देवाशप्पथ !

Submitted by आनंद पेंढारकर on 2 July, 2013 - 13:35

आयुष्याला झालिस दरवळ, देवाशप्पथ !
श्वासांमधली हिरवी सळसळ, देवाशप्पथ !

एखाद्याच फुलाची होती मूढ अपेक्षा
केलीस रिती भरली ओंजळ, देवाशप्पथ !

पार जरी नजरेच्या होशी, थांबत नाही
खोलातील तुझीशी वर्दळ, देवाशप्पथ !

स्पर्श तुझा, कवितेवर माझ्या झाले गारुड
शब्द झटकुनी उठले मरगळ, देवाशप्पथ !

तू रुसल्यावर नि:शब्दाचे अर्थ हजारो
हसणे लाख झऱ्यांची खळखळ, देवाशप्पथ !

बसल्या बसल्या कैद कितीदा डोळ्यात तुझ्या
सुटकेसाठी मग तारांबळ, देवाशप्पथ !

आनंद पेंढारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूड् बनवलात धन्स
मस्त गझल एक दोन बदल हवेत वृत्तासाठी
देवाशप्पथ ही रदीफ मस्तय खूप आवडली
सगळेच शेर छानय्त !!!! सगळेच खूप आवडलेत (मतला जरा कमी -वैयक्तिक मत)