आयुष्याच्या अर्ध्यावर

Submitted by pulasti on 31 July, 2013 - 13:08

आयुष्याच्या अर्ध्यावर

चढत्या वयाची पोरं आणि उतरत्या वयाचे आईबाप,
एक विलक्षण कातरी असते
सांगितलेलं कुणी काही ऐकेल याची खातरी नसते

खुमखुमी शरीरात असते अजून
पण पोरांबरोबर खेळताना आता पाय लवकर जातात थकून
कंबर थोडी येते धरून

मिळवलेलं... मिळालेलं, खरंच लायकी होती का?
ही शंका फिटत नाही
जे मिळालं नाहिये त्याची आस सुटता सुटत नाही

वास्तवाचं फळ आता
धरणार नाही हे समजून
एकेक स्वप्न पडतं गळून

आयुष्याच्या अर्ध्यावर
असं सगळं शहाणपण येऊनसुद्धा
अटळ गणितं कळूनसुद्धा
पुढे असं जगता येईल का?
आयुष्याच्या अखेरीला
'जगलो होतो'
असं म्हणता येईल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!