रस्त्यास तिचा पत्ता विचारला बर का

Submitted by बेफ़िकीर on 24 June, 2013 - 13:13

रस्त्यास तिचा पत्ता विचारला बर का
तर सरळसोट रस्ता फुशारला बर का

मी बालपणी बापाशी कुस्ती खेळे
जी बाप कालही सहज हारला बर का

हाताबाहेर कधीही गेलो नाही
आरश्यासही डोळा न मारला बर का

गीतेची शप्पथ न्यायदेवतेनेही
सत्यावरती डोळा वटारला बर का

आता सारे जग तिच्यासारखे भासे
त्याचा बिघाड इतका सुधारला बर का

हे पीक आठवांचे जगामधे गाजे
मी फक्त एक अश्रू फवारला बर का

क्षितिजापाशी शिस्तीत मेघ भरकटले
चेहरा तिने माझा चितारला बर का

'तो कधीच गेला' असे म्हणत ज्याबाबत
तो 'बेफिकीर' नुकताच वारला बर का

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठीक....

हे पीक आठवांचे जगामधे गाजे
मी फक्त एक अश्रू फवारला बर का>>> मस्तच!

ही रदीफ नसती तर जास्त मजा आली असती असे वैम. चूभूद्याघ्या.

आवडली.

रदीफेत वृत्ताच्यादृष्टीने' बर का' बरोबर आहे ..पण बरं का वैगेरे असतं तर अजून मस्त वाटलं असतं ,असं वाटतं...
असो..गझल आवडली बर का!!:)

बरका ही रदीफ फार आवडली कुणीतरी अगदी समोर असून आपल्याशी बोलत असल्यागत वाटते
(सगळ्याच शेरात हवीच होतीका याबबत कणखरजी पृच्छा करत असतील तर त्यांचे म्हणणेही विचारात घ्यावे असेच आसावे असे वाटते)

मला सगळेच शेर आवडले !!
ही लय माझ्यासाठी नवीन होती तिचीही पुरेपूर मजा घेता यतेय
लोक नेहमीपेक्षा वेगळ्या लयीत लिहितात तेव्हा खयालही हटके येतात बहुधा Happy

एक अश्रू <<<<< "एका" अश्रूचा माझाही एक शेर असलेला आठवला...

पेटून राख व्हावे काहूर माजलेले
एकाच आसवाची ठिणगी अशी पडावी

Happy

धन्यवाद !!

बरं का ! .... ही वेगळीच वैशिषष्ट्यपूर्ण रदीफ..... छान वाटली.
वृत्तही वेगळंच वाटलं.
बेफीजी, या वृत्ताची लक्षणे कृपया देऊ शकाल का ?

"गीतेची शप्पथ न्यायदेवतेनेही
सत्यावरती डोळा वटारला बर का"

"हे पीक आठवांचे जगामधे गाजे
मी फक्त एक अश्रू फवारला बर का" >>> हे दोन्ही शेर सर्वात विशेष वाटले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

"रदीफेत वृत्ताच्यादृष्टीने' बर का' बरोबर आहे ..पण बरं का वैगेरे असतं तर ....." >>> सुशांत खुरसाले,
'बर' आणि 'बरं' दोघांच्याही मात्रा सारख्याच आहेत.
(र वरील अनुस्वार अनुच्चारित.)

गीतेची शप्पथ न्यायदेवतेनेही
सत्यावरती डोळा वटारला बर का>>>

हा शेर विशेष आवडला.. Happy

छान गझल, आवडली.
-----
क्षितिजापाशी शिस्तीत मेघ भरकटले
चेहरा तिने माझा चितारला बर का
----
मस्तच.

अश्रू शेर आवडला! मेघही आवडतोय.. पण नीट अजून कळत नाहिये.

बापाचा शेर, मला जसा समजला आहे त्यानुसार, धक्का देणारा आहे...

मी बालपणी बापाशी कुस्ती खेळे
जी बाप कालही सहज हारला बर का

हे पीक आठवांचे जगामधे गाजे
मी फक्त एक अश्रू फवारला बर का

हे दोन शेर खूप आवडले !

हे मीटर खूप मस्त आहे. कुसुमाग्रजांची 'समिधाच सख्या ह्या..' ह्यात आहे आणि रॉय किणीकरांच्या काही रुबायाही. ह्या व्यतिरिक्त मी जेव्हा जेव्हा ह्या मीटरमध्ये वाचले आहे, ते कवितारुपात होते आणि चार चरणांचे होते. प्रथमच (किंवा क्वचितच) गझलेत वाचले. अनेकदा वाचल्यामुळे असेल कदाचित, पण प्रत्येक वेळी मला दोन ओळी कमी पडल्याचे वाटले मात्र. ह्या लयीत चार ओळी वाचताना चौथी ओळ एका वेगळ्याच डौलात समेवर आल्याचं फिलिंग देते. दोन ओळींत 'सम' साधल्याचं समाधान मिळालं नाही. अर्थात, आधीच म्हटल्याप्रमाणे वेगळ्या आकृतीबंधात अधिक वाचले असल्यामुळे मला असे वाटत असावे, हे मान्य.

मी बालपणी बापाशी कुस्ती खेळे
जी बाप कालही सहज हारला बर का

ह्या शेरावर विचार केला अजून...... आत घुसला आहे..
जबरदस्त !