जुनाच पाऊस, जुनाच तू,तरी..

Submitted by भारती.. on 5 June, 2013 - 15:53

जुनाच पाऊस, जुनाच तू,तरी..

नील लहरीतून चमचमणारी
स्वर्णिम पखरण किरणफुलांची
काळवंडली, निळ्या नभावर
दाटी ज्येष्ठातील मेघांची

''रेशीमकुरळ्या घनावळी या
निळ्यासावळ्या तुझ्या मुखावर''
जसे वाटले तसे म्हणू मी ?
दबलेले हसशील का त्यावर ?

''नवे काही तू तरी बोल ना
नित्य जसा मी नवाच असतो
नव्या रसाने मोहळलेल्या
नित्य नवीन क्षणात विलसतो''

कळते आहे रे युगे लोटली
गोपगोपींना, त्या राधेला
नेमाने ऋतुचक्रे फिरली
भ्रमवत रमवत वसुंधरेला

चक्रे यंत्रांची गिरण्यांची
शास्त्रार्थांची संगणकांची
आकलनाची आस्वादाची
अन भयचक्रे विनाशकांची

वेगळ्याच ढंगात उमटल्या
तुझ्या गोकुळी नव्या हिरवळी
आकांतांच्या काळोखातून
विद्युत-रेखांची रांगोळी

तरीही कोठे काय बदलले
ज्येष्ठातील पहिली येता सर
कालिंदीतटी कदंब डोलत
आसमंती घुमतो मुरलीस्वर

मनमोहन तू रास रचविशी
पावलावरी मुडपून पाऊल
जुनाच पाऊस, जुनाच तू,तरी
नव-मोहांची जागे चाहूल..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज लक्षात आलं की मला मायबोलीवर काल-परवा एक वर्ष झालंय. माझं माझ्यापरीने सेलिब्रेशन ! कृष्ण या हक्काच्या विषयावर आजच लिहिलेली एक कविता.
आभार मायबोली अन माबोकर, खूप छान गेलं वर्ष इथे.

खूप छान गेलं वर्ष इथे. >>>> तुमच्या लेखनानेही आम्हाला खूप आनंद मिळाला - असाच आनंदठेवा तुमच्याकडून मिळत राहो.

अभिनंदन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुंदर कविता.

मनमोहन तू रास रचविशी
पावलावरी मुडपून पाऊल
जुनाच पाऊस, जुनाच तू,तरी
नव-मोहांची जागे चाहूल.. >>> विशेष आवडले.

अप्रतिम!

आवडली कविता Happy

खूप छान गेलं वर्ष इथे. >>>> तुमच्या लेखनानेही आम्हाला खूप आनंद मिळाला - असाच आनंदठेवा तुमच्याकडून मिळत राहो << ++१

अभिनंदन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

छान कविता.
"चक्रे यंत्रांची गिरण्यांची
शास्त्रार्थांची संगणकांची
आकलनाची आस्वादाची
अन भयचक्रे विनाशकांची " >>>> हे कडवं विशेष वाटलं.
-----------------------------------------------------------------------------------
माबो वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तरीही कोठे काय बदलले
ज्येष्ठातील पहिली येता सर
कालिंदीतटी कदंब डोलत
आसमंती घुमतो मुरलीस्वर

मनमोहन तू रास रचविशी
पावलावरी मुडपून पाऊल
जुनाच पाऊस, जुनाच तू,तरी
नव-मोहांची जागे चाहूल..<<< उत्तम !! वा वा!

दबलेले हसशील का त्यावर ?<<<

नव्या रसाने मोहळलेल्या<<<

सुंदर ओळी! काळाशी समर्पक रचना! परिपक्व प्रासादिक अभिव्यक्ती.

एक वर्ष पार पडल्याबद्दल अभिनंदन! या वर्षात मायबोलीला तुमच्या रुपाने व्यासंगी कवयित्री व लेखिका मिळाली यासाठी मायबोलीचेही अभिनंदन!

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

शूम्पी,श्यामली, विजयाताई, शशांकजी, विक्रांत, बेफिकीर,वैभव,जाई,शाम, उल्हासजी..इतरही सर्व सुहृद..
सर्वच आत्मीयांचे खूप आभार, अगदी लिहितालिहिताच रचना टाकली होती.
लाजो, गेल्या वर्षी आल्याआल्याच तू मार्गदर्शन केलं होतंस ते आठवलं Happy

शशांकजी, मी लिहिलेलं 'सहप्रवास' चिकाटीने वाचणार्‍या अगदी थोड्या लोकांपैकी तुम्ही ,अन नेहमी प्रोत्साहनपर , कधी सांत्वनपरही सल्ला देणे त्यावर, हेही आठवतंय Happy

बेफिकीर, >>एक वर्ष पार पडल्याबद्दल अभिनंदन! या वर्षात मायबोलीला तुमच्या रुपाने व्यासंगी कवयित्री व लेखिका मिळाली यासाठी मायबोलीचेही अभिनंदन>>>>
हे अगदी गहिवरूनच टाकणारं, प्रत्येक (विशेषतः) कविता इथे टाकल्यावर एखाद्या नवोदितासारखी नर्व्हस असते मी, कविता टाकायच्याच कशाला वगैरे मूलभूत प्रश्न सुचतात, पण तुम्हा सर्वांच्या आत्मीयतेमुळे धीर होतो.

वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन!
जाणिवांना शब्दकळांमध्ये यथार्थपणे ओतू शकणारी कवयित्री आम्हाला वाचायला मिळाली, आम्हीच भाग्यवान!!

वेगळ्याच ढंगात उमटल्या
तुझ्या गोकुळी नव्या हिरवळी
आकांतांच्या काळोखातून
विद्युत-रेखांची रांगोळी

मनमोहन तू रास रचविशी
पावलावरी मुडपून पाऊल
जुनाच पाऊस, जुनाच तू,तरी
नव-मोहांची जागे चाहूल..>> फार आवडले..

Happy

धन्यवाद दिनेशदा, सुशांत..

गेलं वर्ष आठवताना तुम्हा सर्वांना त्यातून वगळणं अशक्य आहे.. मराठी टाइपसुद्धा करता न येण्यापासून माझी सुरुवात होती.. कवितेची अन साहित्याची एका नको तितक्या सिन्सिरिटीच्या ओझ्याखाली पिचून गेलेली आवड फक्त जवळ होती, अन त्यासाठी काढलेली नवी सवड..

इथे हजर होताना घेतलेलं लांबलचक नाव माझ्या अज्ञानाचा भाग होता हे नंतर इतरांची स्मार्ट सुट्सुटीत पेननेम्स वाचताना कळलं, पण आता असो तेही, 'भारती' , 'भारतीताई' वगैरे प्रेमसंबोधनं अंगवळणी पडलीत एरवीही Happy

सुशांत खुरसाले १
मलाही नेमक्या त्याच ओळी विशेष आवडल्या!
एकूण कविता खासंच! अभिनंदन भारतीजी!