आई मला जग सारं पहायचं होतं गं !

Submitted by आनंद पेंढारकर on 14 June, 2013 - 11:50

सध्या ऐरणीवर असलेल्या स्त्रीभ्रूणहत्या या विषयावरचा एक आक्रोश !

आई मला जग सारं पहायचं होतं गं !
तुझ्यासोबत चार क्षण राहायचं होता गं

सतरंजीवर विरलेल्या खेळले असते खूप खूप
दुधात मिसळलेलं पाणीही प्यायले असते गुपचूप
अंगाईगीत तुझ्या सुरात ऐकायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

प्रत्येकवर्षी वर्गात पहिली असते आले
घरकामातही तुझा हात असते झाले
तुझ्या कुशीतून रोज सकाळी उगवायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

वेणीफणी, आंघोळ केली असती माझी मीच
स्नो, पावडर, टिकली नसती मागितली कधीच
तुझ्यासारखं सोज्वळ दिसायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

दादासारखे कष्ट घरासाठी असते केले
लग्न करून, तुला सोडून दूर नसते गेले
बाबांसारखं घर पाठीवर वाहायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

नसते शोधले वृद्धाश्रम तुमच्यासाठी
म्हातारपणाची तुमच्या झाले असते काठी
सुरकुतल्या हातांना कुरवाळायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

आनंद पेंढारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

रामायण काळापासून स्त्रियांवर जो अन्याय झालाय. तो आजही होतोय खेदाने असे म्हणावे लागते स्त्री जन्मा हि तुझी कहानी.

छान .... आशय सहजतेने पोहोचतोय.
---------------------------------------------------------------------
(प्रस्तावनेची अजिबात आवश्यकता वाटत नाही.)