ऋतू...

Submitted by मुग्धमानसी on 24 June, 2013 - 05:57

मन पुसून कोरडं कर
पाऊस पडून गेल्यावर
पुन्हा छातीत वारं भर
श्वास सुटून गेल्यावर...

उनाड स्वप्नं घडी घालून
ठेऊन दे उशापाशी
उलगडून पुन्हा डोळ्यांत भर
निखार जळून गेल्यावर...

तुझं असणं, तुझे श्वास
तुझं नसणं, तुझे भास..
पुन्हा तुला गोळा कर
’तो’ पसरून गेल्यावर...

जमेल तेंव्हा जमेल तसं
जमेल तिथे भेटत जा
वसंत पुन्हा दिसणार नाही
एकदा बहरून गेल्यावर...

डोह फारच झालाय खोल
सांभाळ चुकून जाईल तोल
बुडशील, मरशील, येशील पुन्हा
सगळं आटून गेल्यावर...

पावसात सुद्धा वहात नाहीत
स्वप्नं डोळ्यांत तुंबून रहातात
जगणं पुन्हा वाहतं कर
एवढा ऋतू गेल्यावर...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निव्वळ अ प्र ति म !

तुझं असणं, तुझे श्वास
तुझं नसणं, तुझे भास..
पुन्हा तुला गोळा कर
’तो’ पसरून गेल्यावर...

हे कडवे जरा जास्तच आवडले.

मुमाने लिहिलय म्हणजे छान असणारच !!!..... कुण्नीतरी म्हटलेलं आठवलं Wink

पण बघा तुमच्या कवितेत गझलियत चा किती खोलवर विचार अतीशय नैसर्गीकपणेच झालेला असतो तश्या तुम्हाला गझला का लिहिता येत नाहीयेत अजून हा मला प्रश्न पुन्हा एकदा पडला Happy

असो

कविता खूप खूप आवडेश Happy

सर्वांना धन्यवाद! रिया, तुझं साधं बोलणंच एवढं गोड असतं की माझ्या कवितांची काय बात?

वैभव... अगदी हाच प्रश्न मलाही पडलाय. पण असो, सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी मझी धाव कवितांपर्यंतच. Happy

आवडली !

अप्रतिम कविता.

उनाड स्वप्नं घडी घालून
ठेऊन दे उशापाशी
उलगडून पुन्हा डोळ्यांत भर
निखार जळून गेल्यावर... >>>> क्या बात है...

वा! कविता फार आवडली. उनाड स्वप्नं, हे कडवं तर खूपच! (का कुणास ठाऊक, या कडव्यातली स्वप्नं कॉन्टॅक्ट लेन्सेस सारखी वाटली)

शब्दातीत भाव शब्दांत कसे ओतता हो तुम्ही??

ह फारच झालाय खोल
सांभाळ चुकून जाईल तोल
बुडशील, मरशील, येशील पुन्हा
सगळं आटून गेल्यावर...
व्वा!!

Pages