बाफमहात्म्य : वाचाल तर वाचाल, न वाचाल तर पस्तावाल

Submitted by उद्दाम हसेन on 16 June, 2013 - 05:26

ॐ किरण्यकेय नमः
ॐ अनुल्लेखनाशकाय नमः
ॐ इन्गोरास्त्रबूमरँगाय नमः

इंग्लीश सिनेमे, टीव्ही मालिका, हाणामारीचे बिनडोक बाफ, कविता, गझला आणि बेस्टसेलर पुस्तके यामधे गुंतलेल्यांसहीत समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी हा धागा आहे. या धाग्यावर प्रतिसाद दिला असता सुख हात जोडून उभे राहते, मनोकामना पूर्ण होतात. या धाग्याच्या वाचनाने आपत्ती येत नाही.

वलसाड इथे राहणा-या उत्तेजित गांधी या तरुणाची अत्यंत हलाखीची अवस्था होती. त्याच्या पित्याने किरण्यके या आयडीचा अनुल्लेख केला होता. या कुटुंबास कुणीही मदत करत नव्हते. एकदा कुणीतरी सांगितल्यावरून उत्तेजितने या बाफचे वाचन केले आणि आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून आयपीएल वर सट्टा लावला असता श्रीसंत च्या एका षटकात पंधरा धावा निघून त्याला लक्षावधी रूपये मिळाले. त्यानंतर त्याने या बाफचे वाचन चालूच ठेवल्याने वलसाड स्टेशनबाहेरच्या वडापावच्या गाडीचे आता एका तीनमजली हॉटेलात रूपांतर झाले आहे. त्यानंतर आपल्यासारखाच इतरांनाही फायदा व्हावा असे त्याला वाटल्याने त्याने हा बाफ सोळा जणांना फॉरवर्ड केला. त्यात प्रत्येकाने हा धागा सोळा जणांना फॉरवर्ड करण्याचे आवाहन केले होते. अशा रितीने समाजाच्या हिताचे काम केल्यानंतर आता भारतभर त्याची साखळी हॉटेलची चेन आहे.

मौजे तक्रारवाडी येथील सायब्या हरकामे हा अनेक वर्ष गावातल्या पुढा-यांच्या सभेसाठी सतरंज्या घालत आला होता. पण इतर वेळी त्याला कुणीच विचारत नसल्याने खाण्यापिण्याचे हाल झाले होते. एकदा या बाफचे महात्म्य ऐकल्यावर त्याने हा बाफ वाचण्याची इच्छा व्यक्त केली. एका दयाळू सायबर कॅफेचालकाने त्याला हा बाफ उघडून दिला. त्याला एक इमेल आयडी उघडून दिला आणि सोळा ईमेल आयड्यांची यादीही दिली. बाफमहात्म्याने त्याला थोड्याच वेळात जालीय गती प्राप्त होऊन त्याने हा धागा सोळा जणांना फॉरवर्ड केला. दुस-याच दिवशी ग्रामपंचायतीच्या तिकिटावरून दोन गटात प्रचंड हाणामा-या होऊन शेवटी तडजोडीचा उमेदवार म्हणून सायब्याचं नाव निश्चित झालं. एव्हाना सायब्याला बाफमहात्म्य ध्यानात आलेलं असल्याने त्याने गावात हा बाफ सोळा जणांना फॉर्वर्ड करण्याचे फर्मान काढले. त्या दिवसानंतर सायब्याने मागं वळून पाहीलंच नाही. त्याचा आता साहेबराव झाला. सरपंच ते आमदार आणि मुख्यमंत्री होऊन तो एका पक्षाचा पक्षाध्यक्षही झाला. ज्या दयाळू सायबर कॅफेवाल्याने त्याला मदत केली त्याचाही कायापलट होऊन तो आता तक्रासीस या कंपनीचा मालक आहे. तक्रासीस चे नाव आज आदराने घेतले जाते. साहेबरावांनी त्याला देशातल्या घराघरात जाऊन सर्वांची माहिती कॉम्प्युटरात घालून प्रत्येकाला एकेक आकडा देण्याचं काम दिलं. अशा रितीने या बाफमहात्म्याने एकाचवेळी दोघांचे भले होऊन एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ही म्हण जन्माला आली.

भकासवाडीचं दारिद्र्य सरकारी कागदपत्रांची झूल पांघरूनही झाकलं जात नसल्याने तिथल्या देवस्थानाला कसलीच प्राप्ती होत नव्हती. त्यामुळे पुजारी अत्यंत चिंताक्रांत होता. कुटुंबाचेच भागेना त्यात मंदिराचा रोजचा खर्च कसा भागवावा हे त्याला समजेना. गावच दरिद्री असल्याने कुणीच मदत करेना. सरकारी मदत पंधरा मैलावरून मिळवावी लागे ती ही तुटपुण्जी. त्यात गाडीभाडं जाऊन उदबत्त्या आणि काडेपेटीचा खर्च निघत असे. एक दिवस त्याने सरकारी मदत केंद्रात जाऊन इंटरनेटवरून हा बाफ वाचला मात्र, संध्याकाळच्या पूजेला नेमकेच मंत्रीमहोदय आले. खरं तर मंत्र्यांची गाडी जवळच खराब झाली होती आणि दुसरी येईपर्यंत पत्नीचं तोंड कसं बंद ठेवावं या विवंचनेत असतानाच ड्रायव्हरने या गावात जुनं मंदीर असल्याची माहिती दिली होती. पुजा-याला आनंद झाला. देणगी बक्कळ मिळेल असं वाटलं. पण मंत्र्याने सव्वा रुपया ठेवल्यावर पुजारी निराश झाला. इतक्यात त्याला या बाफवरचा पहिला मंत्र आठवला मात्र, त्याला एक विलक्षण कल्पना सुचली.

बाहेर मंत्री आल्याने गर्दी जमली होती. देवळात एक लाऊडस्पीकर चालू होता. पुजा-याने लाऊडस्पीकरवरून माननीय मंत्रीजी अभिषेक करत आहेत, त्यामुळे आपल्या मंदिराचे रूप पालटेल आणि गावाचंही भाग्य पालटेल अशी घोषणा केली. इतक्यात मंत्री सावध होऊन बाहेर आले तर प्रत्येकजण त्यांनी देणगी किती दिली असावी याचीच चर्चा करत होता. मंत्रीही गोड बोलून निघणार तोच पुजा-याने तो सव्वा रुपया एका लाल कापडात गुंडाळला आणि ते मुठीत बंद करून जमावाला म्हणाला मंत्रीजींनी आपल्या देवळाला एक अनोखी भेट दिली आहे. ती भेट या मुठीत बंद आहे. मंत्र्यांची परवानगी असेल तर मी मूठ उघडतो म्हणजे मूठ कितीची हे लोकांना कळेल. हे ऐकताच मंत्री घामाघूम झाले. मूठ उघडली तर सव्वा रुपया फारच वाईट दिसेल आणि आपल्या इभ्रतीवर वाईट परिणाम होईल हे ओळखून ते पुजा-याच्या कानात कुजबुजले.. मी सव्वा लाखाचा चेक पाठवून देतो पण मूठ बंदच राहू दे. तेव्हापासूनच झाकली मूठ सव्वा लाखाची ही म्हण प्रसिद्ध झाली. पुजारी मात्र मंत्र म्हणत राहिला आणि शेवटी पुजा-याने शासकीय खर्चातून जीर्णोद्धार करतो हे आश्वासनही दिलं. पुजारी मात्र मंत्र म्हणतच राहील्यावर ड्रायव्हरच्या सूचनेवरून त्याने सरकारी खर्चाने पुजा-याला पगार मिळेल असं आश्वासन दिलं. अशा रितीने बाफमहात्म्याने मंदीर, गाव आणि पुजारी यांचे दु:ख दूर झाले.

जर बाफचा अनुल्लेख केला तर काय होते ?

शोभा खंडुळे ही विदुषी शिकून सरभैर झाली होती. तिला हे बाफमहात्म्य वगैरे नेहमीच खोटं वाटत असे. तिला बाफमहात्म्याची ईमेल मिळूनही तिने जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलं. तसंच अनेकदा हा बाफ समोर येऊनही तिने प्रतिसाद देण्याचं टाळलं. काही दिवसांनी तिच्या पीसीत गुड बाय मि नरकासूर हा व्हायरस घुसला आणि तिचा महत्वाचा डेटा नाहीसा झाला. इतकेच नाही तर तिच्या नावाने तिच्या फ्रेण्डलिस्टीतल्या सर्वांना शिव्याशाप देणारे ईमेल्स त्या व्हायरसच्या प्रतापाने सेंडली गेली. त्यात तिच्या खडूस बॉसला मी तुझी सगळी लफडी, अफराफर, भ्रष्टाचार इ. इ. उघड करणार आहे असा ईमेल गेल्याने त्याने तिला ताबडतोब कामावरून काढून टाकले. तसंच तिला कुठेही नोकरी मिळणार नाही अशी व्यवस्था केली. तिच्यावर सायबर क्राईमचा गुन्हा दाखल झाल्याने तिची डिग्री काढून घेण्यात येऊन तिची रवानगी तुरुंगात झाली. विरोधी पक्षांनी मागणी केल्याने देशद्रोहाचा गुन्हाही दा़खल झाला. मग तिच्या एका मैत्रीणीने तिच्या आईला बाफमहात्म्याबद्दल सांगितले तसंच शोभा खंडुळेने दुर्लक्ष केल्यानेच तिची ही अवस्था झाल्याचे सांगितले. आईने मग वेळ न दवडता हा धागा स्वतः वाचला, प्रतिसादही दिला आणि सोळ जणांना फॉर्वर्ड केला. आणि काय आश्चर्य ! दुस-याच दिवशी न्यायालयाने सुनावणीदरम्यान पोलीस तपासावर आसूड ओढत शोभास मुक्त करा असे आदेश दिले. त्या दिवसापासून शोभा देखील नियमितपणे हा बाफ वाचते आणि पहिल्या मंत्राचे पठण करते.

या बाफकडे दुर्लक्ष केल्याचे भयंकर परिणाम कित्येक कुटुंबांना भोगावे लागल्याची उदाहरणे आहेत. पुण्यातल्या एका कवीद्वेष्ट्या पत्रकार समीक्षकाने हा आगाऊपणा केल्याने त्याला त्याच्या वृत्तपत्राने सलग तीन दिवस तीन कवीसंमेलनास हजर राहण्याचे काम सोपवले होते. तिस-या दिवशी त्याने शरण येत या बाफचे पठण केले आणि सोळा जणांना फॉर्वर्डही केला. त्या दिवसापासून आजतागायत त्याला ना कुणी कविता पाठवली ना ऐकवली.

मिस चंचला अवखळे नेहमी फेबु वर आपले फोटो अपलोड करून येणा-या प्रतिक्रिया पाहण्यात गुंग असे. कधी कधी हा धागा समोर येऊनही ती उर्मटपणे आणि तुच्छतेने त्याकडे दुर्लक्ष करीत असे. मात्र एके दिवशी तिचा चेहरा काळा ठिक्कर पडू लागला आणि त्यावर तारुण्यपीटिकांनी हमला केला. काही दिवसांतच डोळे, ओठ आणि नाक वगळता तिचा चेहरा साबुदाणेवड्यासारखा भासू लागला. त्यातच तिची प्रोफाईल हॅक झाली आणि आताचे तिचे खरे फोटो तिच्या नावाने कुणीतरी अपलोड केले. त्यानंतर प्रोफाईल परत मिळाली तरी देखील आता तिला कुठल्याही पोस्टला लाईक्स मिळेनासे झाले. तिच्या जुन्या फोटोंचीही कुणी दखल घेईनासे झाले. इतकेच काय एक दिवस तिला धक्काच बसला जेव्हा तिच्या फ्रेण्डलिस्टीतले निम्मे फ्रेण्ड तिला सोडून गेल्याचं तिला लक्षात आलं. उरलेल्यातली एक मित्र कनवाळूपणे म्हणाली तू बाफमहात्म्य जाणूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम.

यातून उपरती घेत तिने सुरुवातीचा मंत्र जपत बाफपठण केले आणि सोळा जणांना लिंक फॉर्वर्ड केली. त्यानंतर चेहरा धुताना तिला दिसलं कि काळेपणा जात चालला आहे. तिने आणखी सोळा जणांना लिंक फॉर्वर्ड केली आणि तिच्या लक्षात आलं कि आता चेहराही गुळगुळीत होत चालला आहे. तिने पुन्हापुन्हा लिंक फॉर्वर्ड केली. आज ती बॉलिवूडची एक आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते.

या बाफचं महात्म्य ओळखून आपणही प्रतिसाद देऊन सोळा जणांना लिंक फॉर्वर्ड केल्यास आपल्याला अनुभूती येईलच. न केल्यास जे काही होईल त्याला आपणच जबाबदार असाल हे नम्रपणे लक्षात आणून देत आहे.

धन्यवाद

कळावे आपला
स्वामी किरणानन्द दयानिधी

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॐ किरण्यकेय नमः
ॐ अनुल्लेखनाशकाय नमः
ॐ इन्गोरास्त्रबूमरँगाय नमः

नमस्कार !!

Pages