ताईबाई(एक गॉंडमदर)

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 June, 2013 - 12:25

नउवारी लुगड्याचा
घट्ट पदर खोचून
ताईबाई चालतात
कोल्हापुरी घालून १
धाडधाड चालतात
फटकन बोलतात
घाबरून पोर त्यांना
लपुनिया बसतात २
पांढऱ्याशुभ्र केसांचा
मोठा बुचडा बांधून
हातामध्ये भली मोठी
कापडी पिशवी घेवून ३
दण दण ताईबाई
जाती जेव्हा रस्त्यातून
सारी देती वाट त्यांना
जरा बाजूला होवून ४
देता कुणा नच कधी
घेती हात आखडून
गाव सारे जाय त्यांच्या
घरी खावून पिवून ५
मांजरांनी घर सदा
असे त्यांचे भरलेले
लेकी माझ्या गुणी साऱ्या
शब्द त्यांचे ठरलेले ६
भल्यावर माया फार
देती सारे उधळून
वाईटाची चीड तशी
दिसे शब्दा शब्दातून ७
चालतात मग तोफा
जणू त्यांच्या तोंडातून
माऊलीच्या क्रोधाने नि
कधी हात सपाटून ८
शमताच पण राग
तया जवळ जावून
करू नको असे पुन्हा
सांगती समजावून ९
येता कधी आळीमध्ये
कुणावरती आपत्ती
ताईबाई धावूनिया
तेथे सर्वाआधी जाती १०
एकट्याच राहतात
त्या लहानश्या घरात
पोर गेला दंगलीत
अन पती लढाईत ११
पेलूनिया दु:ख सारे
घट्ट काळीज करून
साऱ्या देती आधार त्या
जणू घरच्या होवून १२
दररोज संध्याकाळी
नच चुकता सतत
फोटो पुढे लावतात
एक मोठी तेलवात १३
शांतपणे राहतात
डोळे आपुले मिटून
येण्याआधी डोळा पाणी
आळी निघे दणाणून १४

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सुंदर काव्यशब्द्चित्र >>>> +१

पांढऱ्याशुभ्र केसांचा >>>> ऐवजी - शुभ्र पांढऱ्या केसांचा - लयीच्या दृष्टीने हे जास्त बरोबर होईल असे वाटते. इतरत्रही अशी कुठे गडबड असल्यास कृपया सुधारुन घ्या - निर्दोष होऊन जाईल ही रचना.

धन्यवाद भारती ताई ,शशांक
शशांक,पांढऱ्याशुभ्र हा शब्द डोक्यात, मनात घट्ट बसला आहे .त्यामुळे तो बदलला कि मलाच त्रास होतोय .तूर्त राहू देत .