थकलो आता. ( जुल्काफिया गजल )

Submitted by निशिकांत on 8 August, 2013 - 01:26

आयुष्याचे खेळ खेळुनी थकलो आता
तुझा जीवना भार वाहुनी पिचलो आता

यत्न करोनी ध्येय असे का मृगजळ ठरले?
अपूर्ण स्वप्ने उरी घेउनी निजलो आता

श्रावणधारा कुठे बरसती? मला न ठावे
वांझोटे नभ, आस लाउनी वठलो आता

खयाल ताजे, मनात उर्मी गजल लिहावी
शब्द नेमके शोधधोधुनी शिणलो आता

ज्यांचा कोणी जगात नसतो तूच तयांचा
तुझी ईश्वरा वाट पहुनी विटलो आता

सदैव वर्दळ आठवणींची सखे एवढी!
दार मनाचे घट्ट लाउनी बसलो आता

नकोनकोसा कोपर्‍यासही अता घराच्या
उपेक्षिताचे भोग भोगुनी खचलो आता

इतिहासाने नोंद कशाला घ्यावी माझी?
मक्त्यामध्ये नाव घालुनी उरलो आता

"निशिकांता"ला अता कशाला औषध गोळ्या?
जगावयाचा नाद सोडुनी सरलो आता

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users