विषय क्र. १ - सुवर्णकाळाची स्वप्न दाखवणारं कांस्य पदक

Submitted by Adm on 16 July, 2013 - 04:14

राष्ट्रउभारणी ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. राष्ट्राच्या निर्मितीनंतर राजकीय धोरणे, आर्थिक स्थैर, परराष्ट्रीय संबंध ह्याच बरोबर सामाजिक जडणघडण सुद्धा योग्य दिशेने होणं अतिशय महत्त्वाचं असतं. राष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत जी वेगवेगळी क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातील एक म्हणजे क्रीडा क्षेत्र. क्रिडाक्षेत्रातला सहभाग आणि यश हे देशातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतं, देशाला स्वतःची एक ओळख मिळवून देतं आणि एकीची, राष्ट्रीयत्त्वाची भावना रुजवतं. खेळांमध्ये जातिपाती, धर्म, प्रांत वगैरेच्या भिंती दुर ठेऊन राष्ट्रीय अस्मितेला जागृत करण्याचं तसच संपूर्ण राष्ट्राला सामूहिक आनंद देण्याचं एक सामर्थ्य असतं. आजच्या काळात क्रिडाक्षेत्रातलं अर्थकारण ही सुद्धा अतिशय महत्त्वाची बाब बनलेली आहे. आज विकसित देशांबरोबरच अनेक विकसनशील देश, देशाच्या जडणघडणीतलं क्रिडाक्षेत्राचे महत्त्व ओळखून क्रिडासंस्कृती आपल्या देशात जाणीवपूर्वक रुजवत आहेत. एशियाड, कॉमनवेल्थ, ऑलिंपीक ह्यांसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखत आहेत आणि खेळाडूही उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करत क्रिडाक्षेत्रात यश मिळवण्यासाठी, आपल्या देशाचं नाव उंचावण्यासाठी जिवाचं रान करत आहेत.

ऑलिंपीक सारख्या जागतिक स्पर्धेमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवणं ही अशक्य बाब नक्कीच नव्हती. भारताच्या हॉकी संघाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिळून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ८ सुवर्णपदकं मिळवली आहेत आणि त्यातलीही सहा सलग! भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतरच्या स्पर्धांमधल्या पदक समारंभात तिरंगा फडकवला गेला असेल, भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजवली गेली असेल, खेळाडू साश्रू नयनांनी भारावून गेले असतील, भारतीय पाठीराख्यांनी जल्लोष केला असेल! पण हे सगळे कधी तर आमच्या पिढीच्या जन्माच्या आधी! भारताने हॉकीतलं शेवटचं सुवर्णपदक मिळवलं ते १९८०च्या मॉस्को ऑलिंपीकमध्ये जेंव्हा अमेरिकाधार्जिण्या देशांनी (ह्यात पाकिस्तानही होते) स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. आमची पिढी ऑलिंपीक बघायला लागली त्यावेळी ऑलिंपीकमध्ये भारतासाठी अतिशय निराशाजनक चित्र होतं. अनेक कारणांनी हॉकी संघाची वाताहात झालेली होती. वैयक्तिक खेळांमध्ये अव्वल भारतीय खेळाडू आणि जागतिक खेळाडू ह्यांच्यात पडलेली दरी फार मोठी होती. बरीच राष्ट्रे स्वतंत्र होऊन काही प्रमाणात स्थिर झाल्याने क्रिडाक्षेत्रातली स्पर्धाही विलक्षण वाढली होती. गुरबाचन सिंग रांधवा, फ्लाईंग सीख मिल्खा सिंग आणि सुवर्णकन्या पी.टी. उषा ह्यांची वैयक्तिक पदकं अगदी थोडक्यात हुकल्याने भारतीय क्रिडाप्रेमी हळहळले होते. एकदा तर महिला हॉकी संघ (हो! महिला हॉकी संघच) पदकापर्यंत पोहोचणार असं वाटत असताना अचानक हरला होता. एकंदरीत १९८० नंतरच्या लॉस एंजेलीस, सोल आणि बार्सिलोना अशा सलग तीन स्पर्धांमध्ये भारताची पाटी कोरीच राहिली होती. त्यामुळेच अटलांटा ऑलिंपीक स्पर्धेत टेनिसपटू लिएंडर पेसने मिळवलेलं पदक ही भारताच्या क्रिकेटेतर क्रिडाक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. हे जरी कांस्यपदक असलं तरी ह्या पदकाने जुन्या पिढीतल्य भारतीयांना गतवैभवाची आठवण करून दिली तर नवीन पिढ्यांना देशाने ऑलिंपीक स्पर्धेत पदक जिंकण्याचा अनुभव दिला.

तसं बघायला जाता लिएंडरचं पदक हे स्वतंत्र भारतातल्या भारतीयाने मिळवलेलं दुसरं वैयक्तिक पदक. खाशाबा जाधवांनी कुस्तीत कांस्यपदक मिळवल्यानंतर तब्बल ४४ वर्षांनी मिळवलेलं. परंतु ह्या ४४ वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. खाशाबा जाधवांनी पदक मिळवण्याच्या बातमीला त्या काळात वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर स्थान मिळालं नव्हतं. खाशाबांचे जंगी सत्कार समारंभ वगैरेही झाले नव्हते. केवळ ५ वर्षे वय असलेल्या देशाने खाशाबांच्या यशाची मर्यादीत प्रमाणावर दखल घेतली होती. त्याउलट अटलांटा ऑलिंपीकच्या वेळी भारत देश पन्नाशीच्या उंबरठ्यावर होता. त्याचवर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात भरली होती. देशातील वातावरण क्रिकेटमय झालेलं होतं. इतर खेळ 'यश मिळाल्याशिवाय पैसा मिळत नाही आणि आर्थिक पाठबळाशिवाय यश मिळत नाही' ह्या चक्रात अडकलेले असताना, क्रिकेटने यश आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टींचं गणित बर्‍यापैकी जमवलेलं होतं. क्रिकेटेतर खेळांसाठी चांगली गोष्ट एव्हढीच की खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आलेल्या बर्‍याच देशी विदेशी दूरसंचार वाहिन्यांवरून भारतीयांना ऑलिंपीकसारख्या जागतिक स्पर्धा घरबसल्या पहाण्याची संधी मिळत होती.

लिएंडर म्हणजे वेस आणि जेनिफर ह्या पेस दांपत्याचं अपत्य. वेस पेस भारताकडून हॉकी खेळत. ते १९७२च्या ऑलिंपीक कांस्यपदक विजेत्या संघाचे सदस्य होते तर जेनिफर पेस भारतीय बास्केटबॉल संघाच्या सदस्य होत्या. घरात इतकी तगडी क्रीडा पार्श्वभूमी असल्याने लिएंडरने कुठलातरी खेळ खेळणं स्वाभाविक होतं. लिएंडरने वयाच्या पाचव्या वर्षी टेनिसची रॅकेट हातात घेतली तर बाराव्या वर्षी अमृतराज टेनिस अ‍ॅकेडमीमध्ये टेनिसचे धडे गिरवायला सुरुवात केली. अवघ्या पाच वर्षात तो ज्युनियर गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आणि त्याने मानाची विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकली. पुढे तो भारतीय डेव्हिस कप संघाचा अविभाज्य घटक बनून गेला आणि त्याबरोबरच व्यावसायिक टेनिसमध्ये एकेरी आणि दुहेरी प्रकारात चमकू लागला. डेव्हिस कप स्पर्धेत अधून मधून आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना धक्केही देऊ लागला. लिएंडर त्याकाळचा भारताचा अव्वल टेनिसपटू असला तरी अटलांटा ऑलिंपीक स्पर्धेच्यावेळी तो जागतिक क्रमवारीत तब्बल १२६व्या स्थानावर होता.

१९९६च्या सरत्या उन्हाळ्यात २४ वर्षांचा लिएंडर ऑलिंपीक स्पर्धेसाठी भारतीय चमूबरोबर अटलांटाला दाखल झाला. त्याकाळात तो काही जबरदस्त टेनिस खेळत होता अशातला भाग नाही. त्यामुळे क्रिडा रसिक तसेच समिक्षक, टेनिस मधल्या एकेरीच्या कुठल्याही पदकासाठी लिएंडरला दावेदार मानत नव्हते. अटलांटा ऑलिंपीक मधले टेनिसचे सामने अटलांटा शहरापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर असलेल्या स्टोन माऊंटन परिसरात होणार होते. अटलांटातल्या कडक उन्हाळ्यात सगळ्या खेळाडूंच्या शारिरीक क्षमतेचा कस लागणार हे नक्की होते.

पहिल्या फेरीत लिएंडरची गाठ पडली ती जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानावर असलेल्या अमेरिकन रिची रेनगर्बशी. रेनबर्गला घरच्या वातावरणाचा तसेच प्रेक्षकांच्या पाठींब्याचा फायदा मिळणार होता. दोन्ही खेळाडू अतिशय जिद्दीने खेळत होते. आपली सर्व्हिस न गमावता गेमची संख्या नेहमी बरोबरीत ठेवत होते. अखेर पहिला सेट टायब्रेकरला गेला. टायब्रेकरमध्ये लिएंडर अडखळला आणि रेनबर्गने टायब्रेकर ७-२ अशा फरकाने जिंकून सेट खिशात घातला. प्रेक्षकांनी जल्लोष केला. दुसरा सेटही खूप चुरशीचा झाला. पहिल्या सेट प्रमाणेच तो ही टायब्रेकरला गेला. अर्थात ह्या वेळी मात्र पेसने हार मानली नाही. दुसर्‍या सेटचा टायब्रेकर त्याने ९-७ असा खेचून आणला. गरम हवेत अतिशय दमणूक करणारे दोन सेट खेळल्यानंतर रेनबर्गला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली आणि लिएंडरने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या फेरीत त्याची गाठ होती ती व्हेनेझुएलाच्या निकोलस परेराशी. तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्याशी असलेला हा सामना लिएंडरने दोन सरळ सेटमध्ये जिंकला. ह्या विजयानंतरही त्याची दखल घेण्यास फार कोणी उत्सुक नव्हते कारण अमेरिका तसेच युरोपीय देशांचे तगडे खेळाडू अजूनही स्पर्धेत होते. तिसर्‍या फेरीत लिएंडर समोर स्विडनच्या थॉमस एन्क्विस्टचे आव्हान होते. एन्क्विस्ट म्हणजे क्रमवारीत दहाव्या क्रमांकाचा खेळाडू आणि त्यावेळचा एक उगवता तारा मानला जात असे. एन्क्विस्टचाही लिएंडरने सरळ सेटमध्ये फडशा पाडला. आता मात्र क्रिडासमिक्षकांना लिएंडरची दखल घेणं भाग पडलं. पुढच्या फेरीत लिएंडरची गाठ पडली ती इटालियन रझानो फुर्लानशी. फुर्लान लिएंडरपेक्षा बर्‍याच वरच्या क्रमांकावर असूनही लिएंडरने अगदी सहज विजय मिळवला. भारतीय पथकातले इतर खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना लिएंडर एकामागून एक फेर्‍या जिंकत असल्याने सगळ्यांच्या नजरा लिएंडरवर खिळल्या. आता उपांत्य फेरीत त्याच्यासमोर आव्हान होते ते दस्तुरखुद्द आंद्रे अगासीचे! अव्वल मानांकित अगासी सुरवातीपासूनच सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता आणि तो ह्या स्पर्धेत जबरदस्त टेनिस खेळत होता. सामना सुरु झाल्यावर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत पहिला सेट टायब्रेकरला नेला. बघता बघता आघाडी घेत लिएंडर सेट पॉईंट पर्यंत पोहोचला परंतु जिद्दी अगासीने अव्वल क्रमांकाला साजेसा खेळ करत दोन सेट पॉईंट वाचवून सेट खेचून घेतला आणि दुसरा सेट त्यामानाने सहज जिंकून सामना जिंकला. पराभवानंतरही लिएंडरला पदक मिळवायची अजून एक संधी होती. कांस्य पदकासाठी त्याचा सामना ब्राझिलच्या फर्नांडो मेलिगनीशी होणार होता. अशातच लिएंडरच्या मनगटाला दुखापत झाल्याची बातमी आली. सामना वादळी पावसामुळे पुढे ढकलला गेला. ह्यात अजून भर म्हणजे सामना सुरु झाल्यावर लिएंडरला लय सापडेपर्यंत त्याने पहिला सेट ६-३ फरकाने गमावला सुद्धा! इतकं हातातोंडाशी आलेलं पदक निसटयत की काय ह्या काळजीने भारतीय क्रीडा रसिकांच्या तोंडचं पाणी पळालं. पण व्यावसायिक स्पर्धेपेक्षा देशाचे प्रतिनिधीत्त्व करताना लिएंडरचा खेळ खूप बहरतो, त्याच्यात दहा हत्तींच बळ संचारतं ह्याची प्रचिती ह्या स्पर्धेतही आली. मनगटाच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत जिद्दीने पुढचे दोन सेट जिंकून त्याने कांस्य पदक अक्षरशः खेचून आणलं. भारतीय पाठीराख्यांनी जल्लोष केला. पदकप्रदान समारंभात आंद्रे अगासी आणि सर्जी ब्रुग्वेरा सारख्या दिग्गज खेळांडूबरोबर आपल्यातला एकजण असलेला बघून भारतीयांची मान उंचावली! अनेक वर्षांत जे घडलं नाही ते आज घडताना पाहून तमाम भारतीय क्रीडा रसिक भारावून गेले होते. आपणही पदक जिंकू शकतो ही जाणीव झाली. लिएंडरच्या यशाचं देशभरात जोरदार कौतुक झालं.

लिएंडरच्या पदकाने रातोरात सारं बदललं का? तर अजिबात नाही! ह्या स्पर्धेनंतर दोन वर्षांनी झालेल्या आशियाई तसचं कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पदकतक्त्यातला भारताचा क्रमांक आधीच्या स्पर्धांपेक्षा घसरला. क्रिडारसिकांकडून अजूनही क्रिकेटेतर खेळांना दुय्यम वागणूक दिली जात होती. जागतिक खेळांडूच्या तुलनेत भारतातले खेळाडू अजूनही खूप कमी पडत होते. पुढच्या सलग दोन ऑलिंपीक स्पर्धांत भारताने एकेका पदकावरच समाधान मानले होते. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे करनाम मल्लेश्वरी ही ऑलिंपीकमध्ये पदक मिळवणारी पहिला भारतीय महिला खेळाडू ठरली, तर राज्यवर्धन राठोडने पहिले वैयक्तिक रजत पदक जिंकले. पण लिएंडरच्या पदकामुळे भारतातील लोकांचा ऑलिंपीककडे पहाण्याचा दृष्टीकोन मात्र नक्कीच बदलला. त्या काळातले पालक आपल्या मुलांच्या खेळाकडे थोड्या गांभीर्याने पाहू लागले. खेळात गती असेल तर खेळातही करियर करता येऊ शकतं हा विचार हळूहळू रुजायला लागला. तसच ह्याच काळात माहितीच्या उपलब्धतेमुळे खेळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढला. बदलत्या वातावरणामुळे ह्या काळात जी पिढी बाल्यावस्थेत होती, खेळांचे प्रशिक्षण घेत होती, ती पुढे उत्तम निकाल देऊ लागली. २००२ च्या आशियाई स्पर्धांमध्ये भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली. २००६ आणि २०१०च्या स्पर्धांमध्ये तर भारताने अनुक्रमे तब्बल ५३ आणि ६५ पदके पटकावली. हीच कथा कॉमनवेल्थ स्पर्धेची. २००६च्या स्पर्धेत कामगिरी उंचावलीच पण घरच्या मैदानावर भरलेल्या २०१०च्या स्पर्धेत भारताने पदकांची शंभरी गाठून इंग्लड, कॅनडा सारख्या देशांना मागे टाकत पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. विविध खेळांच्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चमकू लागले, विजेतेपदं मिळवू लागले. लहान स्पर्धेतलं हे यश ऑलिंपीकमध्ये न दिसेल तरच नवल! २००८च्या बिजींग ऑलिंपीक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच अभिनव बिंद्राच्या रूपाने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं आणि भारताच्या राष्ट्रगीताची धून ऐकून आणि तिरंगा फडकताना पाहून भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर २०१२च्या लंडन ऑलिंपीक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण सहा पदके पटकावून आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

आता तर सरकारी पातळीवर ऑलिंपीकमध्ये ४० पदके मिळवण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांची आखणी होत आहे. स्वत: लिएंडर पेस सकट काही वरिष्ठ खेळाडू ऑलिंपीक गोल्ड क्वेस्ट, मित्तल चॅंपियन ट्रस्ट सारख्या संस्थांमार्फत ऑलिंपीक मधल्या पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज सुशील कुमार, विजेंदर सिंग, गगन नारंग, रोहन बोपण्णा, साईना नेहवाल, मेरी कोम, राही सरनौबत सारख्या वेगवेगळ्या खेळांत पारंगत खेळाडूंची फौज भारतात तयार होते आहे. टेनिस, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स बरोबरच नेमबाजी, तिरंदाजी, जलतरण, बॉक्सिंग सारख्या खेळांकडेही अनेक जण वळत आहेत. इतर खेळांसाठी लागणार्‍या पायाभूत सुविधांचा हळूहळू का होईना पण विकास होत आहे. बॅडमिंटन/टेनिस सारख्या खेळांमधले सिटी लीग सारखे प्रयोग, वार्षिक मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन अश्यांसारखे उपक्रम वेगवेगळ्या शहारांमध्ये केले जात आहेत. बाहेरच्या देशांसारखी क्रिडासंस्कृती आपल्या देशातही हळूहळू रुजत आहे. आज भारतीय क्रिडाप्रेमी क्रिकेटबरोबरच इतर खेळांमधल्या स्पर्धा तसेच एशियाड, ऑलिंपीकसारख्या जागतिक पातळीवरच्या क्रिडास्पर्धांमधल्या सुवर्णकाळाची स्वप्न पहात आहेत. पुढील स्पर्धांमध्ये भारत भरघोस यश मिळवेलच पण ही सुवर्ण काळाची स्वप्न पहायला निमित्त देण्याचं आणि भारतातल्या क्रिकेटेतर क्रिडाक्षेत्राला गती देण्याचं काम लिएंडर पेसच्या कांस्य पदकाने अगदी योग्यवेळी आणि चोख बजावलं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलंय. आवडला निबंध.

लिएंडरला लय सापडेपर्यंत>> याविषयी लिअँडरने लिहिलं होतं की कोर्टवर तिरंगा फडकताना दिसला आणि मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली. भारतीय प्रेक्षक ओरडून मला पाठिंबा देत होते आणि मला स्फुरण चढत होतं.
हा निबंध वाचून ते सगळं आठवलं Happy

चांगले लिहिले आहे. पदकविजेत्यांच्या देशांचे वर जाणारे राष्ट्रध्वज आणि पेसच्या डोळ्यांना लागलेली धार हे दृश्य मनावर पक्के ठसले आहे.

Adm,

छान लेख आहे. टेनिसातले एबीसी म्हणजे अमृतराज-बोर्ग-कॉनर्स होते हे आठवले. पण लियांडर तो लियांडरच! Happy

आ.न.,
-गा.पै.

पण व्यावसायिक स्पर्धेपेक्षा देशाचे प्रतिनिधीत्त्व करताना लिएंडरचा खेळ खूप बहरतो, त्याच्यात दहा हत्तींच बळ संचारतं ह्याची प्रचिती ह्या स्पर्धेतही आली >>+१. तो सामना आठवला पटकन.

पण व्यावसायिक स्पर्धेपेक्षा देशाचे प्रतिनिधीत्त्व करताना लिएंडरचा खेळ खूप बहरतो, त्याच्यात दहा हत्तींच बळ संचारतं ह्याची प्रचिती ह्या स्पर्धेतही आली >>> +१

आवडला निबंध.

छान लिहीले आहे पराग.
विशेषत: सर्व मुद्दे नीट कव्हर झालेत. रातोरात परिस्थिती न बदलण्याचा परिच्छेद विशेष आवडला.

पग्या, मस्त लेख.

लिएंडर पेस भारतच्या झेंड्याखाली खेळताना प्रचंड जिगर दाखवतो... त्यानी डेव्हिस कप मधे गोरान इहानसेव्हिकला हारवले होते ती मॅच पण जबरीच होती.. पहिले दोन सेट हारल्यानंतर त्यानी मॅच खेचून आणली होती... ऑलिम्पिकच्या आधी एक वर्षच त्यानी हा पराक्रम केला होता.

पाकिस्तानविरुद्धची डेव्हिस कप टाय -मुंबईत झालेली. चार सामन्यांनंतर स्कोर २-२.
पाचव्या रिव्हर्स सिंगलसाठी लिअँडर मैदानात. त्याच्या पायात गोळे आले होते. धावणं काय चालणंही कठीण होतं. सामना हातातून निसटत चाललेला. आता बघवणार नाही म्हणून टीव्ही बंद केला. दुसर्‍या दिवशी पेपरात पेसने सामना जिंकल्याची बातमी होती. क्रँप्स जाईपर्यंत त्याने सामना लांबवला आणि मग ताब्यात घेतला.

अरे वा! मस्त विषय. मजा आली वाचायला. Happy

तेव्हा लिएण्डरचे हे सामने पहायला मिळाले नव्हते. पण हिमांशूनं म्हटलेला इवानसेव्हिकविरुध्दचा सामना मात्र पाहिल्याचा आठवतोय.

लेख आणि लेखाचा विषय दोन्ही आवडले! पेसने पदक जिंकलं, तो दिवस अजून आठवतो आहे. ऑलीम्पिक स्पर्धांमध्ये (माझ्या आठवणीत) प्रथमच तिरंगा फडकताना पाहून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. अश्या वेळेला आपण मनाने किती भारतीय आहोत, हे कळत...

मस्त लिहिलयं. अतिशय मुद्देसूद
तो दिवस आहे लक्षात, ऑलिंपिकमध्ये एखादं पदक मिळवणं हे किती महान काम असतं हे कळण्यापूर्वी.

अवांतर : एकदा आम्ही क्रिकेट खेळत असताना त्याचवेळी पेस आणि सँप्रासचा सामना (फ्रेंच ओपन बहुदा) सुरू होता. पेसला सँप्रास विरुध्द्द खेळायला मिळतयं हीच मोठी गोष्ट आहे असं मानून काही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. आमचं क्रिकेट खेळून संपूपर्यंत कुणीतरी सांगितलं की पेस जिंकला, अविश्वसनीय अशी बातमी. आम्ही दंगा करतच घर गाठलं आणि बातमी पाहिल्यावर जल्लोष केला. Happy

इथे मला निबंध स्पर्धेत भाग घेऊन निबंध लिहायचा आहे,पण लिंक मिळत नाहीय. कुणी माझी मदत करू शकेल का?

छान.

Pages