अहो अ‍ॅडमिन...

Submitted by विजय देशमुख on 28 July, 2013 - 22:50

"अहो अ‍ॅडमिन जागे व्हा...."

हे वाक्य वाचलं, की अश्याच अर्थाचे अनेक वाक्य आठवतात. लहानपणी आई बरेचदा मला "लष्कराच्या भाकर्‍या कशाला भाजतोस" असं म्हणायची, पण ते नेमकं काय असतं त्यावेळी कळत नव्हतं, ते कळायला लागलं ते मी अ‍ॅडमीन झालो तेंव्हा.

इंटरनेट आलं तसं एकमेकांशी टायपिंग करुन संवाद साधण्याचं एक नवं दालन सुरु झालं. आधी इमेल्स आणि मग चॅटींग... पुढे याहू-ग्रूप्स अशी ओळख होत गेली. त्यावेळी एक सदस्य म्हणुन मी बरेचदा मित्रमैत्रिणी (की मराठी मित्रमैत्रिणी) अश्या एका ग्रूपवर लिहित गेलो. नवनविन मित्र-मैत्रीणींची ओळख झाली. पण ....

स्वतःचे नाव लपवुन कोणत्याही एका खोट्या नावाने लिहिणारे लोकं कसे त्रासदायक ठरु शकतात हे चांगलच समजलं. एकदातर कोणीतरी मराठी-माणुस अश्या आयडीने मराठी लोकंची यथेच्छ निंदा करणारी पोस्ट टाकली अन तो गायब... पुढे अगदी 'निषेध' पासुन xxxxxxx पर्यंतंच्या कॉमेंट्स. आणि 'त्या'ची कसलिही प्रतिक्रिया नसल्यामुळे या रागाचा रोख अ‍ॅडमीनकडे. मग 'अ‍ॅडमीन जागे व्हा' या अर्थाच्या अनेक पोस्टस. त्यात अ‍ॅडमीनने या आयडीला ग्रूपमधुन बाहेर काढा वगैरे....

बरं यात अ‍ॅडमिन काय करणार? याहू ग्रूप चालवणे काही त्यांचा बिजिनेस नव्हता किंवा त्यातुन त्यांना काही पैसेहि मिळत नव्हते. पण या परिस्थितीत लोकं काहिच ऐकुन घेत नसतात. त्यांना त्यांच्या मतानुसारच अ‍ॅडमीनने वागवं अशी अपेक्षा असते.

पुढे याहू-ग्रूपची जागा ऑर्कुटने आणि नंतर फेसबुकने घेतली. इथे अ‍ॅडमिन अगदी नावापुरता म्हटलं तरी चालेल कारण किमान याहू ग्रूपमध्ये पोस्ट मॉडरेट करता येत असे. अश्याच एका ग्रूपचा मीही अ‍ॅड्मीन झालो. सदस्य - कोरियातील भारतीय.

भारत एक विचित्र देश आहे. मार्क ट्वेनने म्हटलय "एक भारतीय, तत्वज्ञ असतो, दोन म्हणजे चर्चा आणि तीन म्हणजे गोंधळ..." हे कोणत्याही भारतीय गटाला लागू पडणारं वाक्य. त्यात फेसबुक म्हणजे २-४ वाक्यात गोंधळ निर्माण करता येईल असं ठिकाण. तिथे फार विचार करुन लिहाव लागत नाही. त्यामुळे कोणीही काहीही लिहु शकतो. वेगवेगळ्या भाषा, (प्रत्येकाला) असलेला भाषेचा अभिमान (का दुराभिमान?), त्यातली गटबाजी, या सगळ्यांना त्यावेळी बर्‍याच लोकांचं उत्तर एकच असायचं, ते म्हणजे नको असलेली पोस्ट डिलिट करणे. पण नुस्ती पोस्ट डिलिट करुन कसं होईल? करण ती पोस्ट टाकुच नये यासाठी काही सदस्यांचा 'त्या' सदस्याला काढुन टाकणे...

पण ह्या लष्कराच्या भाकर्‍या भाजतांना, मी पूर्वी जिथे फक्त सदस्य होतो, अश्या ग्रूपच्या अ‍ॅडमीनची नक्कीच आठवण येते. संतुलीत मतं असणारा, सहसा न चिडणारा, आणि भलेही एखाद्या मताशी सहमत नसेलही, पण ते मत मांडण्याचा अधिकार काढुन न घेणारा, असा काहीसा अ‍ॅड्मीन बनणे हे खरच कठीण काम आहे.
बरेचदा, काही व्यक्ती केवळ लक्ष वेधुन घेण्यासाठी काही वादग्रस्त पोस्ट टाकतात. त्यावर अ‍ॅड्मीनची भुमिका खुपच महत्वाची असते...तेही शिकायला मिळालं. कोणताही प्रश्न संवादाने सुटू शकतो, आणि तो सोडवला पाहिजे खूप मोठं तत्वज्ञान प्रत्यक्ष शिकण्यात जो आनंद मिळतो आणि कधीकधी कट्टर विरुद्ध मतं असणारी माणसं चांगले मित्र कसे बनतात, हा अनुभव वेगळाच.
नाही प्रत्यक्ष जीवनात, पण किमान ऑनलाईन ग्रुपवरतरी अ‍ॅडमीन बनण्याचे स्वप्न पुर्ण झाले आणि बर्‍याच अंशी यशस्वीही. अश्या अनेक लिखाणातुनचतर माणुस घडत असतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि तितकी भिन्न मते, याचा विचार केला तर (आणि तरच) आपल्याला 'अहो अ‍ॅडमीन' अशी आरोळी ठोकायची गरज पडणार नाही किंवा स्वतःचे लिखाण खोडावे लागणार नाही... काय म्हणता?

बाय द वे, अहो मायबोली अ‍ॅडमीन - तुम्ही ग्रेट आहात... तुम्हाला खरच दंडवत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users