संभवामि युगे युगे

Submitted by विनायक उजळंबे on 25 July, 2013 - 23:43

खरं सांगायंच तर,
मला राधेच्या हाती द्यायची होती बासरी,
पण तिला कृष्ण हवा होता,
मी तिला देह देणार होतो ,
पण तिला गुण हवा होता ,
मी धर्म देणार होतो,
तर तिनं प्रेमालाच धर्म बनवलं,

आणि तसं खरं सांगायच तर ..
मला सुदाम्याला द्यायचे होते पोहे ..
अगदी स्वत: करुन
पण सुदाम्याला मी हवा होतो ..
मी त्याला किर्ती देणार होतो ..
त्याला मैत्री हवी होती ..
आणि त्यानं मैत्रीला किर्ती मिळवुन दिली ..

आणि खरं सांगायंच तर,
मला करायचे होते अनेक प्रयोग ,
मी माणुस बनवला,
त्याला लढायंच शिकवलं,
विजीगिषु बनवंल ,
आणि मी पहात राहीलो त्याचा लढा ,
मी सृष्टी पाण्यात बुडवली,
तर त्याने जलचराशी केली जवळीक
जगला, वाचला अन पुन्हा
मला "देव" करुन काढली माझीच आगळीक ..

आणि अगदी खरं सांगायंचे तर ,
मला पुन्हा पुन्हा नको होता जन्म ..
मला मोक्ष घेऊन सांगायचे होते मर्म ..
मला गीतेत मोक्षाचा धर्म सांगायचा होता ,
पण मी कर्माला मोक्ष बनवला ,
"कर्मण्येवाधिकारस्ते " म्हणत ..
आणि येत राहीलो पुन्हा पुन्हा,
"संभवामि युगे युगे " म्हणत ..!!

विनायक
२४ जुलै २०१३
http://blog.vinayakujalambe.com/2013/07/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयीजी,
बदल केला आहे .
>>>>>>>>>>>>>>>>>

अश्विनीजी आणि रणजीत ,

शेवटच्या ओळीत किंचित बदल केला वाटले थोडी कवितेकडे झुकेल . पण इतकेच करू शकलो .

रणजित,

मध्यंतरी कुठेतरी तू म्हणालेला की शेर / कविता झाल्यावर आपण आपल्याला प्रश्न विचारावा
बरं मगं ?

तेव्हा ते पटलेले .

सध्या त्याच्या पुढे जाउन मी म्हणेन कि मला हा प्रश्नच पडू नये असे काही या कवितेने दिले .
त्यामुळे त्याला कविता म्हणायला मी कचरणार नाही .
आता गद्या कडे झुकलेली कविता असे काही असते तर तसे समज !!

अरे वा, विनायक! तुमची श्रीकृष्णाशी असलेली जवळीक जाणवते. Happy कविताही मस्त आहे.
आ.न.,
-गा.पै.