चूक : भाग ४

Submitted by यःकश्चित on 30 August, 2013 - 05:32

चूक ४

==================================================

भाग १
भाग २
भाग ३

आत्ता हळू हळू सारं हाताशी येतंय. तपासाला दिशा मिळतेय. तो हार त्या आयातीतला ऐवज आहे. तरीच म्हणालं एवढा महागडा हार गळ्यात घालून फिरणे म्हणजे डोक्यावर टांगती तलवारच की. पण मग तो पैंजणांचा आवाज ! त्याच उत्तर अस्लमभाईच देऊ शकेल.

******

" सलावालेकुम अस्लमभाई "

" वालेकुम सलाम सावलेसाब, यहा कैसे आना हुवा ? "

" अरे असंच तुझी आठवण आली म्हणून आलो भेटायला. "

" क्या साब मजाक करते हो. अरे छोटू १ चाय ला रे. अद्रक मारके. बोलो साब क्या हुवा ?"

" अरे तू सिंगारशेठची छोटी मोठी कामे करतोस म्हणे ! "

" हा साब, अभी बिजनेस बोले तो वसुली साथ मे आताही है ना. "

" हो पण तू वसुली सोडून पण आणखी कामे करतोस असं म्हणाले शेठ."

" कौनसे काम ?"

" अस्लम जास्त नौटंकी नको करूस रे. बोल त्या दिवशी काय झालं तिथे ?"

" कूछ नही . बस माल लिया और सेठ के गोडाऊन मे पहुचाया. "

" मग तो मेला कसा ? तिथे काय घडल ते मला सविस्तरपणे सांग."

" साब, मै नई जाता उधार. अपने लडकोंको भेजता हु. "

" मग त्यांना बोलाव. "

" अभी वो दुसरे काम पे गये है. "

" ठीक आहे. मग ते येईपर्यंत मी थांबतो इथे."

" साब आप क्यू तकलीफ लेते है. वो आनेके बाद मै खुद उन्हे लेके चौकी पोहोचता हु. "

" ठीक आहे. आता जातो मी. पण तू लवकरात लवकर त्या पोरांना घेऊन ये चौकीला. आणि काहीही गोलमाल नकोय. जर काही दगा करायचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव की मी इन्स्पेक्टर सावळे आहे. "

" क्या सावलेसाब, ये अस्लम का जबान है. "

******

" ढेरे स्केच सर्व पोलीस चौकीत पाठवलं ना ? "

" होय साहेब. "

" आणि त्या खास माणसांचा काही पत्ता ? "

" होय साहेब, दोघे जण आले आहेत. बाहेर वाट पाहतायेत. "

" अरे चल ना मग बाहेर. "

बाहेर दोघेजण बाकड्यावर बसले होते. किरकोळ देहयष्टीचे होते. त्यांच्याकडे पाहून ते खून करू शकतील असा वाटत नव्हत.

" बोला. कसा खून केलात संतोषचा ? " - सावळे

" खून ? ", त्या दोघांतला दाढीवाला बोलला.

" होय खून.. "

" संतोस मालकाचा खून झाला ?"

" काही माहित नसल्याचा आव आणू नका. कोळीवाड्याच्या किनार्यावर जे काही घडल ते व्यवस्थितपणे सांगा. "

" सायब..ते खूनच काय मायती नाय बगा. पर त्या रातीला काय जाला ते समदा सांगतो. ", दोघातल्या दुसर्याने सांगायला सुरुवात केली, " आमी दोग ठरल्या वक्ताला किनार्याला गेलो. संतोसमालकाची दोस्त अजून तितंच व्हते. मित्र दरयेळी येतेत पर आमी यायच्या अदुगर गेलेले अस्त्येत. पर या वेळी त्यांनी लैच देर लावली. तीतल्याच एका दगडाजवळ दोग बसून राह्यलो. जरा येळानं कुटून तर छुम्क्याचा आवाज आला बगा. "

सावळेंनी ढेरेकडे पहिले. ढेरे नुसतच हसला.

" आदी आवाज कुटून येतो हे कळलच नाय. नंतर एक काळी सावली दिसली बघा. त्या सावलीच्या मागे मागे गेलो. पर २-४ दगडानंतर त्यो कुट गुम जाला काय पत्ताच नाय बगा. म्या बराच शोधला पर त्यो गावला नाय."

" परत आमी संतोसमाल्काजवळ आलो. तोवर त्यांचे दोस्तबी गेले व्हते. ", पहिला दाढीवाला सांगू लागला.

" पुढे ? " - सावळे.

" फुडं काय .. आमी माल उतरवला अन गेलो. "

" बस एवढच ! "

" हा सायब."

" तुम्ही दोघंच असता का आणखी कोणी असतं तुमच्याबरोबर ? "

" त्या अस्लमभायचे दोगजन असतेत.

" ढेरे ते स्केच घेऊन या हो जरा.". ढेरेने आतून ते स्केच आणलं.

" त्या दोघात हा होता का ? "

" व्हय सायब."

" मिसाळ आणि ढेरे , हे स्केच घेऊन अस्लमकडे जा आणि ह्या माणसाला घेऊन या. सोबत आणखी दोघांना घेऊन जा. तुम्ही दोघं निघा आता. गरज पडली तर बोलावेन दोघांना."

ते दोघे मजूर गेले. दोघे हवालदारपण अस्लमकडे गेले. सावळे आत जाऊन आपल्या खुर्चीत बसले.

" म्हणजे खून या स्केचमधल्या माणसानेच केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण कशासाठी केला असावा हा खून. संतोषला मारून त्या अस्लमच्या माणसाला काय मिळणार ? "

*****

" साब थोडे पैसे दो. मै एक-दो महिनोंके लिये गुम हो जाता हु. "

" ठीक है. ये ले पाच हजार है. और लगे तो हफ्ते बाद आना. और मुझे फोने भी मत करना. उस साले सावले को मेरे पे शक हो गया है. वो फोन टॅप करेगा. ", अस्लमभाई

" जी साब. चलता हु. खुदा हाफिस."

" खुदाहाफीस. "

तो दुसरा व्यक्ती वळतो तोच त्याला मिसाळनी पकडला.

" कुठे पळतोस xxx ?"

" हवालदार साब. मै चौकी मे आनेवाला था अभी. आपने क्यू तकलीफ ली !"

" कामही वैसा है. चलो अब तुझे और इसे सावळेसाहेबने बुलाया है. "

" इसे क्यू ? इसने क्या किया ? "

" सब पोलीसचौकीमे जाके पता चलेगा. "

*****

" साहेब, आणला बघा याला आणि याच्या भायला पण. "

" अस्लम, काय रे तू येणार होतास ना ? " - सावळे

"हा साब, मै इधरहीच आनेवाला था - "

" ह्या पोऱ्याला गावाला पाठवून, येणारच होता इकडे." मधेच मिसाळ बोलला.

" काय अस्लम ?", सावळेंनी अस्लमवर आवाज चढवला.

" नही साब, इसको लेकेच आनेवाला था. ये आपके हवालदार क्याभी बोलते."

"बर बर. याच नाव काय आहे ? "

" इरफान "

" तर इरफान ", सावळे इरफानकडे बघत म्हणाले, " का बर केलास खून ? "

आधीच इरफान जरा घाबरलेला दिसत होता. आणि त्यात सावळेंची नेहमीची पद्धत. इरफान बरोबर सापळ्यात फसला.

" स..स..साब...क..का..कैसा खून ? ", तो अजूनच घाबरा झाला .

" अरे घाबरतोस कशाला ? साधा सोपा प्रश्न विचारला मी की त्या रात्री तू खून का केलास ? खून जर केला नसशील तर घाबरण्याच काय कारण ?"

" प..पर्र ..साब मैने कोई खून नही किया", इरफान उसने अवसान आणून बोलला खरं पण सावळेंची नजर.

" अस्लम , सांग रे तुझ्या पोरांना. सावळेला इतकं घाबरत जाऊ नका. पोलीस हे आपले मित्र असतात. "

सावळेंनी मोर्चा इरफानकडे वळवला, " हो ना इरफान ? "

आणि खाडकन इरफानच्या कानशिलात ठेऊन दिली. दोन मिनिटे पोलीसस्टेशन मध्ये स्मशान शांतता होती.

" साब, हमरा छोकरे ने कुछ नाही किया और आप - "

" गप बस अस्लम. त्याने काय काय केलय ते सगळ्यांनाच माहिती आहे. तुला तर सर्वात आधी कळलेलं आहे. आणि ही चलाखी सावळेसमोर चालायची नाही. तू बोल रे पटकन नाहीतर - "

" नाही साहेब सांगतो."

" आता कसा आलास वठणीवर. " सावळे जवळच्या स्टुलावर टेकले. " अरेच्चा तुला मराठी येते की ! "

" हो साहेब. थोडीबहुत येते. त्या रातीला आम्ही सगळे किनार्याला गेलो. सगळ काम झालं होतं साहेब. ते बाकीचे शेठचे दोन आदमी, ते पण गेले घरी. आमच्या सोबत भाईंचा और एक आदमी असतो तो ही निघाला. पण माझ्यात आणि त्याच्यात त्यादिवशी थोडा झगडा झाला. तो १० टक्का माल पाहिजे म्हणून अडून बसला. खूप सांगून पण ऐकेना. मग काय साहेब , शेठशी गद्दारी नाही करणार आपण. टपकावला साल्याला. "

" आणि हा खून म्हणजे गद्दारीच्यावर झाला की. "

" बघा. साब आपण वाईट काम करत असलो ना तरी अस्लमभायचा आदमी आहे आपण. जुबानाशी पक्का. शेठला सांगितल माल आणून देतो म्हणून मग माल देणार. त्यात हात नाय मारणार. आणि जर कोणी मारत असेल ना तर त्याचे पण हात तोडणार. "

" हा बर बर. जास्त फुशारक्या नको मारू. मिसाळ याला लॉकअप मध्ये ठेवा. आणि याची कबुली पण लिहून घ्या."

मिसाळ इरफानला आत घेऊन गेला.

" अस्लम तू ये आता. मी परत बोलावेन तुला."

" पर साब कुछ हो नही सकता क्या ? "

" कशाच ? "

" साब वो इरफान - "

"मिसाळ याला पण लॉकअप मध्ये टाक रे. त्या इरफानचा बॉस आहे हा ."

" नही साब. मै चलता हु. खुदा हाफिस."

*****

सावळे आपल्या खुर्चीवर विचार करत बसले होते.

खुनी मिळाला होता पण कुठे तरी एखादा धागा आपला चुकतोय. संतोष दहा टक्के हिस्सा का मागेल ? त्याच्याच बापाचा माल होता ना ? आणि इरफान गद्दारीची भाषा करतो. मग शेठच्या मुलाचा खून करताना त्याची अक्कल काय शेण खायला गेली होती का ? महत्वाचं म्हणजे त्याने संतोषला कसा मारला हे सांगितलच नाही. बहुतेक गळा दाबूनच मारला असणार. पण मग त्याला हृदयविकाराचा झटका कधी आणि कसा आला ? शिवाय तो पैंजणाचा आवाज ?

उद्या या इरफानची सविस्तर चौकशी करायला हवी.

कुठेतरी धागा चुकतोय....आपल्या तपासात पहिल्यांदाच कुठतरी चूक आढळती आहे.

....आणि सावळेंनी इक्लेयर काढली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users