एक सकाळ फळाफुलांची..

Submitted by हेम on 13 June, 2013 - 21:54

नासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री. धर्मेश त्रिवेदी यांचं 'हेल्थकेअर फुड अँड ज्युस' नांवाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. राहुल सोनवणेनं फोनवरून, खंडोबाच्या टेकडीवर जाणार असशील तर या ठिकाणी आवर्जून जायला सांगितलं होतं. तसं देवळाली कँपमध्ये 'भारत कोल्ड्रिंक्स' कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्रिवेदींचं हेल्थकेअर फुड- ज्युस सेंटर, बाहेरून बाकी सामान्यपणे ज्युस सेंटर असतं तसंच..! ..बाहेरच मांडलेल्या खुर्चीवर बसून मेनुकार्डवर नजर फिरवतांना नेहमीच्या सवयीप्रमाणे वेगळं काही ढोसणेबल आहे कां ते बघत असतांना एकदम कोकोनट मिल्कच्या म्हणजे नारळाचं दुधाच्या कॉलमपाशी थबकलो. खवलेलं ओलं खोबरे वाटून पिळल्यावर जो रस निघतो तो म्हणजे नारळाचं दुध. नारळाचं दुध आतापर्यंत उकडीच्या मोदकांबरोबर, तांदळाच्या शेवयांबरोबर, कैरीच्या आमटीत, पुरणपोळीबरोबर,सोलकढीत अशा सपोर्टिंग पोझिशनला चाखलेलं, ...पण डायरेक्ट मेन रोलमध्ये पेयांत? .. त्यांतही प्रकार , म्हणजे १) प्लेन नारळाचं दुध २) नारळाचं दुध आणि गुलकंद ३) नारळाचं दुध आणि खजूर ४) नारळाचं दुध आणि चॉकलेट ५) नारळाचं दुध आणि अंजीर.
याशिवाय मुगाच्या आणि मक्याच्या पोह्यांचे चाट आणि वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस हेही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. येथील ज्युसचं वैशिष्ट्य म्हणजे साखर कशातही घालत नाहीत, त्यामुळे फळाची मूळ चव जीभेवर येते. पार्सल देतांनाही, ग्राहकाला १ तासाच्या आत ज्युस संपवण्याची सूचना त्रिवेदीजींनी दिलेली मी ऐकली. ऑर्डर द्यायला काउंटरवर पोहोचताच, प्रसन्न व हसतमुख अशा धर्मेश त्रिवेदींशी बोलतांना डाव्या हाताला लक्ष गेलं. काउंटरवरच ठेवलेल्या टेराकोटाच्या पसरट भांड्यात बिट्टी व जरबेराच्या फुलांची रांगोळी रेखीवपणे मांडलेली दिसली. ..अक्षरशः खेचला गेलो!

प्रचि १

..समोर साईबाबांच्या प्रतिमेच्या पुढ्यातही वेगळी पुष्परचना मांडलेली होती. भराभर फोटो काढले.

प्रचि २

त्रिवेदीजी आणि त्यांचे मदतनीस गालात हसत माझा हा उद्योग बघत होते. पोटोबा झाल्यानंतर पुन्हा मी फुलांच्या सजावटीकडे वळालो. पण याबाबत काही छेडण्याआधीच त्यांनी छोटासा अल्बमच समोर ठेवला. पूर्वी वेगवेगळ्या रंगांचे धान्य वापरूनही ते विविध रांगोळ्या बनवत असत, पण त्यासाठी लागणारा प्रचंड पेशन्स आणि जाणवू लागलेला पाठीचा त्रास यामुळे धान्यरंगावलीचा छंद कमी केला. व्यवसायानिमित्ताने एकदा पाँडीचेरीला गेले असतांना मदर मेरीच्या समोर विविध पुष्पगुच्छांची केलेली आकर्षक सजावट त्यांच्या मनाला भावून गेली. स्वतःच्या दुकानातही फुलांची अशी काही छोटी सजावट करता येईल असा निर्मितीविचार मनात घेउन रोज नविन काहीतरी वेगळी सजावट करता करता हजारो देखण्या पुष्परंगावल्या साकार झाल्या. सुरूवातीला नुसत्या फुलांची रांगोळी फुले लवकर सुकून जात असल्याने त्यांनी पाण्यावर फुलांची रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि आता ते विविध आकारांची छोटी भांडी वेगवेगळ्या आकारांसाठी वापरतात.

प्रचि ३

रानफुले असोत किंवा राजफुले असोत, त्रिवेदीजीं त्यांच्या सजावटीत प्रत्येक पाकळीला न्याय देतात. प्रत्येक फुलाचा रंग, आकार वेगळा त्यानुसार मांडणीत प्रत्येकाचं स्थानही उठावदार ठरतं.

प्रचि ४

त्यांच्या मोबाईलवर शेकडो सजावटींचे फोटो पहायला मिळतात आणि ते उत्साहाने दाखवतातही. त्यापैकी काही रचना...

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

साधारण २ दिवसांपर्यंत सजावट टिकून रहाते, त्यानंतर मात्र त्यांतील ताजेपणा उणावायला लागतो. मग एवढी मन ओतून केलेली सजावट मोडतांना इमोशनल अत्याचार होत नाही कां? या माझ्या शंकेवर स्मित करत त्यांनी उत्तर दिलं '..जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'क्या बात है!
ज्युसमध्ये घालायच्या साखरेचा सर्व गोडवा त्रिवेदीजींच्या जीभेवर पसरला आहे. निघतांना त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड मागितल्यावर पुन्हा साखरेची उधळ्ण झाली - 'आप जैसे मित्रही मेरे व्हिजिटिंग कार्ड है. इसलिये मुझे उसकी जरुरत नही लगती.' एकशे एक टक्के खरं आहे!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्ग... कसल्या सुंदर सजावटी आहेत ह्या. ते शेवटचं वाक्यं भारी..'..जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'

कसल्या सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या. शेअर केल्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद.

विसर्जन होणार असले तरी सर्जन हे केलेच पाहिजे - हा दृष्टीकोन प्रचंड आवडला.

>>> विसर्जन होणार असले तरी सर्जन हे केलेच पाहिजे - हा दृष्टीकोन प्रचंड आवडला.
हा विचार महत्वाचा. छान सजावट.

किती सुंदर. बिट्टीच्या फुलांची सजावट खुप आवडली. ह्या फुलांना कधीच कुठल्या सजावटीत पाहिले नव्हते.

विसर्जन होणार असले तरी सर्जन हे केलेच पाहिजे - हा दृष्टीकोन प्रचंड आवडला.

खरेच. फुले झाडांवरच चांगली दिसतात हे कितीही खरे असले तरी सजावटीतही ती खुप छान दिसतात आणि पाहण-याला अगदी प्रसन्नचित्त करुन सोडतात हे वरच्या फोटोंवरुन दिसते.

किती सुंदर. बिट्टीच्या फुलांची सजावट खुप आवडली. ह्या फुलांना कधीच कुठल्या सजावटीत पाहिले नव्हते.
>>>>> साधना +१

भेट दिली पाहिजे एकदा नक्कीच. माहितीबद्दल धन्यवाद. Happy

फुलांच्या रचना फारच उत्कृष्ट!
जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है! >> क्या ब्बात है!

हेम, इतकी सुंदर गोष्ट आमच्यापर्यंत पोचवल्यबद्दल धन्यवाद!

सर्व सजावटी अतिशय सुंदर आहेत. काय अफलातून सौंदर्य दृष्टी आहे त्रिवेदींजीकडे....

त्रिवेदीजी आणि हेम - दोघेही खर्रे खर्रे रसिक - दोघांनाही अनेक धन्यवाद व शुभेच्छाही.

Pages