असं कुठे असतं का?

Submitted by मुग्धमानसी on 11 June, 2013 - 07:50

येतोस तरी येतच नाहीस... असं कुठे असतं का?
दिसतोस पण बघत नाहीस... असं कुठे असतं का?

पाऊस म्हणवतोस स्वतःला अन् भिजवून जातोस चिंब पण
मातीत खोल झिरपत नाहीस.... असं कुठे असतं का?

वाटेल तेंव्हा वाटेल तिथे जातोस निघून.... ठिक आहे...
मागे काहीच ठेवत नाहीस... असं कुठे असतं का?

क्षण क्षण शेवरीसारखा भिरभिरत निसटून जाऊ देतोस
चिमूट जराही उघडत नाहीस... असं कुठे असतं का?

हट्ट वगैरे, तत्त्व वगैरे, मुद्दे वगैरे सगळंच ठाम!
झुळुकीनं सुद्धा हलत नाहीस... असं कुठे असतं का?

एक अख्खा जन्म इथं जळतो आहे दिवा बनून
अजून माझ्यात पोचत नाहीस... असं कुठे असतं का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users