येत्या पावसाळ्यात....

Submitted by आनंद पेंढारकर on 10 June, 2013 - 07:15

दिवस एखादा ठेव राखून माझ्या खात्यात
येत्या पावसाळ्यात …….
जागून जाऊ एकपणाच्या काही क्षणात
येत्या पावसाळ्यात …….

माथ्यावर ओथंबलं आभाळ पेलू
गोंदण थेंबांचं तळव्यावर झेलू
बुडून जाऊ तळव्यावरच्या इवल्याश्या तळयात
येत्या पावसाळ्यात …….

गंधओल्या वाटेवर वाहत राहू
पाऊस न थांबण्याची वाट पाहू
कविता पाण्याच्या गुणगुणू सरींच्या तालात
येत्या पावसाळ्यात …….

उतरणीवरच्या झाडांगत चिंब भिजू
हिव भरल्या पाखरांगत पानात थिजू
मिसळून जाऊ भोवतालच्या बरसत्या स्वर्गात
येत्या पावसाळ्यात …….

बसून आठवणींची गाठोडी खोलू
जमाखर्च आयुष्याचा शब्दात तोलू
ओघळू देत अश्रू गालावरून, हात ठेवू हातात
येत्या पावसाळ्यात …….

दिवस अख्खा मनाच्या कुपीत भरू
मावळतीचे रंग लेऊन मागे फिरू
पावलं घराच्या वाटेवर, मन रेंगाळेल रानात
येत्या पावसाळ्यात …….

आनंद पेंढारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users