शाळेतील गमतीदार प्रसंग

Submitted by टोच्या on 12 June, 2013 - 09:35

'शाळेतील दिवस' हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. शाळेत असताना प्रत्येकाच्या बाबतीत अशा काही गमती जमती, प्रसंग घडतात कि त्याची कधीही आठवण झाली कि आपली हसून हसून पुरेवाट होते. असे प्रसंग तुमच्याही बाबतीत घडले असतील तर करा शेअर…

सुरुवात माझ्यापासून करतो.

मी नववीला होतो तेव्हा. खेडेगावात असल्यामुळे गावात एकमेव शाळा होती. आमच्या शाळेच्या आवारात मैदानातच पाण्याचा मोठा हौद होता. पावसाळ्यात त्यात पाणी साचलेल असायचं. हौदाच्या मागे प्रार्थनेसाठी रांगा लावलेल्या असायच्या. आमची नववीची रांग बरोबर हौदासामोरच असायची. उंचीवारी रांगा असायच्या. त्यामुळे साहजीकच उंचीने कमी असलेली मुले पुढे आणि मोठी मुले मागे असायची. शिक्षक रंगांच्या पुढे असल्यामुळे पुढच्या मुलांना गुमान हात जोडून प्रार्थना, राष्ट्रगीत म्हणावे लागायचे. पण मागच्या टोणग्या पोरांना प्रार्थना म्हणण्यात इंटरेस्ट नसायचा. त्यांचे लक्ष फक्त मुलींच्या रांगेकडे असायचे. आणि नेहमी भांडणे सुरु असायची. एक दिवस अशीच प्रार्थना रंगात आलेली. पुढच्या मुलांनी हात जोडलेले, डोळे मिटलेले. आणि तेवढ्यात आमच्या रांगेतील मागच्या एका टोणग्याने त्याच्या पुढच्याला अचानक मागून जोरात ढकलले. प्रार्थनेत मग्न असलेला पुढचा मुलगा त्याच्या पुढच्या मुलावर, असे करता करता हि ढकलगाडी थेट एक नंबरला उभा असलेल्या 'टिल्ल्या ' पर्यंत गेली. काही कळायच्या आत प्रार्थना चालू असताना टिल्ल्यासह पुढचे २-३ मुलं थेट हौदात. 'टिल्ल्या' नावाप्रमाणेच वर्गात सगळ्यात बुटका असल्यामुळे तो नखशिखांत ओला झाला, पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. अचानक घडलेल्या या अनपेक्षित विनोदी प्रसंगामुळे माइकवर प्रार्थना म्हणणारी मुले माइकवरूनच जोरजोरात हसायला लागली आणि ते पाहून शाळेतील सर्व मुले-मुली आणि शिक्षकही! त्यानंतर प्रार्थनेचा जो विचका झाला तो विचारू नका. त्या दिवसानंतर टिल्ल्या पहिल्या नंबरला कधीच उभा राहिला नाही. पुढेही २-३ दिवस हौदाकडे पहिले कि सगळ्यांना हास्याच्या उकळ्याच फुटायच्या. आजही हे लिहिताना मी एकटाच वेड्यासारखा हसतोय. दहावीनंतर टिल्ल्या कधीच भेटला नाही पण आज १७ वर्षानंतरही या प्रसंगामुळे तो नेहमी आठवतो.

(अशा प्रकारचा धागा या आधी काढलेला असेल तर जाणकारांनी तसे सांगावे म्हणजे धागा काढून घेता येइल.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात गंमत काय ते खरेच मला कळाले नाहि. तो बिचारा 'टिल्ल्या' आणि २-३ मुले त्या हौदाच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली यात हसण्यासारखे काय आहे. ती मुले drown झाली नाहि हे नशिब!

असा एक धागा आहे ऑलरेडी.
किश्श्यांचा तर आहेच पण शाळेशी संबंधित देखील आहे.
शोधतो.

आमच्या वाट्याला अस्ले कस्ले किस्से नै आले बोवा!
आमच्या करता यच्चयावत सगळ्या शाळा म्हणजे अन्दमानवरील जेल होते! Sad

प्रिया ७,
तो बिचारा 'टिल्ल्या' आणि २-३ मुले त्या हौदाच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली यात हसण्यासारखे काय आहे. >>

तो हौद ४ फुट उंचीचा असेल त्यामुळे कोणी बुडण्याची शक्यता नव्हती.

यात हसण्यासारखे काय आहे. >>
अहो कुणी साधे घसरून पडले तरी पाहणाऱ्यांना हसू फुटते. येथे प्रार्थनेच्या गंभीर वातावरणात २-३ मुले अनपेक्षितपणे पाण्यात पडल्यावर पाहणाऱ्यांना हसू येणारच. कदाचित मला तो प्रसंग विनोदाच्या अंगाने मांडता आला नसेल पण तो प्रसंग इतका गमतीदार होता कि सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली होती.

लिम्बुजी,
तेव्हाच्या शाळा सर्वान्ना काळ्या पाण्याची शिक्षाच वाटायच्या. Happy

झकासराव, नन्द्या धन्स...:)