"हाक"

Submitted by -शाम on 19 August, 2013 - 00:42

कावळ्याची हाकही ऐकायला येई तिला
"पाव्हणा येईल कोणी" म्हणतसे आई मला

चित्र मामाचेच तेंव्हा मन्मनी दाटायचे
चार आण्यालासुधा सुख पोटभर भेटायचे

राबल्या दूपारचा सांजेस कोंडा व्हायचा
भाकरीला जन्म देवोनी तवा हासायचा

कोण खाई कोण नाही मेळ ना लागायचा
भूकभरल्या आसवांनी जीव हा जागायचा

पुस्तकांच्या त्या उशीवर झोप लागेही खरी
भाकरी घेऊन स्वप्नी येतसे तेंव्हा परी

मध्यरात्रीला असा हटकून वारा यायचा
कुट्ट अंधारच दिव्याचे तेल सांभाळायचा

चांदण्या झाडून सार्‍या पूर्व केसर व्हायची
मोरपंखाच्या लयीची हाक निज मोडायची

रोज आसावून हाती बाप पाणी घ्यायचा
फाटलेल्या ओंजळीने सूर्य ओवाळायचा

वाहुनी गेले दिवस अन् जखम माती आड 'ती'
छप्परावरूनी उडाली कावळ्याची हाकही

________________________________ शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ..... व्यथा प्रभावीपणे मांडलेय.

"कुट्ट अंधारच दिव्याचे तेल सांभाळायचा"

"चांदण्या झाडून सार्‍या पूर्व केसर व्हायची"

"रोज आसावून हाती बाप पाणी घ्यायचा
फाटलेल्या ओंजळीने सूर्य ओवाळायचा" >>>> या ओळी सर्वात विशेष.

मध्यरात्रीला असा हटकून वारा यायचा
कुट्ट अंधारच दिव्याचे तेल सांभाळायचा

चांदण्या झाडून सार्‍या पूर्व केसर व्हायची
मोरपंखाच्या लयीची हाक निज मोडायची

रोज आसावून हाती बाप पाणी घ्यायचा
फाटलेल्या ओंजळीने सूर्य ओवाळायचा<<< सुंदर

ग्रेट कविता ओळन्ओळ केवळ शब्दातीत सुंदर
दूपार मलाही खटकले पण काही केल्या बदलताही येत नाही असे मला वाटले

सुंदर....

भर दुपारी रापुनी सांजेस कोंडा व्हायचा
भाकरीला जन्म देवोनी तवा हासायचा...............असा एक बदल सुचला...कृगैन.

राबुनी मध्यान्ह ती सांजेस कोंडा व्हायची
(राबली मध्यान्ह तर सांजेस कोंडा व्हायचा )

भाकरीला जन्म देवोनी तवा हासायचा............असे करून पाहिले कृ गै न