परंपरा मी पाळत आहे

Submitted by निशिकांत on 16 August, 2013 - 05:42

पडतो मी अन् उठतोही मी
जीव तोडुनी चालत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

मी रस्त्याचा, रस्ता माझा
वाट कशी ही ना सरणारी
वळणावरती फिरून बघता
दुपार असते रखरखणारी
जीवनातले स्वगत एकटा
मी माझ्याशी बोलत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

परसबागच्या प्राजक्ताने
मला पाहिले उर्जितकाळी
वठला तोही माझ्यासोबत
दु:ख उगाळी सांज सकाळी
मनात तो माझ्या, मी त्यांच्या
आस उद्याची रुजवत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

कितीक आले कितीक गेले
आता उरलो मीच एकटा
विलक्षण अशा कुटुंबातला
वडीलधारा मीच धाकटा
दोष द्यावया कुणीच नाही
माझ्याशी मी भांडत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

गांडिव पेलुन प्रत्त्यंचा मी
काल ताणली आत्मबलाने
झालो दुर्बल, वयस्क जगतो
नशिबाच्या मी कलाकलाने
व्यर्थ!, तरी मी इतिहासाची
सुवर्ण पाने चाळत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

थकलेल्या गात्रांनो ऐका
वेदनेतही बघेन दरवळ
जाण असू द्या, मनात माझ्या
नांदत आहे अजून हिरवळ
वसंतातल्या कवितांना मी
शब्दफुलांनी सजवत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users