चीड चीड चीड

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 27 August, 2013 - 05:24

गेल्या काही दिवसात जे काही चाललंय ते बघून भयंकर चीड येतेय. वाईट ह्याचं वाटतं की फक्त चिडण्यापलीकडे काहीच करु शकत नाहीये. त्यामुळे स्वत:चाच राग राग येतोय.

इतका स्वार्थी बनलाय माणूस की स्वत:पलीकडे त्याला काहीच दिसू नये. फक्त स्वत:चा फायदा ….. !! आणि भूक तरी किती असावी…… पोटात राक्षस शिरल्यासारखी…… जी कधी संपतच नाही !! कित्येक लोकांच्या तोंडचा घास पळवून, तो खाऊन, पचवून ढेकरही देऊ शकतात हे लोक !! असली कसली भयंकर जमात तयार झालीये आजकाल !!

विचार केला की सुन्न होतं मन !! अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा सुद्धा ज्या लोकांना मिळत नाहीत त्या लोकांचा वापर करुन राजकारण खेळल्या जातंय. आपला वापर होतोय ही जाणीवही त्या लोकांना नाहीये. पण आपण सुशिक्षित म्हणवणारे अशिक्षितांसारखी बघ्याचीच भूमिका घेतो. जे घडतंय ते स्विकारुन स्वस्थ बसतो…….. खरं तर ह्याचीच चीड जास्त येते. का नाही पेटून उठत आपण !! फक्त मूठभर लोक आपल्याला हवं तसं खेळवतात आणि आपण … आपण कठपुतळ्यासारखे नाचतो त्या तालावर…. !! का नाही आपण बंड पुकारत…..का आपण मूग गिळून गप्प बसतो !! आपल्याला तर त्रास नाही ना…. मग कशाला मधे पडायचं …. आपल्यावर वेळ आली तर बघू…. ह्या वृत्तीमुळेच आपल्यावर हे लोक राज्य करताहेत. आपल्याला पाहिजे तसं नाचवताहेत आणि स्वत: मजा लुटताहेत.

भ्रष्टाचार तर जागोजागी बोकाळलाय…. !! प्रत्येकाची नजर दुसर्‍याच्या पैशावर. नजरेत सतत वखवख आणि विखार !! जाती-जमातीचं राजकारण करुन नेतेमंडळी आपल्या खुर्च्या मिळवतात, टिकवतात आणि आम्ही-तुम्ही भांडत राहतो……. जीव घेतो एकमेकांचे ! इतकं स्वस्त झालंय का आयुष्य आजकाल …. की फक्त श्रीमंत लोकांनाच जिवंत राहण्याचा अधिकार आहे !!

अरे चाललंय काय हे….. !! जरा पैसा आणि सत्तेचा कैफ बाजूला सारुन डोळे उघडून आजुबाजूला माणसासारखं बघा रे….. की तेवढी माणूसकीही राहिली नाहीये तुमच्यात !! नसणारच म्हणा… नाहीतर इतकी वेळ आलीच नसती.

बाहेरच्या देशात राहतांना, इथल्या सुखवस्तूंचा उपभोग घेतांना मिळणारा आनंद आजकाल होतंच नाही. खूप गिल्टी फ़िलिंग येतं. आपल्या देशात इतकी वाईट परिस्थिती आहे आणि आपण ऐषोआरामात राहतोय….खूप अपराधी वाटतं. पण भारतात राहणारे लोकंच जर आपल्या देशावर प्रेम करत नसतील तर आपला देश असाच रसातळाला जाणार. स्वार्थापोटी देश विकायला काढणार !! जोपर्यंत प्रत्येक माणूस आपल्या देशावर प्रेम करणार नाही तोपर्यंत भारत कधीच प्रगती करणार नाही. निसर्गाने किती भरभरुन दिलंय आपल्याला. बाहेरच्या देशात ह्यापेक्षा कित्तीतरी पटीने कमी उपलब्धता असूनही ते देश आपल्यापेक्षा कित्येक पटीने पुढे गेले आहेत. प्रत्येक क्षेत्रात. साधं रस्त्यांचं उदाहरण घ्या. हातात जी वस्तू नकोय ती वस्तू आपण रस्त्यावर टाकणार. मग ती प्लॅस्टीकची पाकीटं असोत, तोंडात चघळलेला घुटका असो. कसे रस्ते स्वच्छ राहणार… !! त्यात रस्ते बनवणार्‍यांची पण भूक वखवखणार……मग ते भेसळ करुन कच्च्या सिमेंटचे रस्ते बांधणार…… खड्डे पडणार…….पूल कोसळणार….. पुन्हा आपलं जैसे थे !! कसे पुढे जाणार आहोत आपण ! प्रत्येक बाबतीत हे आणि हेच घडतं.

कधीतरी तर विचार करा रे देशाचा… !! आपली भूक आवरा ……प्लीज !!

आपल्या पुढच्या पिढीला आपण असा देश देणार आहोत…..असा…….. इतका ओंगळवाणा, किळसवाणा…. इतका रक्त-पिपासू !!

कसं जागं करावं ह्या देशाला….. त्यासाठी किती चांगल्या लोकांचे बळी देणार आहोत आपण ….. !!

देवा...आता तुलाच अवतार घ्यावा लागणार !!

अंधार पातकांचा दाही दिशात झाला
घेवून सूर्य दुसरा धावून ये गणेशा !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या पुढच्या पिढीला आपण असा देश देणार आहोत…..असा…….. इतका ओंगळवाणा, किळसवाणा…. इतका रक्त-पिपासू !!

कसं जागं करावं ह्या देशाला….. त्यासाठी किती चांगल्या लोकांचे बळी देणार आहोत आपण ….. !!>>>>>>>>>>>>>हाच प्रश्न पड्तो मला पण सारखा Sad