बेंढया... एक अवालिया...

Submitted by विनीत वर्तक on 13 June, 2013 - 03:31

बेंढया... एक अवालिया...

आपल्या आयुष्यात आजूबाजूला आपण अनेक माणसे बघतो. काही चांगली, काही वाईट , काही हसणारी तर काही रडणारी तर काही रडवणारी आणि काही रडून हसवणारी. प्रत्येक क्षण काहीतरी देतोच आपल्याला तश्याच नवीन नवीन ओळखी हि. पण काही माणसे असतात जी आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि त्याचं जीवन आपल्याला नेहमीच एक कोड असते न उमगलेल असाच हा एक अवलिया...
बेंढया ह्याच नाव जितक विचित्र तितकाच हा साधा सरळ. गेले ३०-३२ वर्ष बघतो आहे त्याला किवा जेव्हा पासून कळायला लागल आहे तेव्हापासून. माझा जन्म मुंबईचा गाव सुद्धा मुंबईच्या जवळच. सुट्टीतला माझा सगळ्यात आवडता भाग म्हणजे मामाकडे जाणे. माझ मामाकड तस मुंबईला खेटूनच विरार ला. पण तिकडची मज्जा काही वेगळीच. पानवेलीच्या आणि फुलांच्या झाडांनी भरलेली शेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील माझ्या सगळ्या भावंडांची मज्जा असा भरगच्च कार्यक्रम. बेंढया तिकडेच माझ्या मामाकडे मजुरी करायचा. त्याला आम्ही प्रेमाने बेंढया मामा म्हणत असू आणि त्याच्या बायकोला वेणू मामी त्यांचा मुलगा कुमार हा आमच्याच जोडीचा आमच्यात खेळायचा. अंगावर एक हाप प्यांट आणि तो मळका गंजी बिनबाह्यांचा प्रसंगी तर तो पण नसायचा. उन्न्हामध्ये घामाने तळपणार त्याच शरीर आणि सतत शारीरिक काम करून शिरा दिसणारी त्याची शरीरयष्टी सगळच कस लक्षात राहण्याजोग.
सकाळ झाली का आम्ही वाडीत जायचो टगरीची, नेवाळी ची फुल खुडायला. सकाळी ८ ला सायकल ने वाडीत आल त्याच्या आधीच बेंढयाचा दिनक्रम चालू झालेला असायचा. आपल फावड घेऊन हा महाराज चालला शिपण करायला. (शिपण म्हणजे वाडीत असलेल्या केळाच्या बागेला, फुलांच्या बागेला सर्वाकडे पाटातून पाणी फिरवण. ३-४ दिवसातून एकदा करायला लागायचं झाड जिवंत राहण्यासाठी ) आम्ही मस्ती करत कळ्या खुडायचो. ह्याच कळ्या केळीच्या पानात बांधून फुलवले दादर ला दुसर्या दिवशी फुल मार्केट मध्ये विकायला नेत असत. कधी मूड आलाच कि मग चिखलात खेळण आणि मस्ती करण. बेंढया च काम बघून मला नेहमीच हुरूप यायचा आणि मी त्याच्याकडे फावड मागून स्वतः करायच प्रयत्न करायचो. माझी शरीरयष्टी बघून त्याला अंदाज यायचा कि माझ्याच्याने एक ढेकूळ पण हलणार नाही. मग मला तो शिकवायचा कि कस फावड पकडायचं कसा बांध वळवायचा आणि शिपण कस करायचं. हा अवलिया कधीच चपला घालत नसे. आम्ही चप्पल घालून सुद्धा आम्हाला लागत असे पण ह्याला कधीच पाय लगडून चालताना बघितल नाही जसा काही ह्याच्या तळपायाला लोखंड होत. मग कधीतरी ह्याला आणि मामी ला चहा घेऊन वाडीत जा. चहा प्यायलेला असला तरी केळीच्या पानातून तो सरर्र्र्र करून चहा प्यायची मजा काही वेगळीच असायची. ह्यांच्या वाटणीचा थोडा चहा न चुकता माझ्यासाठी ठेवायचेच.
दुपारी जेवणाची वेळ झाली कि हा मामाच्या घरी येऊन ५ रुपये घेऊन जाणार ताडी प्यायला दुपारी १२ किवा १ वाजता फुल तर्रर होणार त्या वेळेस ५ रुपयात सुद्धा अगदी खूप ताडी येत असावी. कारण हा १-२ ग्लास मध्ये ऐकणारा भिडू नव्हताच. कधी टाईट होऊन वेणू मामी ला शिवीगाळ कधी भांडण कधी मुकाट्याने जेवून अडवा होणार. तेच ते उघड काळ अंग घामात भिजलेल आणि कसलीही पर्वा नाही कोण बघते आणि कोण काय विचार करते ह्याचा कसलाच थांगपत्ता नसायचा. ४-५ वाजता परत साहेब वाडीत. शिपण कर, फुले खोड , गवताचे त्रण काढणे नारळ पडणे कोणतीही काम सांगा गाडी आपला तयार. दोन नऊ टाक टाकले कि गाडी एकदम सुपर डुपर फास्ट असायची. ७ वाजून गेले कि साहेब परत ५ रुपये घेऊन ताडी च्या गुद्द्यावर. मला वाटते ह्याच तिकडे परम्नंत अकौंट असावे. संध्याकाली परत गाडी गियर मध्ये टाकून जेवायला हजर व्हायचे. ह्याचा रोजचा हाच शिरस्ता. मामाच्या घराच्या बाजूला ह्याला झोपडी बांधून दिली होती. तिकडेच राहायचा. मी कधीही आलो कि अगदी आवर्जून बंधुजी कसे आहेत आणि बेन कशी आहे हे विचारणारच (माझ्या आई आणि बाबांना बेन आणि बंधुजी अस मामाकडे म्हणतात). बाबांकडे कधी दिसले कि १० रुपये मागणार आणि दिल्यावर अगदी हसत त्याची ताडीवाल्याकडे दिवाळी साजरी करणार.
ह्याच्या आयुष्यात किती उल्थापालथी झाल्या पण गडी आहे तसाच आहे. पोटचा मुलगा जीवानिशी गेला २ नातवाना मागे ठवून. सून घरातून स्वताच्या मुलांना ठेवून दुसर्या बरोबर पळून गेली. पण पडेल तर तो गडी कसला बेंढया मामा आणि वेणू मामी ने त्यांचा सांभाळ केला आणि आता तर त्यांच्या नातवाच लग्न ठरल आहे अस मला कळले. लग्न , पूजा असे काही कार्यक्रम असले हा कामास तयार तर कधी नाटक दारू पिऊन तर्र झाला कि त्यातून कधी बाहेर येईल त्याचे त्यालाच माहित २-३ दिवस मग कुठे तरी पडलेला असायचा परत २-३ दिवसांनी काम सुरु हा शिरस्ता गेल्या ३० वर्षापासून सुरु आहे. लग्नात म्हणजे पर्वणी असायची तेव्हा कुठे मी बेंढया मामा ला शर्ट आणि फुल प्यांट मध्ये बघितल असेन. आधी काम आणि मग हक्काची दारू म्हणजे त्याला काही अंतच नाही. मग गडी आठवडाभर गायब असायचा. किती वेळा निघून गेला असेल मामाकडून पण परत येताच राहिला. आज त्याला हक्कच घर मिळाल तो तिकडे राहतो पण मध्ये मध्ये मामाकडे येतो. ७० वर्षाचा हा तरुण आजही नारळाच्या झाडावर चढतो आणि काम करतो. नक्कीच वयोमानानुसार वृद्धत्वाकडे झुकला असला तरी त्याची रांगडी शैली आजही मला त्या ३० वर्ष पूर्वीच्या बेंढया ची आठवण करून देते.
आज हाच विचार करतो सगळ्या आजार , आणि मरणाला घाबरणारे आपण , उद्याच्या आठवणीने न झोपणारे आपण सुखी कि तो २ नऊ टाक मारून सुखेच्या अधीन झालेला बेंढया?? ४ माजले चढून ३० मधेच हपापणारे आपण आणि ७० वर्ष मध्ये सुद्धा नारळाच्या झाडावर चढणारा बेंढया नक्की तरुण कोण?? गेले ३० वर्ष ह्या अवलिया ला बघतो आहे. ह्याच्या अख्या अंगात रक्त नसावे अशी शंका येईल इतकी दारू, ताडी ह्या अवलियाने प्यायली पण ब्लड प्रेशर , मधुमेह , कॅन्सर , हार्ट डिसीज ह्यातला एकही जण ह्याच्या आसपास पण फिरकलेला नाही. कदाचित ह्याच रहस्य त्या अंगमेहनितच असेल पण आयुष्याला पूर्ण मोकळेपणे जगलेला हा अवलिया मला नेहमीच कोड्यात टाकत आला आहे......

विनीत वर्तक..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.

२ नउ टाक म्हणजे २ पेग दारूचे किंवा ताडीचे यातील ९ म्हणजे ९० मिली. गावरान भाषेत नउ टाक म्हणतात @तुणतुणे ...