’जगते’ म्हणजे

Submitted by मुग्धमानसी on 29 July, 2013 - 08:35

’असते’ म्हणजे थोडेफार
शुद्धित असतात माझे भास
नाहितर नुसतेच घुम्यासारखे
छातीत झिरपत असतात श्वास!

’हसते’ म्हणजे काळजातून
उगवू देते चांदणवेल
नाहितर दृष्टीआड सगळे
असतेच नेहमी आलबेल

’जाते’ म्हणजे माझ्यामधून
उडून जाते अत्तर बनून
नाहितर बंद रेडिओत सुद्धा
रेंगाळतेच ना चिवट धून...

’रडते’ म्हणजे खरंच काही
ओतून देते डोळ्यांपार
नाहितर नुसत्या पाण्याची तर
आभाळीही लागते धार

’जगते’ म्हणजे विरघळते मी
क्षणाक्षणाने परमेशात
नाहितर नुसतं जिवंत असणं
मंजूर नसतं आकाशात!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages