जीवघेणी तुझी....

Submitted by भाग्यश्री ७ on 7 July, 2013 - 11:05

जीवघेणी तुझी, खोड ही साजणा, का न येतोस वेळेवरी?
आस मिटली तरी, श्वास तुटले तरी, वाट पाहीन वेड्यापरी.....

नेत्र मत्स्याकृती, कंठ मैनेपरी, डौल हंसातला घेतला,
कौतुकाची खरी बाब ऐका पुढे, अंतरी ठेवली कस्तुरी...

नेमकी कोण मी? आठवेना मला, सापडेना मला मी पुढे,
लाट उसळून वा, पान ढाळून मी जाहले कावरी बावरी...

रोज कोंडा-कण्या घेउनी रांधते, पंचपक्वान्न विश्वातले,
झोपडीचे करी देवघर, स्त्री असे अन्नपूर्णा घराची खरी....

सांगते मी तुम्हा, मूर्त माझ्या मनी, कोणती आवडीची वसे,
जी विटेवर उभी, हात कमरेवरी, मोर मुकुटामधे साजिरी!!!!

~भाग्यश्री कुलकर्णी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त गझल अनुभवास आली
ओळी ओळीला मजा आली शेर न शेर भिडला काळजात छे घुसला अक्षरशः
शेवटचा शेर तर जान कुर्बान ...अपनी दोस्ती जमेगी लगताय या शेरावरून Happy
आपले यापूर्वी कधी गझल लेखन पाहिले नाही ऐकले नाही मी बहुधा आज प्रथमच पाहतोय
असो
पाहून आनंद झाला Happy

आपला नम्र
वैवकु

टीप :
१)मैनेपारी असे झाले आहे प ला काना चुकुन पडलाय शायद ...काढून टाका तो !! Happy
२) मोर मुकुटामधे साजिरी!!!!<<<<कन्फ्यूज्ड !!! आपल्याला मोरपीस असे म्हणायचे आहेकाय की मोरमुकुट असा शब्द आहे तो ..कि मुकुटात मोर कोरलाय असे आहे
मोरपीस असे असेल तर शंका अशी होती की आजवर मी विठ्ठलाच्या मुकुटात मोरपीस पाहिलेच काय ऐकलेही नाही ..विठ्ठलाची मूर्ती हा विषय असेल तर व तिचा वर्णनात्मक उल्लेख असेल तर निदान गझलेत वास्तविकता जपावीत असे सुचवावे वाटते
माझेच काहीतरी चुकत असल्यास क्षमस्व

धन्यवाद

अरविंदजी आभार !

वैभवजी,
कृष्णाच्या मस्तकावर मोरपिसांचा मुकुट असतो. विठ्ठल म्हणजे कृष्ण. हे संदर्भ संत साहित्यात वारंवार येतात. उदा. मीरा व इतर संत --त्याला अनुसरून लिहिले आहे. आपल्याला युनिवर्सिटीत काल पाहिले. आपण एकमेकांची गझल देखील ऐकलेली आहे. असो. धन्यवाद.

कृष्णाच्या मस्तकावर मोरपिसांचा मुकुट असतो. विठ्ठल म्हणजे कृष्ण. हे संदर्भ संत साहित्यात वारंवार येतात.

<<<< बरोबर आहे !! पण ....

जाउदे ....मी बोलायला लागलो की माझे लोकांशी संवादापेक्षा वादच अधिक होतात असा अनुभव असल्याने थांबतो Happy

गझलेतलं काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटलं. मोठ्या फॉर्ममुळे असेल. त्यामुळे मग अनेक शब्दांची भर घालावी लागते जिथे प्रत्येक वेळी इतक्या मोठ्या ओळीची गरज नसते.
पण काव्य,आशय आणि त्यातला साधेपणा अतिशय छान.

नेत्र मत्स्याकृती, कंठ मैनेपरी, डौल हंसातला घेतला,
कौतुकाची खरी बाब ऐका पुढे, अंतरी ठेवली कस्तुरी...

आणि
रोज कोंडा-कण्या घेउनी रांधते, पंचपक्वान्न विश्वातले,
झोपडीचे करी देवघर, स्त्री असे अन्नपूर्णा घराची खरी....

या द्विपद्या तर फार आवडल्या! बोलकी, लयबद्ध रचना!!!