुर्चीचा धक्का लागून त्यांचा तोल गेला, ते डोक्यावर पडले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आई धावत आली. शेजारी-पाजारी आले. बाबांना हॉस्पिटलमधे नेलं. पुढे महिनाभर ते तिथे होते, त्यातले पंधरा दिवस आय.सी.यू.मधे; हे सगळं तेव्हा अर्पिताला घरातल्या मोठ्यांकडून ऐकून ऐकून माहित झालं होतं. बर्‍याच प्रयत्‍नांनी कुठूनतरी आय.सी.यू.चा अर्थ माहित करून घेतल्याचंही तिला आठवत होतं. ती अनेकदा त्या ऐकीव घटनेवर विचार करायची. देवपूजा करताना बाबा इतके निष्काळजीपणे वागले असतील किंवा देवघर आणि डायनिंग टेबल यात इतकं अंतर असताना ते खुर्चीला धडकले असतील यावर तिचा विश्वास बसत नसे. पण त्याबद्दल काही विचारायला गेलं, की काका, आत्या, आजी, आजोबा सगळे तिला गप्प करायचे; तिच्या प्रश्नांना धडपणे कुणी कधीच, काहीच उत्तरं दिली नाहीत. हळूहळू नकळत तिचा मनाशी एक निश्चय होत गेला, की जर तिच्या शंकांना उत्तरं मिळणार नसतील, तर मग मुळात त्या घटनेबद्दल अन्य कुठली चर्चाच करायची नाही.
त्या घटनेनंतर त्यांचं घर बदलून गेलं, वर्ष-सहा महिन्यांत गाव बदललं, घरचं वातावरण बदललं, आख्खं आयुष्यच बदलून गेलं... हे सुध्दा मोठ्यांनीच तिला ऐकवलं. पण तिच्या मते, तिचं आणि आर्याचं आयुष्य वगैरे काहीही बदललं नव्हतं. आईनं त्यात फारसे विपरित बदल होऊ दिलेलेच नव्हते. काही गोष्टी नव्यानं घडत होत्या, कराव्या लागत होत्या, नाही असं नाही, पण त्याचं विशेष नव्हतं. पानात जबरदस्तीनं वाढली गेलेली घासभर शेपूची भाजी "केलेलं सगळं खायचंच" या फतव्यामुळे जशी खावी लागायची, तसंच होतं ते.

तिला २०-२२ वर्षांपूर्वीच्या आर्याच्या कॉलेज-अ‍ॅडमिशनच्या दिवसांची आठवण झाली. फॉर्मसाठी निरनिराळ्या कॉलेजमधे रांगा लावाव्या लागणार होत्या. म्हणून तिनं स्वतः कॉलेजला दांडी मारली होती. इकडे आर्या अ‍ॅडमिशनचा फॉर्मही स्वतःचा स्वतः भरायला तयार नव्हती. तिला तो अर्पिताकडूनच भरून घ्यायचा होता. अर्पितानं तिला एका कॉलेजचा भरून दाखवला आणि बाकीचे दोन त्याप्रमाणे भरायला सांगितले. पण आर्यानं सरळ "मला तुझ्यासारखा नाही जमणार" असं सांगून टाकलं. त्यावरून दोघींचं भांडणही झालं. बरं, यातलं आईला काही सांगणं शक्य नव्हतं, कारण ती तिच्या वाढीव व्यापांत बुडलेली असायची. दोन दिवस धावपळ करून अखेर हव्या त्या कॉलेजमधे आर्याला अ‍ॅडमिशन मिळाली. त्याच कॉलेजमधे दोन वर्षांपूर्वी सत्राच्या मध्यातच आल्याचं कारण पुढे करून अर्पिताला अ‍ॅडमिशन नाकारली गेली होती.
तिला अचानक सुरसुरी आली, की या आठवणी मॅडमना सांगायला हव्यात. त्यांना दाखवून द्यायला हवं, की बघा, स्वतःचा अ‍ॅडमिशन फॉर्मही नीट भरू न शकणारी तुमची ही विद्यार्थिनी आणि तिला तुम्ही लेखिका बनवायला निघालायत.
मग तिला २०-२२ दिवसांपूर्वी आर्याकडून आलेलं ते दोनावर एक प्लीज फ्री असलेलं ई-मेल वाचल्यावरचा स्वतःचा चेहरा आठवला. पहिल्याप्रथम ती त्यावरून प्रचंड नाराज झालेली असली, तरी नंतर तिनं शांतपणे विचार केला आणि कथेच्या अनुषंगानं त्या अपघाताबद्दल थोड्या निराळ्या दृष्टीकोनातून आणि मोकळेपणानं चर्चा करण्याची संधी तिला त्यात दिसायला लागली. शिवाय आता तिला रोखायला, गप्प करायला घरचे मोठे कुणी मधे तडमडणार नव्हते.

आठवड्याभरापूर्वी आर्याकडून बदल करून आलेल्या फाईलच्या प्रिण्ट-आऊटचे कागद तिनं ड्रॉवरमधून बाहेर काढले, पुन्हा उलटेपालटे करून चाळले, त्यावर पेन्सिलीने स्वतःच्या हस्ताक्षरात केलेल्या नोंदींवरून नजर फिरवली. arp.samant या नावानं जी-मेलला लॉग-इन केलं; त्या नोंदी एक-एक करून आता आर्याला कळवायच्या होत्या. गेले काही दिवस हेच एक मुख्य व्यवधान होतं तिच्या डोक्याला. आर्यानं अगदी पहिल्या ई-मेलसोबत जोडलेल्या कथेच्या फाईल-साईझमधे आता बरीच वाढ झालेली होती. दरवेळी त्यात काहीतरी भर पडत होती. वाढीव मजकुराबद्दल बोलताना, सुधारणा सुचवताना, त्यावरून वेळप्रसंगी आर्याशी वाद घालताना तिला खूप छान, हलकं, मोकळं वाटायचं.
हे याआधी, इतक्या वर्षांत कधीच का घडू शकलं नव्हतं? आणि आताच का घडत होतं? कोण घडवून आणत होतं? माहित नाही. कदाचित अप्रत्यक्षपणे मॅडमच. पिंक कलर्ड रुईया फाईलचा कल्पित अपघात आणि बाबांचा समोर न पाहिलेला म्हणून कल्पनेतच राहिलेला अपघात यांची सांगड घालण्याची त्यांची कल्पना तिला प्रचंड आवडली होती. त्यासाठी तिनं त्यांना पैकीच्या पैकी गुण देऊन टाकलेले होते. त्यासाठीच या कथेच्या लिखाणात आर्याला मदत करायला ती तयार झालेली होती. पण हे या एकाच कथेपुरतं, बरं का. यानिमित्तानं पुढे होऊन, आपणहून मॅडमशी परिचय वाढवावा असं अजूनही तिला वाटत नव्हतंच.
राजकुमारचा एखादा सिनेमा चुकूनमाकून आवडला, म्हणून आख्खा राजकुमार कायमस्वरूपी आवडायला हवा असा काही नियम नव्हता.

X--X--X

(२०१२ सालच्या 'तनिष्का' दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजसी,
तुम्ही कथा नीट लक्षपूर्वक वाचलेली दिसत नाहीये.
कथा आवडलीच पाहिजे अथवा कथेच्या विरोधात काही लिहायचंच नाही असा हेका नाहीच, मात्र काहीही प्रतिसाद देण्यापूर्वी निदान लिहिलेलं लक्षपूर्वक वाचलं जावं इतकी छोटीशी अपेक्षा मात्र नक्कीच आहे.

interesting concept. आवडली कथा.

madam चे विचार-बोलणे माबो च्या प्रतिसादांनी भारलेले वाटले Happy

कथा म्हणून आवडली. इंटरेस्टिंग कन्सेप्ट का काय आहे तो माझ्या फार लक्षात आला नाही.
(कथा, संवाद मला खूप गिचमिडीत लिहिल्यासारखे वाटले त्यामुळे पहिल्या पानावर दिसून, कथा उघडूनही मी वाचायला टाळत होते)

काही कथा पहिल्या फटक्यात आवडतात. काही हळूहळू आत झिरपतात आणि मग आवडू लागतात. ही कथा माझ्याकरता दुसर्‍या प्रकारात मोडते. काल वाचली तेंव्हा उड्या मारत वाचली होती - कथेचा वेग, संवाद स्लो आहेत म्हणून असेल किंवा तुला कथा कुठल्या दिशेने वळवायची आहे याचा अंदाजच येत नसल्याने मधेमधे येणारा कंटाळा असेल.

पण जेंव्हा शेवटाशी पोहचलो तेंव्हा कथा लख्ख कळली आणि म्हणून आज पुन्हा वाचली. आता चढू लागलीये ती Happy

लले, एरवी लिहितेस तशी दोन पॅराग्राफमधे डबल एन्टर मारून कथा लिहिलीस तर सुटसुटीत वाटेल कथा असं माझं मत.
हे शेवटच्या उपभागात केलं आहेस असं दिसतंय, मग आधी न करण्याचं काही विशेष कारण आहे का?

समस्तांस धन्यवाद.

माधव Happy

गिचमिड, गर्दी इ.बद्दल -
सिंगल एण्टर आणि डबल एण्टर दोन्हींचा वेगवेगळा अर्थ आहे आणि दोन्हींचा मी नेहमी जसा वापर करते, तसाच या कथेतही केलेला आहे. एकाच दृश्यातल्या प्रत्येक संवादाला डबल-एण्टर हे मला झेपत नाही, समहाऊ...

सिंगल एण्टर आणि डबल एण्टर दोन्हींचा वेगवेगळा अर्थ आहे आणि दोन्हींचा मी नेहमी जसा वापर करते, तसाच या कथेतही केलेला आहे.>>> हे थोडे विस्तृतपणे सांगशील का प्लीज? ऑनलाईनसाठी पण हे वापरले जाते का? मी वाचकांच्या सोयीसाठी डबल आणि ट्रीपल एंटर मारते. त्यामुळे स्क्रीनवर वाचताना बरं पडतं असा माझा अनुभव.

इंटरेस्टिंग कन्सेप्ट का काय आहे तो माझ्या फार लक्षात आला नाही.

>>
लहानपणी घडलेला आणि न उमजलेला वडिलांचा मृत्यु.
त्याबद्दलची दाबुन टाकलेली उत्सुकता.
आर्याचा कमकुवत आत्मविश्वास आणि तिला सतत मॅडमचा लागणारा फीड्बॅक
यात काही समान धागा आहे का पहा.