Trek : ठिपठिप्या घाट - कुर्डूगड - लिंग्या घाट

Submitted by बंकापुरे on 19 August, 2013 - 09:00

मंडळ :

* निनाद बारटक्के
* नितीन तिडके
* केदार नरवाडकर
* प्रवीण शेलार
* सुमित रानडे
* शार्दुल देशमुख
* विद्यासागर केळकर
* अनुराग वैद्य
* मनोज शेडबाळकर
* दत्तू तुपे

DSC05670.JPG
कुर्डूगड / विश्रामगड

नोव्हेंबर २०११ मध्ये Wikimapia वर खेळत असताना ७-८ नवीन घाटवाटा सापडल्या… बरंच संशोधन केल्यावर ठिपठिप्या घाटाची माहिती समोर आली… घोल गावाच्या श्री. पोळेकर मामांना फोन केल्यावर त्यांनी माझ्या ज्ञानात चांगलीच भर घातली… आणि ठिपठिप्या घाट करायचा निर्णय झाला… पण नुसत्या घाटवाटा करण्यापेक्षा बाजूचा एखादा किल्ला उडवणे हे आमचे कायमचे पहिले तत्व म्हणून सोबतीला कुर्डूगड (विश्रामगड) करायचे ठरले … आणि करायचाच तर दणदणीत ट्रेक करणे हे दुसरे कायमचे तत्व म्हणून जोडीला लिंग्या घाट उरकणे… हे ही ठरले… हा हा म्हणता १० पब्लिक तयार झाले … बघता बघता 'न' विचारता अजून ५ पब्लिक वाढवले जाऊ लागले… १० पेक्षा जास्त लोकं Manage करायला आम्ही काही Professional ट्रेकर्स नाहीत आणि पैसे कमावण्याचे तर अजिबात हेतू नाहीत म्हणून १० पब्लिक वर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश मिळवले'चं' Happy

आग्या-मढे-शेवत्या ट्रेक च्या तोडीसतोड असणाऱ्या ह्या दमछाक ट्रेक ला बराच वेळ लागणार आणि काही पब्लिक अनोळखी असल्यामुळे वेळेचा अपव्यय नको म्हणून भल्या पहाटे ४:०० AM IST ला निघायचे ठरले… आणि होयचे तेच झाले… ९ तासाच्या ट्रेक ला तब्बल १३. ५ तास लागले आणि ४.५ तास हकनाक वाया घालवले… कसे ते असे Happy

दिनांक : १० ऑगस्ट २०१३

सांगितल्याप्रमाणे भल्या पहाटे ३:१२ AM ला तिडके ने फोन करून उठवले… ४:४० AM ला सगळी मंडळी आली आणि मग आल्या आल्या दंगा करून सोसायटीतल्या सभासदांची झोप उडवली… शेवटी माझ्या कुटुंबाने वरून सज्जड दम भरल्यावर तातडीने पब्लिकला दोन निळ्या गाड्यांमध्ये कोंबून ४:४५ AM ला निघालो…वाटेत शेलार मामांचा चहाचा जप चालू होता तर दुसऱ्या गाडीत 'अकबराच्या पिलखानाचा' ऐतिहासिक वर्ग चालू होता … शासनाच्या कृपेमुळे चाळणी झालेल्या रस्त्यावरून कौशल्याने 'सपाट रस्ता चुकवत' !!!...

DSC05575.JPG
श्री. धोंडीबा मोरे मामा

थेट 'दापसरे' गावात सकाळी ६:३५ AM ला पोचलो… ईद च्या शुभमुहूर्तावर केदार ने अप्रतिम 'शीर-खोर्मा' खायला दिला… आवरा -आवरी करून शेलारमामांच्या चहाच्या जपाला स्मरून गावातल्याच मामांकडून कोरा चहा घेतला … ठिपठिप्या घाटाच्या तोंडावर सोडताय का?… व्हय चला की … पण मला लगेच यायचा हाय … शेतीची कामं हायेत … आमचा पूर्ण पिलान सांगितल्यावर दिवसभर आमच्याबरोबर यायला दुसरेच असे श्री. धोंडीबा मोरे मामा तयार झाले आणि आम्ही ७:१५ AM ला निघालो…

ठिपठिप्या घाट :
DSC01299.JPG
ठिपठिप्या घाटातल्या कोरीव पायऱ्या

दाट धुक्याने अच्छादलेल्या भुरभूर पावसाच्या वातावरणातून दोन-तीन छोटे ओढे ओलांडत पाऊण तासात आम्ही ठिपठिप्या घाटाच्या तोंडापाशी येउन थबकलो… मग नेहमीप्रमाणे सामिष संमिश्र असा सकाळ चा Breakfast म्हणून उकडलेली अंडी आणि केळी हादडली… पहिलाच तीव्र उतार हा एक घसरडा RockPatch असल्यामुळे दत्तू (मी) ने Lead घेतली… ह्या ऐतिहासिक घाटात चढायला आणि उतरायला व्यवस्थित अश्या ८ पायऱ्या आणि मजबूत पकड साठी ३-४ खोबण्या खोदून काढल्या आहेत… त्यामुळे घसरड्या RockPatch वरून उतरायला थोडासा आधार मिळाला… १० मिनिटांत सगळ्यांना खाली उतरवले … खिंडीतून उतरताना एकदम आग्या नाळेचा आभास झाला… दाट कारवीच्या रानातून सुमारे तासाभर उतरत होतो… अगदीच निर्मनुष्य आणि अनवट अश्या ह्या घाटात कुठेही गुटख्याची पाकिटे किंवा बिस्किटांची, वेफर्स ची रिकामी पाकिटे, अथवा सिगारेटची थोटके दिसली नाहीत … आणि सह्याद्रीभर कुठेच दिसू नयेत हीच अपेक्षा …श्री. आनंद पाळंदे (पाळंदे काका) ह्यांनी 'डोंगरयात्रा' आणि 'चढाई उतराई सह्याद्रीतील घाटवाटांची' ह्या त्यांच्या पुस्तकात ह्या घाटाला 'थिबथिबा घाट' असा उल्लेख केला आहे …

DSC05572.JPG
ठिपठिप्या घाटातलं कुंड

खिंड संपल्यावर वाट उजवीकडे दुसऱ्या डोंगरावर फुटते… तिथेच अलीकडे एक प्राचीन दगडी चौकोनी कुंड बांधलेले सापडले… त्याच्यातच ठिप-ठिप पाणी पडतं म्हणून ह्या घाटाला ठिप-ठिप्या घाट असे नामकरण झाले होय … समोर धुक्यात कुर्डूगडाचा अंगठ्यासारखा दिसणारा वरचा भाग हरवल्यामुळे पलीकडे फक्त विळे-भागड ची MIDC दिसत होती…

सुमारे तासभर उतरून झाल्यावर शेतातून वाट तुडवत 'साखळेवाडी' गावात प्रवेश केला… गाव छोटेखानी पण टुमदार आहे… श्री. व सौ. पवार दाम्पत्यांनी आम्हाला आग्रहाने चहा पाजला… आणि आमची व्यवस्थित चौकशी केली … सोबतीला बारटक्के नी आणलेल्या Britannia बिस्किटांचा फडशा पाडण्यात आला … पवार काका-काकुंनी केलेला असा आग्रह, शहरात मिळणे आता दुर्मिळ झाले आहे … गडावरचा रस्ता विचारून आम्ही ओढा ओलांडून पलीकडे कुर्डूगडावर जाण्यास सज्ज झालो…

DSC05598.JPG

आजूबाजूच्या गर्द हिरवाई ने नटलेल्या डोंगरांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांची रांगेने अजून नक्की किती फोटो काढू आणि कसे असा प्रश्न निर्माण झाला … मग लक्षात की आपल्याकडे १००० चा रोल (Digital Camera) असल्यामुळे घाबरायचं कारण नाही… घाट रस्ता चढायचा असल्यामुळे एव्हाना चालू असलेली सगळ्यांची बडबड आता थांबली होती… अनुराग ने पाउस आला कि Sack मधून Jerkin बाहेर काढायचा … आणि पाऊस थांबला की पुनश्च: Jerkin आत… असा Jerkin - Jerkin चा खेळ चालू केला … त्यात बऱ्याच दिवसांनी ट्रेक केला असल्यामुळे म्हणा किंवा चहा प्यायल्यामुळे किंवा अजून इतर अपरिहार्य कारणांमुळे त्याच्याबरोबर शेडबाळकर ला ही दम लागायला लागला… आणि १५-२० मिनिटांच्या फुटकळ चढाईसाठी चांगला तासभर वेळ वाया जाऊ लागला… सगळी मंडळी पुढे गेली… जबाबदारी म्हणून मी एकटा अनुराग बरोबर चढायला लागलो … अन्यथा थोड्यावेळाने आभाळात गिधाडे फिरताना दिसली असती आणि आमची चांगलीच तारांबळ उडाली असती… शेवटी त्याच्या खांद्यावरची 'जड' Bag घेतल्यावर त्याला थोडासा हुरूप आला… असंच रडत-खडत चढत आम्ही एकदाचे १२:३५ PM च्या शुभ मुहूर्तावर कुर्डपेठेत दाखल झालो …

येसाजी कंक ह्यांचे जन्मगाव आणि बाजी पासलकर ह्यांचे विश्राम करण्याचे ठिकाण म्हणजे कुर्डूगड उर्फ विश्रामगड … - माहिती साभार : श्री. ओंकार ओक

कुर्डूगड / विश्रामगड :

DSC05625.JPG
कुर्डूगडाच्या पश्चिमभागात असलेली भली मोठी गुहा

कुर्डाईदेवीच्या मंदिरात बॅगा टाकून वर कुर्डूगडावर चढायला सज्ज झालो… ५ मिनिटांच्या फुटकळ चढाईनंतर एक पाण्याचे टाके लागते आणि त्याच्यावर एक उध्वस्त दरवाज्यातून आपण खोदीव पायर्‍यांमार्गे गडावर प्रवेश करतो… डावी कडे गेल्यावर साधारण एक छोटेखानी लग्न समारंभ होईल एवढी मोठी प्रशस्त गुहा लागते … अडीचशे पान सहज उठतील एवढी मोठी गुहा बघितल्यावर आम्ही अवाकचं झालो…गुहेत बरेच धारदार दगड आहेत … Photography उरकून पलीकडे एका मोडकळीस आलेल्या 'हनुमान' बुरुजापाशी गेलो … बुरुजावर जायला चांगल्या १४-१५ पायऱ्या आहेत… बुरुजावर चढून गेल्यावर समोरचा कुर्डूगड आणि त्याच्या शेजारचा एक तुटलेला अवाढव्य प्रस्तर बघून चाटचं पडलो… मधल्या खिंडीत बरीचशी पडझड झालेली आहे… तातडीने माझ्या सह्यमित्र श्री. ओंकार ओक ला फोन लावला आणि कोकण-खिडकी आणि अजून आजूबाजूच्या परिसराची माहिती विचारुन घेतली… पडझड झालेल्या खिंडीतून छाताडावरच्या अलगद चढाई नंतर खिंडीत प्रवेश केला आणि समोरच कोकण-खिडकी बघून थक्क झालो … साधारण चौकोनी असलेल्या नेढे सदृश खिडकीतून अप्रतिम असे कोकण दर्शन झाले… मी, तिडके, बारटक्के आणि शार्दुल … आम्हा चौघांना ही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही … मी मनातूनच ओंकार ला धन्यवाद देत होतो … बाकीचे सगळे कुर्डूपेठेत दाखल झाले होते…

DSC05636.JPG
हनुमान बुरुज

DSC05638.JPG

कोकण खिडकी

DSC05655.JPG
कुर्डूगडाच्या पूर्व भागातला महाकाय प्रस्तर आणि खाली पाण्याचे टाके

DSC05635.JPG
कुर्डूगडाचा महाकाय प्रस्तर

DSC05659.JPG
कुर्डूगडाच्या पूर्व भागातली गुहा

खिंडीतून खाली येउन पुन्हा शंकराला प्रदक्षिणा घातल्यासारखं आम्ही मागच्या बाजूला गेलो … जाताना २ गुहा लागल्या आणि तसेच पुढे गेल्यावर तुटलेल्या प्रस्ताराच्या पुढच्या बाजूला आलो…खाली एक पाण्याचे टाके लागते आणि त्याच्या बरोबर समोर कातळात अजून एक गुहा लागते… एक वर्षाचा वाढदिवस साजरा करण्या-इतपत नक्कीच मोठी गुहा आहे…

DSC05664.JPG

Photography उरकून आम्ही पुन्हा बाहेर पडलो … बाहेर पावसाची भूर-भूर चालू होती… मग मिशीवाल्या हनुमानाची (?) आठवण झाली…
तिडके ला विचारल्यावर त्याने गडाच्या मागच्या अंगाला असल्याचे दाखवून दिले …स्थानिक लोकं त्याला हनुमान म्हणतात…

ट्रॅक्टर :
खाली येउन बघतो तर जेवणं उरकून मंडळींनी कुर्डाईदेवी च्या मंदिरात निद्रादेवीची आराधना करण्यातचं जास्त रस दाखवला… मग आम्ही सुद्धा मेथी चे ठेपले, लोणचं, सॉस, काकड्या, सफरचंद वगैरे हाणले… आल्यावर सुमित कडून 'Tractor' चा किस्सा ऐकण्यात आला… झाले असे की लिंग्या घाटाच्या शेजारच्या डोंगरावर काही Towers उभारलेले दिसले … साहजिकच सर्व-सामान्यांना पडलेला हा प्रश्न सुमित ने सहज विचारल्यावर अनुराग ने उत्तर दिलं … 'अरे ते Tractor ने खेचून वर आणतात… लागलीच मोरे मामांनी हजर-जबाबीने एक वाक्य टाकलं … इथं Tractor कशाला आय XXXX येतोय… त्यामुळे साऱ्या आसमंतात जोरदार हशा … अगदी आम्हाला सुद्धा गडावर ऐकू आला …

लिंग्या घाट :

DSC05675.JPG
लिंग्या घाटातल्या पायऱ्या

आवरून कुर्डूगडाला उजव्या अंगाला ठेवत लिंग्या घाटाच्या दिशेने चालायला सुरवात केली… लिंग्या घाटातून कुर्डूगडाचा सुळका एखाद्या लिंगाप्रमाणे दिसतो म्हणून ह्या घाटाचे लिंग्या घाट असे नामकरण झाले होय … ५ मिनिटांत पुन्हा अनुराग ला दम लागायला लागला… मग त्याला जबरदस्ती ने बाटलीभर Electral पाजलं … आणि केदार कडे त्याची 'जड बॅग' दिली … वैद्य एकदम खुश … अर्ध्या तासाच्या चढाईला सुमारे तासभर वेळ लागला… शेवटची छोटीशी घाटाची चढाई केल्यावर एकदाचे आम्ही पठारावर पोचलो…

DSC05678.JPG
लिंग्या घाटातला ग्राम दैवत

पठारावर ग्राम-दैवत आहे आणि त्याच्या उजव्या अंगाला लवासाचं Watch-Tower आहे… नशीब सुमित ने हा Watch-Tower इथे कसा आणला असेल असे पुन्हा विचारलं नाही… सोसाट्याचं वारं, धुकं आणि सोबतीला भूर-भूर पाउस ह्यामुळेच की काय… स्थानिक ग्रामस्थांना जबरदस्ती ने विस्थापित करून ह्या अफाट निसर्गाने नटलेल्या परिसराची 'लवासा' नामक फालतू आणि अति-महागडे Hill Station ने वाट लावायला सुरवात केली आहे… काही किरकोळ पैशात खरेदी केलेल्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत… आणि टिपिकल महाबळेश्वर - लोणावळा पिकनिक छाप पब्लिक्स ची तोबा गर्दी वाढू लागली आहे…

DSC05665.JPG
लिंग्या घाटातून दिसणारं कोकण


धामणहोळ - दापसरे :

संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही एकदाचे धामणव्होळ (धामणहोळ) गावी पोचलो … एकदम मला शोले चित्रपटातल्या दिवंगतए. के हंगल चाचांचा सुप्रसिद्ध डायलॉग आठवला … इतना सन्नाटा क्यू है भाई … गावात २ मंदिरं आहेत … डांबरी सडकावर आल्यावर उजवीकडे वळलो… आता आमच्या ट्रेकचा शेवट मोरे मामांच्या हवाली केल्यावर मोरे मामांनी … अजून ४ तास लागतील … असा मोठ्ठा बॉंब टाकला… आमची इथे गडबड चालू असताना आमच्यातल्याच काही अति-उत्साही मंडळींची मागे निवांत Facebook Photography चालू होती… घटनेचे गांभीर्य ह्यांना कधी कळणार देव जाणे आणि म्हणे आम्ही भारी ट्रेकर … त्यामुळे इथे माझी, बारटक्के आणि मामांची भयंकर चीड-चीड झाली … आरडाओरडा केल्यावर मंडळी धापा टाकत पळत आली… अर्ध्या तासाच्या डोंगराच्या चढाई ला शेडबाळकर ने चांगला एक तास घेतला… आणि मोरे मामा तिकडून ए-ओ-आय असे मोठ्याने ओरडू लागले… बराच वेळ झाला तरी शेडबाळकर अजून आला कसा नाही म्हणून मी आणि तिडके पुन्हा मागे त्याला बघायला गेलो… शेवटी त्याला सुद्धा Electral पाजल्यावर थोडासा हुरूप आला… बऱ्याच वेळा विचारल्यावर शेडबाळकरांना जांघ्रीन चा त्रास झाल्याचे कळले… मग नामी उपाय सुचवून झाल्यावर शेडबाळकर एकदम व्यवस्थित चालायला लागले…

DSC05680.JPG
लवासा नामक चेष्टा

एव्हाना रेम्पाटून मुसळधार पाउस पडायला लागला … मामांची छत्री बाहेर पडली… दाट धुक्यामुळे हळू हळू अंधारून आले … तरी पण मंडळी अगदी उजवी कडच्या जंगली महाराज रस्त्यावरून चालणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघत संभाजी उद्यानातून निवांत चालत यावीत तद्वत येत होती … पठारावर एका मोकळवनात आल्यावर सगळ्यांनी पुन्हा उरलेली उकडलेली अंडी, केळी आणि सफरचंद हाणली… मजल-दरमजल करीत पठारावरून निबिड अरण्यात चालत तासाभरात एका घनदाट अंधाऱ्या जंगलापाशी पोचलो… सुमारे ८ मिनिटे थांबल्यावर उरलेली back -bencher मंडळी निवांत आली … इथे मामांनी ढाण्या वाघाची भीती दाखवल्यावर मंडळींची संभाजी उद्यानातून कात्रज सर्पोद्यानात रवानगी व्हावी तद्वत पळत सुटायला लागले … DAMN IT … मामांना ही कल्पना आधी का नाही सुचली? असो …

मोरे मामांनी अजून २ तास लागतील असा उगीचच एक खडा टाकून दिला … आता माझी सुद्धा सटकली होती … एवढ्या वेळ चालून अजून दापसरे गाव दिसत कसं नाही … असेच सुमारे तासभर चालल्यावर अचानक धुकं बाजूला झालं आणि सकाळी ठिपठिप्या घाटात जातानाचा डावीकडचा डोंगर दिसून आला …समोरचं दापसरे गावातले लुकलुकणारे दिवे दिसले आणि सुटकेचा निश्वास टाकला … आता मामा ओरडायला लागले 'लवकर चला … थांबू नका… पडलात तरी चालेल …ढूXXX लाल झाले तरी चालेल… अजून लई लांब जायचं आहे… ओढा ओलांडायचा हाय '… चला ….चला… डोंगराच्या उतारावरून पळत पळत खाली उतरलो… आणि अचानक मामांनी डावीकडे वळायचा आदेश दिला… ओढ्याला छातीपर्यंत पाणी असतंया… आपन Side Side ने रस्त्यावर जाऊ … तोपर्यंत अंधार पडला होता …मंडळींची चाल पुन्हा कात्रज उद्यानातून संभाजी उद्यानात आली… Torch च्या प्रकाशात कसे-बसे एकदाचे खाली डांबरी रस्त्यावर पोचलो… आणि धामणहोळ ते दापसरे ह्या सुमारे ८ किलोमीटर च्या अंतराला तब्बल ३.५ तास घेतले …

डांबरी रस्त्यावरून चालताना विलक्षण कंटाळा आला होता… डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका काळा-कुट्ट अंधार… मामांच्या सोबतीला मी, तिडके, शेलार, सुमित, बारटक्के आणि केदार असे सहा जण दापसरे गावात निघालो… अर्ध्या तासात गावात पोचल्यावर कपडे बदलून चहा - बिस्किटे हाणून पुण्याच्या मार्गाला लागलो … वाटेत शेडबाळकर, अनुराग, शार्दुल आणि विद्यासागर ला ओलेते उचलून पुण्यात बरोबर १०:२५ PM ला पोचलो…

ठळक वैशिष्ठ्ये :

१. सुमित च्या गाडीत रंगलेला अकबराच्या पिलखानाचा ऐतिहासिक वर्ग…
२. श्री.ओंकार ओक मुळे झालेली कुर्डूगडाची संपूर्ण ओळख… कुर्डूगडाच्या अधिक तपशीलवार माहिती साठी त्याच्या blog : http://offbeattreks.blogspot.com ह्या संकेतस्थळावर टिचकी मारा…
३. ट्रॅक्टर चा ऐतिहासिक दणदणीत किस्सा…
४. दत्तू ने नवीन DSLR घेऊन सुद्धा पावसामुळे जुन्याच Camera ने काढलेले फोटो…
५. जळवांनी शेलार आणि बारटक्के चा घेतलेला समाचार…
६. संपूर्ण ट्रेक दरम्यान श्री. धोंडीबा मोरे मामांची मोलाची साथ झाली… खास करून धामणहोळ ते दापसरे च्या Route दरम्यान…
७. ठिपठिप्या घाट उतरतानाच तिडके ची Bag Cover मागच्या मागे पडून हरवली… नेहमीप्रमाणे काही तरी एक वस्तू हरवण्याचा पायंडा ह्यावेळेस सुद्धा त्याने तसाच कायम ठेवला .…
८. ऐतिहासिक ठिपठिप्या घाटाचा… दत्तू ने लावलेला यशस्वी शोध …
९. घरी पोचल्या पोचल्या रात्रीच अनुराग वैद्य ने Facebook वर ठिपठिप्या घाटाला स्वतःच शोधलेल्या अविर्भावात टाकलेला Status Message : "Mission Completed...find new ghat in Sahyadri...!!! " …सकाळी Facebook उघडल्यावर त्या Status Message ला ४६ Likes आणि २३ Comments… Happy !!!!!
१०. काही अपवाद वगळता ट्रेक यथासांग सफल संपूर्ण झाला…

ट्रेकळावे,
तुप्यांचा दत्तू Happy

http://www.bankapure.com/2013/08/ThipThipyaGhaat-Kurdugad-LingyaGhaat.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गाची वाट लावणार्‍या लोकांची आधीच दणकुन वाट लावली पाहीजे.:राग: लवासाच काय असे अनेक प्रकल्प निर्माण करुन अख्खा महाराष्ट्र घशात घालायचा आहे या ******.:राग:

बाकी तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा. मस्त झाली तुमची ट्रिप, फोटो पण छान आहेत्.:स्मित:

नवीन अनवट घाटवाटा शोधण्याच्या तुमच्या व्रतास त्रिवार मुजरा!!!

पुढील संशोधनासाठी सह्याद्रीची अन् गुगलची कृपा अखंड राहो, अशी शिवबाचरणी प्रार्थना!!!

पण नुसत्या घाटवाटा करण्यापेक्षा बाजूचा एखादा किल्ला उडवणे हे आमचे कायमचे पहिले तत्व म्हणून सोबतीला कुर्डूगड (विश्रामगड) करायचे ठरले … आणि करायचाच तर दणदणीत ट्रेक करणे हे दुसरे कायमचे तत्व म्हणून जोडीला लिंग्या घाट उरकणे…>> हे भारी वाक्य.. सगळ्यांनाच नाही जमत असले.. Happy या ट्रेकला मिसलोच

ब्लॉगवर वाचला होता लेख. माझ्या फेवमध्ये आहे तुझा ब्लॉग.. Happy
हे सालं तंगड्यांना जाळ लावणारं लिखाण आहे. ह्याला ठिपठिप्या म्हणायचं की ठिबठिब्या..?(पाणी ठिबकतं म्हणून..) मी ठिबठिब्या घाट' ऐकलंय म्हणून शंका!

शहरात पाणी ठिबकतं ...पण स्थानिक ग्रामीण भाषेत पाणी ठिप ठिप पडतं म्हणून ठिपठिप्या Happy … हा प्रश्न मला सुद्धा पडला होता पण श्री.धोंडीबा मोरे मामांनी माझी ह्या प्रश्नातून वरील उत्तराने सुटका केली…
श्री. आनंद पाळंदे (पाळंदे काका) ह्यांनी 'डोंगरयात्रा' आणि 'चढाई उतराई सह्याद्रीतील घाटवाटांची' ह्या त्यांच्या पुस्तकात ह्या घाटाला 'थिबथिबा घाट' असा उल्लेख केला आहे .....