दिल ढूँढता है ...

Submitted by भारती.. on 23 May, 2013 - 04:58

दिल ढूँढता है ...

त्या आळसलेल्या सुखावलेल्या दिनराती
त्या पहिल्या प्रेमाच्या उत्कंठित रुजवाती

सहवास तिचा रंगवीत तंद्रीतच बसणे
मन शोधत आहे पुनः तसे भ्रमणेरमणे

दिस उजाडला तरी अंगणात लोळत होतो
कोवळ्या हिवाळी उन्हाशीच खेळत होतो

मग उपडे पडुनी कूस बदलुनी झोपावे
छायेत तुझ्या पदराच्या डोळे निववावे

कधी उन्हाळ्यातल्या रात्रौ पूर्वेच्या झुळुका
घेऊन सवे येती शीतलशा काळोखा

पसरून छतावर शुभ्रशीत चादरी आम्ही
जागलो किती निरखीत चांदण्या गर्द तमी

आणिक कधीतरी पर्वतातल्या शिशिरात
गोठवते थंडी हिमवर्षावी प्रहरात

दरी खोरी घुमवीत ऐकू येते जणू शांती
क्षण ओले कुठुनी पापणीत दाटून येती..

भारती बिर्जे डिग्गीकर

(* 'गच्ची' ऐवजी 'छत' -श्री.अशोक पाटील यांची सूचना, 'मी' ऐवजी 'आम्ही'-अश्विनीमामींची या दोन्ही सूचना अर्थाच्या अंगाने विचारांती ग्राह्य वाटल्या म्हणून बदल केलेली ओळ, धन्यवाद दोघांचेही.)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिल ढूँढता है ...

दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए

जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
आँखों पे खींचकर आँचल के साये को
औंधे पड़े रहें कभी करवट लिये हुए

या गरमियों की रात जो पुरवाईयाँ चलें
ठंडी सफ़ेद चादरों पे जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए

बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए

(चित्रपट मौसम (1975)
संगीत मदन मोहन
गीतकार गुलज़ार
गायक : भूपिंदर सिंह, लता मंगेशकर)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुर्कत चा अर्थ फुर्सत पेक्षा भारी लागेल

हा कवितेतला नायक फावल्यावेळी हे सर्व करत होता त्या ऐवजी वियोगाच्या वेळी हे करत होता असा अर्थ मराठी अनुवादाला तरी उत्तम बसतो आहे

आणि या वियोगात मनात तिला काल्पनिकपणे रंगवून तीची सोबतही अनुभवत अनुभवत हे सर्व उपभोग घेतो आहे असे पाहता येते आहे

मजा अजूनच वाढते आहे

गालिबाने फुर्कत लिहिले नसेलच तर त्याने लिहायला हवे होते राव असे वाटू लागले आहे

असो
हाकानाका (हाय काय अन् नाय काय )
आपण कशाला वाद घाला उगाचच ! मूळ आणि अनुवादित दोनीही नितांत मस्त आहेत त्याचा आस्वाद घेवूयात Happy

आभार सर्वांचेच, एका फुरसतीत केलेल्या आनंददायी भावानुवादावरच्या चर्चेसाठी.अनेक मुद्दे आहेत..

शुचितेबद्दल.. खरं आहे वैभव, शुद्ध काय म्हणून तुम्ही प्रश्न करताय , आत्मिक पातळीवर खरे आहे, पण ऐहिक पातळीवर स्पष्ट बोलायचे तर ठासून सांगेन की माझ्या 'मध्यान्ह' मधली एकही कविता दुसर्‍याची एकही ओळ वा शब्दसमूह जाणतेपणी घेऊन घडवलेली नाही. हां, माझ्यावरचे संमिश्र संस्कार माझ्या कवी-पूर्वजांची गूणसूत्रे दाखवत असतील ते वेग़ळे. पण कविता लिहिताना ती अस्सलपणे माझीच होती,आहे,असेल.

समीर, असे खरेच फार पूर्वीच वाचले होते खरे की फुर्कत (वियोग) ऐवजी 'फुर्सत' (निवांतपणा) केले गेलेय व त्यानुसार उरलेल्या रचनेचेही सुकाणू फिरवले गेलेय.संदर्भ आता आठवत नाही/सापडत नाही,उर्दूचा अभ्यास तुम्हा मंडळींचाच अधिक,तेव्हा कुणाला अजून काही आठवल्यास बरं होईल. .अर्थात अधिक माहिती नसल्याने,केवळ एका आठवणीवर आधारित विधान केले, ते चर्चेच्या ओघात केले.चु.भू.द्या.घ्या.

आनंदयात्री Happy

केश्वी,अश्विनीमामी, साती, रचनेत स्मरणरंजन असल्याने सुखातले दु:ख अन दु:खातले सुख आहे, शब्दांचा मागोवा घेताना कोणती छटा गडदलीय ते भाषेच्या पोतावर, अनुवाद्कर्त्याच्या आकलनशक्तीवर सोडलेले ..
''गच्चीत पांढर्‍या स्वच्छ चादरींवरती मी
जागलो किती निरखीत चांदण्या गर्द तमी'' - या ओळींत मी मनःचक्षूंनी त्याला एकट्यालाच विरहदंशाच्या हव्याशा आठवणी जागवत शांत रात्री चांदण्या मोजत गच्चीवर जागताना पाहिले.त्या ओळींमधली Tranquility एकाकी प्रहरात जागलेली मला भावली,तसेच पर्वतातल्या हिमवर्षावी प्रहरात दुमदुमणारी शांतता ऐकणे हीसुद्धा प्रेम ओलांडून गेल्यावरची स्तब्धता वाटली. वैवकु म्हणतात तसे मी फुर्कतचे रंग गडद केले.एरवी,
गच्चीत पांढर्‍या स्वच्छ चादरींवर आम्ही
जागलो किती निरखीत चांदण्या गर्द तमी
असे केले की अर्थ बदलतो, सहवासाच्या छटा येतात..

उत्तम प्रतिसाद भारतीताई !!!

शुचितेबद्दल मत पटले , म्हणजे माझेही काहीसे असेच होते आधीपासूनच.... मी फक्त एक चर्चा इच्छित होतो जेणेकरून माझे चिंतन बरोबर की चूक हे मलाच पडताळता यावे Happy

मध्यान्ह बद्दल जे लिहिलेत त्यातला शब्द न् शब्द खरा आहे मी अनुभवलय म्हणून सांगू शकतो
मध्यान्ह हा एक अप्रतीम काव्यसंग्रह आहे जो कुणाच्याही संग्रही असावाच असा आहे यातील अनेक कविता पाठ्यपुस्तकातून शिकवाव्यात अश्या आहेत
कवी होवू पाहणर्‍या माझ्यासारख्या नवोदिताना उत्तम कविता कशी करायची याचे अनेक दाखले या संग्रहात मिळतील
(मध्यान्ह च्या दुसर्‍या आवृत्तीसाठी व तुमच्या नवीन कवितासंग्रहासाठी नक्की प्रयत्न करावेत या वेळी विठ्ठल तुम्ही डीसर्व करत असलेले प्राप्य ते नक्की पदरात पाडेल असे वाट्ते )

फुर्कत -फुर्सत दोन्हीतही एक विलक्षण गम्मत आहे मात्र !! Happy

समीर, असे खरेच फार पूर्वीच वाचले होते खरे की फुर्कत (वियोग) ऐवजी 'फुर्सत' (निवांतपणा) केले गेलेय व त्यानुसार उरलेल्या रचनेचेही सुकाणू फिरवले गेलेय.संदर्भ आता आठवत नाही/सापडत नाही,उर्दूचा अभ्यास तुम्हा मंडळींचाच अधिक,तेव्हा कुणाला अजून काही आठवल्यास बरं होईल. .अर्थात अधिक माहिती नसल्याने,केवळ एका आठवणीवर आधारित विधान केले, ते चर्चेच्या ओघात केले.चु.भू.द्या.घ्या.

मी जाफ़रींचे दीवान-ए-गा़लिब पाहिले.
बरोबर शेर असा आहे:

जी ढूँढता है फिर वही फ़ुरसत की रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए

मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद.

अजून एक बाब लक्षात आली

हिंदीमधे लोक मी ला हम असे आदरार्थी संबोतात
या इथल्या हिंदी कवितेत हम हा शब्द कुठेही नसला तरी वाक्यरचनेवरून समजते की हम अव्यक्त ठेवलाय

या हम चा अर्थ आम्ही / आपण असाही होतो
वर सहावासातील कविता की वियोगातील हा मुद्दा उपस्थित करणार्‍या लोकांनी आपण दोघे असा अर्थ लावलाय

आता मूळ पिच्चरमधे कोणत्या प्रसंगासाठी हे गीत घेतलेय हे पहायला हवे ...वियोगात की सहवासात त्यावरून काय ते समजेलच
ते समजेल पण् मूळ कवीने कोणत्या क्षणात ते लिहिलय (फुर्सत /फुर्कत) ते त्यालाच ठावूक !! Happy

नीट पाहिल्यास २ ओळी आहेत ज्या परस्पर विरोधी प्रसंगातून आल्यात असे सुचवू पाहतात अनुक्रमे सहवास आणि वियोग

आँखों पे खींचकर आँचल के साये को<<<<ती सोबत आहे असे आँचल वरून कळते
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए<<<< वियोगातील स्मृतींमुळे असे डोळे पाणावल्याची शक्यता जास्त

मी- - आम्ही च्या शक्यता ५०-५०..
पहिल्या कडव्यातील आंचल हा आंचल का साया आहे (मनोनिर्मित आभास ? पुनः एकट्या मनाचा खेळ ?) अद्भुत कोडे आहे खरे.
पण अश्विनीमामी, समीर, वैवकु ,साती , मान्य, या गाण्याच्या सुरावटीतही प्रसन्नता अधिक आहे , विरह, ओलावलेले डोळे हे त्या प्रमाणात सौम्यशा हुरहुरीचं प्रतीक आहेत, म्हणून 'फुर्सत' च्या बाजूला झुकणारं( शिवाय 'फुर्कत'चा पुरावा नसल्याने संशयाचा फायदाही मिळतोय 'फुर्सत'ला Happy ) 'आम्ही'वाला पर्याय स्वीकारत आहे..संपादित करत आहे.
वैभव, मध्यान्ह्वरील अभिप्रायार्थ धन्यवाद..येथे त्यावर काय लिहू ? माझ्या जीवाचा की जीवनाचा तुकडा तो..

http://www.youtube.com/watch?v=-_9p3atjdK8

नेटवर ढुंढता ढुंढता वरील लिंक मिळाली...
पहिल्या २० सेकंदात गुलझार साहेबांची काँमेंट ऐकण्यासारखी आहे. (जुंबिश म्हणजे काय?)

मनस्मि, जुंबिश म्हणजे मूव्हमेंट, प्रवाहिता असा अर्थ मिळाला..गुलझारजी म्हणताहेत 'मिसरा गालिबचा, कैफियत कुणाचीही.. ही 'फुरसत' गतीशील आहे, स्थितीशील नाही.. '

एकांतातील निवांतक्षणांमध्ये सामावलेली ही गती आठवणींची, विचारांची, त्यातून उन्मळून फुटून वाहणार्‍या प्रतिभाप्रवाहांची असे त्यांना म्हणायचे असावे..

धन्स या लिंकसाठी, या विलक्षण कवीची भूमिका महत्वाची आहे, त्याने दुसर्‍या एका महान कवीचे शब्द घेऊन रचना प्रवाहित केली आहे व त्याची जाहीर कबुलीही दिली आहे.

धन्यवाद भारती.

तुम्ही केलेले भाषांतर चांगले आहे पण हे गाणे, त्यातील संगीताचे तुकडे, याचे चित्रीकरण, भुपिंदर, लताचा आवाज यांचे एक जे अद्भुत रसायन निर्माण झालेले आहे आणि जे इतके डोक्यात भिनले आहे कि या गाण्याच्या संदर्भात काहीही आले तरी त्याची मुळ कलाकृतीशी तुलना होतेच होते. आता हे नवीन प्रयत्न करणार्‍यांसाठी अन्यायकारक आहे हे कळतेय पण या सगळ्याशी "हेड टु हेड" जाण्याचे धाडस दाखवणारेही किती असतील?
तुमचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद.

हेच गीत(कविता) थोडे सोपे शब्द वापरुन (उदा.उत्कंठीत रुजवाती, गर्द तमी इ. न वापरता) मुळ गाण्याच्या चालीवर लिहायचा प्रयत्न कराल का? तुम्हाला नक्की जमेल असे वाटते.

धन्यवाद.

मनस्मि, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे समवृत्त अनुवाद ( जो तुम्हाला हवाय तो ) नाहीय हा, तसा तो आतून आला नाही. त्याची मजा वेगळी असते, मात्र तो आतून यावा लागतो, नाहीतर शब्दांची केविलवाणी कृत्रिम ओढाताण ठरते ती. उत्स्फूर्ततेचं महत्व कवीसाठी खूप आहे..एकदा तारा जुळल्या, तंबोरे लागले तर मात्र अहाहा ! धन्यवाद या मनमोकळ्या प्रतिसादासाठी.

मनस्वी भारतीताईनी निवडलेले शब्द हे त्यांच्या कवितेचे खरे सामर्थ्य आहे बाज आहे पिंडधर्म आहे
त्यात बदल करा असे सुचवण्याचा अधिकार वाचकास रसिकास नसतो

ते / तसे शब्द आहेत म्हणूनच ती भारतीताईंची कविता ठरते तीच तिचि शुद्धता शुचिता आहे
हे जे भारतीताईंच्या कवितेत आहे त्यामुळेच ही कवयित्री अन् हिची कविता मराठी काव्याच्या तारकासमूहात अद्वितीय ठरून तेजाळते आहे

मनस्वी अपण कोणत्याही कवीचे लेख वाचताना हा मुद्दा लक्षात घ्यावात ही विनंती

आज पुन्हा दिल ढूंडता ऐकताना ,कवितेची आठवण झाली .ऐकत वाचली . मजा आली .तसव्वुर- म्हणजे कल्पना, दिवास्वप्न, विचार,,, दिवास्वप्नच ना ? तुम्ही वापरलेला रूजवाती ..आठवणी या अर्थानी आलाय ना ? मूळ
रुजवात शब्दा बद्दल सांगाल का?

Pages