पाऊस फार झाला

Submitted by मुग्धमानसी on 7 June, 2013 - 05:09

पाऊस फार झाला
जीवाच्या पार झाला
पुन्हा ओल्या सरींचा
मला आजार झाला

ढगांच्या पार त्याने
ओढूनी चित्त नेले
इथे उरले धुके अन्
तिथे अंधार झाला

कसा निर्लज्ज पाऊस
शिरे वस्त्रांत माझ्या
मोकळी गात्रं झाली
निळा शृंगार झाला

बिलगला तो असा की
स्मृती सगळ्या निमाल्या
उरी काळ्या मण्यांचा
उगाचच भार झाला

असे त्याचे गरजणे
नी मी चोरून भिजणे
जुन्या सवयींस माझ्या
नवा आधार झाला

बदलती ऋतू तरिही
कोरडे उरे तरिही
दिठीच्या पार नेहमी
पाऊस फार झाला...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ढगांच्या पार त्याने
ओढूनी चित्त नेले
इथे उरले धुके अन्
तिथे अंधार झाला

<< व्वा ! सुंदर...(नेहमीप्रमाणे)आवडली!

अप्रतिम !! नेहमी वाचायला मिळणार्‍या पाऊस कवितांपेक्षा कितीतरी वेगळी आणि उच्च!! जियो ! Happy

नि. १०

क्या बात है, मस्त. सर्वच ओळी आवड्ल्या.
आणि पुन्हा पुन्हा वाचावी अशी कविता.

-दिलीप बिरुटे