त्या नंदराजतनयास..

Submitted by भारती.. on 28 August, 2013 - 01:15

त्या नंदराजतनयास...

(वसंततिलका - गागाल गालल लगाल लगाल गागा )

त्या नंदराजतनयास मनात ध्यावा
त्याच्यासमेत अनुराग विशेष व्हावा
वंशीवनात घुमताच सुरेल पावा
हा जन्मदाह अवघाच विरून जावा

बाई तुलाच कळले घडले कसे हे
प्राणांस मोह असले पडले कसे हे
पाऊल का अवचिता अडले असे हे
नेत्रांस नेत्र जुळुनी जडले कसे हे

मध्यान्हवेळ यमुनेसहि जोर होता
माथ्यास आणि कटिला घटभार होता
एकाग्रचित्त कसला न विचार होता
तालात नुपूर पदी झणकार होता

वाटेतलाच तरु तो नभ मापणारा
छाया विशाल सुखशीतल स्थापणारा
त्याच्या तळी यदु उभा मन व्यापणारा
त्याचा कटाक्ष-शर चंदन माखणारा

हा पोरटा खट अती छळ फार याचा
खोड्या करून उठवी ज्वर गोकुळाचा
आईस वाटत असे पुतळा गुणाचा
बापास ताप असला न कळावयाचा

काळी घनावळ जणू मुख रेखते ही
नेत्रांत वीज चमकून झळाळ येई
ते गोड गोड रुपडे अन नाटकेही
हा मोहवी सकळ मूढ जनांस पाही

मी ओळखून पण यास बधायची ना
याच्याकडे पळभरास बघायची ना
वाटेत आज अडवून तरीच कान्हा
हासे मधूर मज हा कळला बहाणा

रागात मी गिरिधरास कठोर शब्द
बोलून चार पुढती सरता मुकुंद
बाहू धरून वदला ''सखये क्षणार्ध
हे थांबवून रण तू धर प्रीतिछंद ''

तो भोवताल अवघाच कुठे दिसेना
आवर्त नील उठले कुठुनी कळेना
नौका सुखात बुडते तरणे रुचेना
त्याचे मला कपटनाटक आकळेना

आता कुठे मन जनाविजनात आहे
आयुष्य तेच दिसते वरुनी जरी हे
रात्रंदिसात नयनात ते चित्र राहे
पावा घुमे मधुवनी रस वाहताहे ..

-भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा....भारती....

अगदी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर "वसंततिलका" वृत्ताची जणू मेजवानीच मिळाली असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. शालेय जीवनाची आठवण इतकी ताजी झाली की या वृत्ताच्या नियमानुसार १४ अक्षरांची परत एकदा उजळणी झाली. बाकी र्‍हस्व दीर्घ लघु गुरु यांच्या क्रमाचा काही मी पाठलाग केला नाही. कारण तुमेची रचनाच इतकी मोहक आहे की वृंदावनात फिरणेच मी जास्त पसंत केले.

"....हा पोरटा खट अती छळ फार याचा....." ~ एका क्षणात पुरता कान्हा समोर आला.

तुमच्या मराठी भाषेच्या अभ्यासाकडे मी नेहमीच आदराने पाहतोच पण आज प्रथमच कवितेसाठी प्रतिसाद द्यायची इच्छा झाली त्याला कारण म्हणजे 'वसंततिलका' मधील स्वा.सावरकरांची एक रचना फार वर्षापूर्वी वाचलेली आठवते मला. या क्षणी ती माझ्याजवळ नाही, पण वृत्ताबाबत संदेह नाही.

जन्माष्टमीच्या शुभेच्छा

अशोक पाटील

अप्रतिम रचना ...

वंशीवनात घुमताच सुरेल पावा
हा जन्मदाह अवघाच विरून जावा >>>>> श्रीहरि श्रीहरि .....

वा ! सुंदर. याला तशीच सुंदर चाल लाभली पाहिजे.

भारती,
सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेले

कृष्ण तुझा बोले कैसा ऐक गं यशोदे
लपविलास चेंडू म्हणतो, उरी तुच राधे
परतुनि मला दे...

हे गाणे ऐकलेय का ?

भारतीताई मस्त रचना!!
जन्माष्टमीच्या शुभेच्छा......

याला तशीच सुंदर चाल लाभली पाहिजे. +१००

अख्खी कविता बेहद्द सुंदर झाली
पुन्हा एकदा म्हणेन महाकवयित्री आहात तुम्ही
_________________/\__________________

रश्मी +१ याला चाल बांधायलाच हवी कुणीतरी

आभार प्रियजन Happy
वृत्तात शिरताना कदाचित जुन्या लयी जागल्यामुळे अनेकदा श्रीकृष्णापर्यंत जाणे होते, वसंततिलकेच्या बाबतीतही तेच झाले. मग जन्माष्टमीलाच ही नुकतीच लिहिलेली रचना इथे द्यावीशी वाटली.
वैभव, हे वैभव ज्याचे त्यालाच तुम्ही दिलेली ही पदवी समर्पण.
अशोकजी, 'वृंदावनात फिरणेच पसंत केले ' हे बेहद्द आवडले कारण रस-ग्रहण हाच परम-आनंद.
दिनेशदा ,>>भारती,सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेले 'कृष्ण तुझा बोले कैसा ऐक गं यशोदे-हे गाणं ऐकलंय का?>> नाही हो,तुमच्याकडून नव्यानेच कळलं. आता शोधून पाहेन..

वा ! मस्तच झालेय कविता.
"तो भोवताल अवघाच कुठे दिसेना
आवर्त नील उठले कुठुनी कळेना
नौका सुखात बुडते तरणे रुचेना
त्याचे मला कपटनाटक आकळेना " >>>. हे सर्वात छान.

भारती, मुद्दाम ते गाणे सुचवलेय. कारण शब्द, चाल आणि गायन यांचा सुरेख संगम झालाय त्या गाण्यात.
पडद्यावर चंद्रकांत आणि नर्गिस बानू, गुरु शिष्येच्या भुमिकेत आहेत..

कृष्ण तुझा बोले कैसा ऐक ग यशोदे
लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे
परतुनी मला दे

दिवसभरी पाठीलागे, पाठ सोडी ना गे
किती किती समजूत घालू, किती भरू रागे
थोर घरी उपरे परि हे पोर नव्हे साधे

कटीस मिठी मारी, झोंबे, मागतो रडूनी
निरी धरून येऊ बघतो वरी हा चढोनी
बाळपणी जाईल वाया जन्म अशा नादे

दिले यांस साखर-लोणी, दिल्या दूध-लाह्या
नवी दिली चेंडू-लगोरी सर्व जाय वाया
बरी नव्हे सवयी असली तूच या सजा दे

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्‍ता डावजेकर
स्वर - आशा भोसले , सुधीर फडके
चित्रपट - धरतीची लेकरं

काळी घनावळ जणू मुख रेखते ही
नेत्रांत वीज चमकून झळाळ येई
ते गोड गोड रुपडे अन नाटकेही
हा मोहवी सकळ मूढ जनांस पाही

मी ओळखून पण यास बधायची ना
याच्याकडे पळभरास बघायची ना
वाटेत आज अडवून तरीच कान्हा
हासे मधूर मज हा कळला बहाणा <<<

शब्दांनी जिला लोटांगण घातलेले आहे अशी कवयित्री!

हे वृत्त ज्ञात नव्हते, धन्यवाद!

दिनेशदा धन्स या गोड गाण्यासाठी Happy तुमचा रेफरन्स सेक्शन जोरदार आहे त्याचा फायदा नेहमीच मिळतो आम्हाला.
बेफिकीर, मी नि:शब्द या कौतुकाने.गझलवृत्तांचा तुमचा अभ्यास संदर्भासारखा आहे सर्वांसाठीच.
हे अक्षरगणवृत्त असल्याने कदाचित तुम्हाला माहिती नसेल. जुन्या मराठीत 'होई वसंततिलका तभजाजगागी' अशी ज्याची लक्षणे दिली आहेत ते हे वृत्त लगावलीत सुरुवातीला दिलेच आहे.१४ अक्षरे, ८ व १४ वर यतिस्थान अशी याची वैशिष्ट्ये आहेत.
''त्यांतील एक कलहं/स तटी निजेला
जो भागला जल-विहा/र विशेष केला
पोटींच एक पद लां/बविला दुजा तो
पक्षी तनू लपवि भू/प तया पहातो ''- असा काहीसा फ्लो या वृत्ताचा.रघुनाथपंडितांच्या नलराज-आख्यानात याचा विपुल वापर आहे.

धन्स शाम Happy

वसंततिलका वृत्ताच्या यतिस्थानाबद्दल आणखी काही माहिती-
- सामान्यत: वसंततिलकामध्ये आठव्या अक्षरावर यति येतो, अर्थात तो काव्यशास्त्रानुसार अनिश्चित यति आहे.... कधी सोयीनुसार बदलावा लागला तर यतिभंगाचा दोष मानला जात नाही.

ज्या वृत्तांमध्ये निश्चित यति असतो तेथेच यतिभंगाचा दोष लागतो .

उदाहरणादाखल मालिनी वृत्त(ललललललगागा गालगा गालगागा - १५ अक्षरे व आठव्या अक्षरानंतर निश्चित यति ) तसेच स्रग्धरा वृत्त - प्रत्येक चरणात गागागागा लगागा ललललललगा गालगा गालगागा या क्रमाने २१ अक्षरे व सातव्या आणि चौदाव्या अक्षरानंतर निश्चित यति असतो.

भारती दीदी तुला दंडवत.
अख्खी कविता मोरपिसासारखी अलवार आहे.
<<त्याचा कटाक्ष-शर चंदन माखणारा>> ही ओळ बेहद्द आवडली.

त्यादिवशीच वाचली होती कविता..खूपच अप्रतिम आहे..त्याचबरोबर वसंततिलका वृत्ताबद्दल बरीच नवीन माहिती मिळाली...
(माझा एक मतला आठवतोय या वृत्तातला.....
काटे भरून नजरा असतात काही...
त्यांच्यातही सुजनहो फसतात काही..!
चु.भू.द्या.घ्या.):)