एकांतप्रवास

Submitted by सई गs सई on 29 July, 2013 - 02:09

चारचौघांमधे उठताबसता
विसरायला झालेलं सत्वं
संभाषणतोल जपताजपता
उथळ झालेलं माझं बोलणं..
हलक्याशा दगडगवतातून
खुळखुळणारा जीवाचा झरा
तीव्र कडाउंचीच्या अंतराने
कर्णकर्कश धबधबा होतो रे..

नात्यांमधल्या अडचणींवर
काढलेले यंत्रतांत्रिक उपाय
उमाळ्यांना थारा नाही मग
समंजसपणे जुळवून घेणं..
रानफुलांची शेती केलेली
पाहिलीयेस का तू कधी?
बांध घालून गवताबरोबर
कसं झुलता येईल त्यांना..

कंटाळलेले रे मी तशा
गर्दीतल्या एकटेपणाला
मोकळी झालेय कधीच
त्या जखड एकटवासातून..
अंधार्‍या हिमरानातल्या
या खोल दरीतूनच जसं
गरूडाला ऐकू यावं धुंद
मरणभुलीचं संगीत..

मुक्तपणे अनुभवतेय
समृद्ध एकांतवासात
कलावंतांच्या सोबतीने
अन्‌ जीवाच्या साक्षीने..
शेवाळलेल्या पाण्याने
ओल मिळेना म्हणून
पाखरं उडून आलीयेत
या वाहत्या झर्‍याकाठी..

गर्दीतल्या एकटेपणापासून
एकांतवासापर्यंतचा प्रवास
उलटपावलांनी पुसून आज
तू परतायला सांगतोयेस?
कालही पाऊस पडला इथे
पुन्हा फुटून वाहतंय पाणी
त्याला तुझ्या त्या जगाचे
बांध घालू म्हणतोस?

नाही जमणार मला..

जग सारून ये म्हटलं
तर येशील तू इथे?

वाट नाही पाहत मी आता..

- सई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! छान अभिव्यक्ती.
"रानफुलांची शेती केलेली
पाहिलीयेस का तू कधी?
बांध घालून गवताबरोबर
कसं झुलता येईल त्यांना.." >>> हे सर्वात विशेष वाटलं.
-----------------------------------------------------------------------
अवांतर :
तिसर्‍या, चवथ्या कडव्यातला आशय एकाच कडव्यात किंवा
आधी/नंतरच्या कडव्यात आणून कविता अधिक सुटसुटीत झाली
असती आणि प्रभाव वाढला असता असे वैम. कृगैन.

धन्यवाद भिडे! Happy
तिसऱ्या कडव्यात मुक्त होतानाचा आणि चवथ्यात मुक्त झाल्यानंतरचा अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय मी, त्यामुळे तो एकत्रित कसा मांडायचा त्याची कल्पना नाही सुचली. असो, सूचनेबद्दलही तुमचे आभार!

मस्त!

वा !
"रानफुलांची शेती केलेली
पाहिलीयेस का तू कधी?
बांध घालून गवताबरोबर
कसं झुलता येईल त्यांना.." >>> हे आवडलं.

अंजली, जाई, साती...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!