रात्र........

Submitted by अमोल परब on 18 July, 2013 - 14:44

केली लाख आर्जवे
तरी सांज हात सोडवून गेली
नको नको म्हणताना
मला ह्या रात्रीस बांधुन गेली

मिटले सारे नकाशे
सार्‍या दिशा विझुनी गेल्या
होता जिचा दिलासा
ती सावलीही पळून गेली

येई काळोख अंगचटीस
लोचट वारा झोंबे तनामनास
उडताना घरावरी टिटवी
अंगभर शहारा टाकित गेली

मेघ नौबती झाडती
आसमंत गडगडाटी हासे
तो पोहचला वेशीवर
वर्दी दामिनी देऊन गेली

वाटे पळुनी जावे
तर तो दारी उभा ठाकला
मदतीस मारली आरोळी
त्याच्या हसण्यात विरुनी गेली

मग लेवुनी त्याची वासना
रात्र पसरली या माळराना
तो तोडित असता लचके
चांदणी हुंदका दाबित गेली

चंद्र लपला ढगाआड
आसमंत निशब्द झाला
मी फ़ोडित राहिले टाहो
अन वैरी रात्र रंगात आली

अखेर झाली उतरती ती रात्र
मग उगवली पहाट सुतकी
ऐकता व्यथा या उष्ट्या देहाची
माझी मलाच शिसारी आली

दिस झाला केविलवाणा
घरी सात्वंन करुन गेला
दररात्री का हिच शिक्षा?
अशी काय चुक झाली?

कधी संपेल का हा फ़ेरा?
देण्या उत्तर सांज हजर झाली
नको नको म्हणताना
पुन्हा या रात्रीस बांधुन गेली

- अमोल परब

Group content visibility: 
Public - accessible to all site users