लुप्त का मांगल्य झाले?

Submitted by निशिकांत on 30 July, 2013 - 00:45

पुस्तकातिल माणसांचे लुप्त का मांगल्य झाले
देशबुडवे देव बनल्याचे मनाला शल्य झाले

गाव होता हा तसाही भ्याड सत्कर्मी सशांचा
चार कोल्हे दहशतीने राहिले, ऋषितुल्य झाले

धर्म बुडतो रोज येथे, ना कुणी अवतार घेई
तेहतिस कोटींतले का मंद ते जाज्वल्य झाले?

हस्तक्षेपांनीच खाकी यंत्रणा दुर्बल बनवली
प्रश्न पडतो, चोरट्यांना प्राप्त का प्राबल्य झाले?

स्वर्थ बघुनी राजकारण, अर्थकारण खेळल्याने
काल जे साफल्य होते, आज ते वैफल्य झाले

माय मेली त्या क्षणाला पोरका झालो मला मी
हरवले, नाही मिळाले, शोधुनी वात्सल्य झाले

लावला जगण्यास मी जो अर्थ होता, व्यर्थ होता
जन्मण्याचे फक्त मरणाने खरे साफल्य झाले

छंद का "निशिकांत" नाही कोणता जोपासला तू?
फक्त शिकणे पोट भरण्याचे, कला कौशल्य झाले

वैभवाराव (वैवकु) परवा माझ्या घरी आले होते. त्या वेळी वरील गझल त्यांना दाखऊन त्यावर जवळ जवळ दीड तास चर्चा केली. त्यांनी कांही बहुमुल्य सुचना/ दुरुस्त्या सुचवल्या ज्या मी अमलात आणल्या. त्या नंतर बदलेल्या चेहर्‍यामोहर्‍याची गझल आहे ही. वैभवरावांचे आभार.

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋषितुल्य ह्या काफियातल्या अलामतीबद्दल वैभव कुलकर्णी काहीच बोलले नाहीत का निशिकांतजी?

अलिकडे आपल्या गझलांत खयालांचे बेसुमार रीपीटेशन होत आहे त्याच्यावर विचार व्हावा.

मला भयंकर आवडली ही गज़ल.

गाव होता हा तसाही भ्याड सत्कर्मी सशांचा
चार कोल्हे दहशतीने राहिले, ऋषितुल्य झाले>>> व्व्वा!!!

ऋषितुल्य ह्या काफियातल्या अलामतीबद्दल विचार खूप केला
अंतरजालवर जी गझलेची बाराखडी उपलब्ध झाली तीत इतकेच लिहिले होते .................

क्वचित 'अ' च्या जागी ऱ्हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर वापरला जातो. परंतु तो अपवाद समजावा.

या बद्दल काही जाणकार गझलकारांचे मत असेही ऐकले होते की अशी सूट सहसा मतल्यातच आधी स्पष्ट करावी
म्हणजे वाचकाना आधीच अंदाज बांधता येईल की पुढे एखाद्य शेरात असे होवू शकणार आहे की अ ऐवजी इ /उ अलामत येईल म्हणून ______हेच मत मलाही १००%पटते

काकांनी आधीच्या शेरात हे पाळले होते पण तो काफिया जो उ ह्या अलामतीचा होता तो शेराच्या अर्थाला काहीतरीच वळण देत आहे असे आमचे एकमत झाल्यने वगळला / बदलला व पुढील गझलेत केवळ एकाच जागी (एकंदर गझलेत एकाच जागी ) ही सूट उरली
बाराखडीचा आधारही घेतलाच .....

....तरीही निशिकांत काकांनी ; आपण अमुक एका काफियात अमुक एक सूट घेतल्याचा विशेषोल्लेख आवर्जून करायला हवा आहे

(@निशिकांत काका : टीप म्हणून अलामतीची सूट घेतली आहे असे जाहीर करावेत ही विनंती )

माझ्याकडून काही चूक भूल झाली असल्यास क्षमस्व

जन्मण्याचे फक्त मरणाने खरे साफल्य झाले

व्व्वा ! फार आवडला हा मिसरा !
कित्येकांच्या आयुष्याची व्यथा मांडलीत एकाच ओळीतून !

(भट साहेबांचा 'मरणाने केली सुटका . . . . ' आठवला.)
आवडली गझल .