आंब्याचा जॅम

Submitted by मंजूडी on 3 June, 2013 - 06:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आंबा, साखर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

१. आंब्याचा रस काढून मिक्सरमधून फिरवून छान गुळगुळीत करून घ्या. आणि तो रस वाटीने मोजून घ्या.

२. तीन वाट्या आमरस असेल तर अर्धी वाटी साखर लागेल.

३. एका पसरट आणि खोलगट अश्या पॅनमधे आमरस आणि साखर नीट एकत्र करून मंद गॅसवर ठेवा.

४. मिश्रणाला एक उकळी आली की त्यात लिंबाचा रस घाला. तीन वाट्या आमरस आणि अर्धी वाटी साखर या प्रमाणासाठी दोन लिंबांचा रस पुरेसा होतो.

५. मिश्रण सतत ढवळत रहा. हे मिश्रण शिजताना त्याचे शिंतोडे उडतात, म्हणून खोलगट पॅन घ्यायचा आहे, आणि ढवळण्याचा चमचा/ डाव/ कालथा इत्यादीपैकी जे साधन वापराल ते लांब दांड्याचं घ्या.

६. उकळी आल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी मिश्रणाचे शिंतोडे उडण्याचे बंद होईल, आणि मिश्रण खदखदायला लागेल. त्यानंतर लगेचच ते चकचकीत दिसायला लागेल की मग गॅस बंद करा. जॅम तयार आहे.

७. ते मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर नीट ढवळून (खरंतर कालवून) एकत्र करा, आणि कोरड्या बाटलीत भरून ठेवा.

अधिक टिपा: 

१. जॅमसाठी कुठला आंबा घेताय, त्याची चव कशी आहे यावर साखरेचं प्रमाण कमी जास्त होते. अगदी गोड आंबा असेल जसे की हापूस, केशर वगैरे तर तीन वाट्या रसाला अर्धी वाटी साखर हे प्रमाण योग्य आहे. इतर जातीच्या आंब्यांसाठी (तोतापुरी, लंगडा इत्यादी) साखर थोडी जास्त लागेल, रसाची चव बघून साखरेचं प्रमाण वाढवा.

२. रसाळ आंबे वापरले (पायरी, दशहरीसारखे) तर आधी नुसता रस उकळू द्या, रसाला उकळी आली की मग त्यात साखर मिसळा आणि मग क्रमांक ४ पासून पुढे कृती करा.

आंब्याच्या जातीवर जॅमची चव अवलंबून आहे. पण कुठल्याही आंब्याचा जॅम छानच लागतो. गरम फुलका, त्यावर तूप आणि आंब्याचा असा घरगुती जॅम पसरून रोल करून खाणे हा माझा कम्फर्ट नाश्ता आहे.

हा मोबाईलातून काढलेला फोटो:

mango jam.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करून पाहीला आज हा. दोन हापूसचे आंबे होते त्याचा जवळपास दोन वाट्या रस झाला. मी मिक्सरमधून नाही फिरवला जरा टेक्षर राहावं म्हणून. त्यात ५/७ लहान चमचे साखर मिठाची कणी आणि एका लिंबाचा रस घालून १५ मिनिटं तसंच ठेवून दिलं. नंतर आटवून जॅम केला. मस्त जमला आहे. Happy

Pages