पुन्हा सावल्यांच्या खुणा भोवताली

Submitted by रोहितकुलकर्णी on 19 July, 2013 - 14:29

पुन्हा सावल्यांच्या खुणा भोवताली
पुन्हा मावळाया उन्हे सज्ज झाली

तुझे भास चोहीकडे पांगलेले
पुन्हा पावलांची दिशाभूल झाली

इथे दु:ख ओलावते रोज संध्या
पुन्हा पाहुणी वेदना खोल गेली

किती सोसले घाव अंधारयात्री
पुन्हा रक्तवर्णी नभी रात्र झाली

अनामी निनावी व्यथा सोबतीला
चला पावलांनो! निघू वेळ झाली

- रोहित कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझे भास चोहीकडे पांगलेले
पुन्हा पावलांची दिशाभूल झाली

अनामी निनावी व्यथा सोबतीला
चला पावलांनो! निघू वेळ झाली

व्वा.
शुभेच्छा.

छान

शेर सगळेच आवडले त्यातही दिशाभूल झाली व वेळ झाली हे जास्त छान वाटले
पण अलामत काय आहे न समजल्यामुळे गझल तंत्रानुसार गझल म्हणता येईल का ही शंकाच आहे मला तरी

पुन्हा पाहुणी वेदना खोल गेली<<< ही ओळ व हा शेर या गझलेत बसू शकणार नाही, गझलतंत्रानुसार!

अनामी निनावी व्यथा सोबतीला
चला पावलांनो! निघू वेळ झाली<<< सुंदर शेर!

वै व कु - अलामत 'आ' आहे.

तुझे भास चोहीकडे पांगलेले
पुन्हा पावलांची दिशाभूल झाली>> वा!

तुझे भास चोहीकडे पांगलेले
पुन्हा पावलांची दिशाभूल झाली>>मस्त आहे

अनामी निनावी व्यथा सोबतीला
चला पावलांनो! निघू वेळ झाली..>>हे खूप मस्त आहे!!

आवडली!!!!

मी ''आ'' वासून ही गझल वाचली. मग असे लक्षात आले की अलामत हा प्रकार वापरताना चूक झाली आहे. गझल स्वीकारायचीच ठरविले तर आ ही अलामत मान्य करावी लागेल. पण ५ पैकी ४ शेरांमध्ये ''झाली'' असा रदीफ आहे. त्यामुळे आ ही अलामत किंवा रदीफ काहीतरी चुकले आहे. अर्थात ही झाली तंत्राबद्दलची बाब. रदीफ, अलामत, काफिया यांचे तंत्र चुकले असले तरी ते मान्यताप्राप्त वृत्तात लिहिल्यामुळे बहुदा, त्यावर फार टीका कुणी केली नाही. असो.

विषय चांगला मांडला आहे त्याबद्दल रोहित यांचे धन्यवाद. मात्र, दुसरा शेर आधी कुठेतरी वाचलेल्या शेराशी साधर्म्य साधणारा वाटला. आत्ता नक्की आठवत नाही.

कविता म्हणून नक्कीच आवडली.