गोड जिवाला छंद लागला

Submitted by निशिकांत on 13 July, 2013 - 10:08

तू गेल्याने आयुष्याला
आठवणींचा गंध लागला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

अंधाराची माझी वस्ती
किती काजवे शोधशोधले!
सुर्योदय अन् चंद्रोदयही
कधीच नव्हते भाळी लिहिले
क्षणैक तू येउन गेल्याने
दीप मनीचा मंद तेवला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

छबी कुणाची कधीच नव्हती
चित्र तुझेही कल्पनेतले
रंग भराया तरी लागलो
मनोमनीच्या कुंचल्यातले
शुन्यामध्येही बघताना
जीव कसा बेधुंद जाहला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

आयुष्याच्या कातरवेळी
मला वाटते मजेत जगलो
आसपास तू नसून सुध्दा
सदैव तुझिया सवे नांदलो
तुझाच दरवळ, तुझीच धुंदी
सदैव मी मधुगंध चाखला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

नसेल जमले या जन्मी पण
पुढील जन्मी भेटू आपण
आस उद्याची हीच प्रेरणा
चित्र नवे रेखाटू आपण
प्रतिक्षेतही आयुष्याने
क्षणोक्षणी आनंद भोगला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users