'बेफिकीर' मृत्यूचा निरमा महाग झाला आहे

Submitted by बेफ़िकीर on 20 July, 2013 - 13:05

कुचंबणेच्या शिखरावरती ताटकळत आहे मी
दरी प्रतिष्ठेची बघुनी नुसताच चळत आहे मी

कसा तुला जाऊ सामोरा कळले असूनसुद्धा
तुझी कीव आल्याने दैवा बारगळत आहे मी

असे तुला कळवायाचीही मजा वेगळी आहे
मला न जितका कळलो तितका तुला कळत आहे मी

पाय जमीनीवर नसल्याची करू नका रे टीका
मी इथला नाहीच, नभाला लोंबकळत आहे मी

सरळ चाललो असतो तर अपघात जाहला असता
वाट वळत आहे जेथे तेथेच वळत आहे मी

तुझ्या सोडुनी जाण्याचा परिणाम भोगतो आहे
तुझ्या हेलकाव्यांची शप्पथ हिंदकळत आहे मी

कुणी न सांगे छाती ठोकुन की आवडलो होतो
जसा निनावी अश्रू गळतो तसा गळत आहे मी

क्षेत्र कोणते कोणाचे यावरती सारे ठरते
लोकांना चालता न येते तिथे पळत आहे मी

काल पाहिले स्वप्न चुकीने क्षमा करा प्रेताला
कुणी न अग्नी दिला तरी तोर्‍यात जळत आहे मी

'बेफिकीर' मृत्यूचा निरमा महाग झाला आहे
देहाला बनवून वस्त्र दररोज मळत आहे मी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईल्ला! पार खल्लास! मस्त गझल आहे. गळत, जळत, मळत खासकरून आवडले. सुट्या द्विपदिंपेक्षा गझल म्हणून एकत्रितपणे अधिक प्रभावी आहे. The whole is bigger than sum of its parts.
-गा.पै.

'बेफिकीर' मृत्यूचा निरमा महाग झाला आहे
देहाला बनवून वस्त्र दररोज मळत आहे मी>>> अप्रतिम!!! तशी पूर्ण गझलच आवडली.. जियो बेफी... त्रागा पोहोचला...

कसा तुला जाऊ सामोरा कळले असूनसुद्धा
तुझी कीव आल्याने दैवा बारगळत आहे मी
.
असे तुला कळवायाचीही मजा वेगळी आहे
मला न जितका कळलो तितका तुला कळत आहे मी

क्या बात!

असे तुला कळवायाचीही मजा वेगळी आहे
मला न जितका कळलो तितका तुला कळत आहे मी...वाह वा वा !

सरळ चाललो असतो तर अपघात जाहला असता
वाट वळत आहे जेथे तेथेच वळत आहे मी......अफलातून खयाल !!

धन्यवाद!

>>तुझ्या सोडुनी जाण्याचा परिणाम भोगतो आहे
तुझ्या हेलकाव्यांची शप्पथ हिंदकळत आहे मी

कुणी न सांगे छाती ठोकुन की आवडलो होतो
जसा निनावी अश्रू गळतो तसा गळत आहे मी

क्षेत्र कोणते कोणाचे यावरती सारे ठरते
लोकांना चालता न येते तिथे पळत आहे मी

काल पाहिले स्वप्न चुकीने क्षमा करा प्रेताला
कुणी न अग्नी दिला तरी तोर्‍यात जळत आहे मी

या तोर्‍याला सलाम ! ले.शु.

पाय जमीनीवर नसल्याची करू नका रे टीका
मी इथला नाहीच, नभाला लोंबकळत आहे मी

सरळ चाललो असतो तर अपघात जाहला असता
वाट वळत आहे जेथे तेथेच वळत आहे मी >>> हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------
मक्त्यातील 'निरमा' हा शब्द प्रॉडक्ट-नेम म्हणून वापरला आहे की या शब्दाला काही विशिष्ट अर्थ आहे
हे न कळल्याने मी गूगल्/ऑन-लाइन डिक्शनरीत शोध घेतला पण अर्थ सापडला नाही.

माझ्या मनातील हा संभ्रम दूर होऊ शकेल का ?

मक्त्यातील 'निरमा' हा शब्द प्रॉडक्ट-नेम म्हणून वापरला आहे की या शब्दाला काही विशिष्ट अर्थ आहे
हे न कळल्याने मी गूगल्/ऑन-लाइन डिक्शनरीत शोध घेतला पण अर्थ सापडला नाही.>>>>

कोलगेट, निरमा, झेरॉक्स, पितांबरी इ. ही नामे जरी विशेष नामे असली तरी ती सामान्य नामासारखी वापरली जातात. उल्हासजी आता आपल्या लक्षात यावे Happy

विदिपा,
उल्हासजी आता आपल्या लक्षात यावे >>> माझ्या ते आधीच लक्षात आले होते... 'डालडा' प्रमाणे.
फक्त या शब्दाला अन्य काही अर्थ*** आहे का असा शोध घ्यायचा प्रयत्न केला. यात काही चुकलं का ?

(*** जसं 'apple')