आंधळी कोशिंबीर....!

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 August, 2013 - 01:10

डोळ्यांभवती गच्च आवळून
विश्वासाची घडी
गोल गरगरवत आयुष्य म्हणते..
१,२,३.......रेड्डी ???

फिरता-फिरता सुटतात हात
पटकन जो-तो फिरवतो पाठ
जवळून-दूरुन नुसतेच आवाज
आभासांशी पडते गाठ !

स्थिरावलो स्थिरावलो म्हणता
भोवळ येते थोडी
हिच संधी साधून जग
काढत रहाते खोडी !

हळू-हळू पण येतोच आपसुक
परिस्थितीचा अंदाज !
डोळे मिटूनही ताडू शकतो
अंतरावरले आवाज !

चाचपडत-चाचपडत दिशाहीन
पाऊल-पाऊल टाकतो पुढे
चक्रावणारे लपतात मागे
सावरणारे येतात पुढे !

एखादा सच्चा-मुच्चा दोस्त
स्वतःवर राज्य ओढवून घेतो
ख-या-खोट्या मैत्रिचा
डोळे झाकून प्रत्यय येतो !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादा सच्चा-मुच्चा दोस्त
स्वतःवर राज्य ओढवून घेतो
ख-या-खोट्या मैत्रिचा
डोळे झाकून प्रत्यय येतो ! << व्वा !
आवडलीच कविता ..

surekh.