एक निःशब्द जाणीव...

Submitted by चेतन... on 21 May, 2013 - 07:09

मध्यरात्रीच्या नीरव शांततेतून
मनाच्या विश्वातील अणुअणुत
भरून राहिली आहे
एक निःशब्द जाणीव
एखाद्या एकाकी तळ्यासारखी...!

रात्रीच्या निराशय गर्भात
ती शोधत आहे
चन्द्रस्पर्शाने जेव्हा पाण्यावर
तरंग उठतील तो क्षण...!

आणि
तोपर्यंत
चंद्राच्या प्रतिबिंबाचे अभिशाप झेलत
आतुरतेने वाट पाहत आहे
सूर्याच्या तप्त रंध्रातून
प्रकट होणारा
पहिला किरण
देहावर पडण्याची...!

-चेतन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम धन्यवाद समजून घ्यायचा प्रयत्न केल्याबद्दल Happy

मी सांगतो
तळ्याला प्रतिक्षा आहे चंद्रस्पर्शाची…रात्री चंद्राचं प्रतिबिंब तळ्यात पडलंय… पण कितीही झाल तरी प्रतिबिंबच ते …स्पर्श नाहीच …मग ते प्रतिबिंब त्याला सतत चंद्रस्पर्शाच्या अप्राप्यतेच्या दुःखाची जाणीव करून देतंय म्हणून चंद्राच्या प्रतिबिंबाला अभिशाप म्हटले आहे…आणि रात्र आहे तोवर चंद्र असणारच… त्यामुळे जोपर्यंत चंद्रस्पर्शाची अभिलाषा पूर्ण होत नाही तोवर नकोच ही रात्र… रात्री चंद्र आहे चांदणे आहे गारवा आहे , परंतु या सर्वांच्या असण्यापेक्षा चंद्रस्पर्श नसण्याची रुखरुख तळ्याला सतावते आहे …त्यामुळे तळ्याला दिवस बरा वाटत आहे आणि म्हणूनच आता प्रतिक्षा आहे ती सूर्याचा पहिला किरण जो सुखावणारा नक्कीच नाही तो देहावर पडण्याची.

मी असं काही गूढ पहिल्यांदाच लिहिलंय त्यामुळे कुठेतरी कमी पडलो असेल…जरा जास्तच गूढ झालं वाटत Wink

धन्यवाद अभिप्रायाबद्दल…:)

आपण खूप सुंदर शब्दात आशय सांगीतलात धन्यवाद
मला अर्थ लागला होताच .
तुमचे शब्द तुम्हाला जे म्हणायचे आहे ते व्यक्त करायला समर्थ व चपखल असेच आहेतच

पण माझा मुद्दा होता की त्या आधीच्या कडव्यात
<<<रात्रीच्या निराशय गर्भात
ती शोधत आहे
चन्द्रस्पर्शाने जेव्हा पाण्यावर
तरंग उठतील तो क्षण...!>>>>>>

इथे रात्रीच्या निराशय गर्भात ती (ती =वरील कडव्यात आलेली जाणिव अस मी अर्थ लावला) ...ती चंद्रस्पर्शाने पाण्यावर जेव्हा तरंग उठतील तो क्षण शोधत आहे असे आपण म्हणालात ना.... मग लगेच पुढे ते अभिशाप कसे झाले आणि सूर्यकिरण देहावर पडण्याची वाट पाहत राहायची वेळ कशी आली हे काय गुपीत समजले नाही बघा

मला वाटते जरा वेगळे वळण दिले पाहिजे
-आहे च्या जागी वरील दोन कडव्यात(क्र. १ व २) होती असे करून पाहू ......
-आणि तिसर्‍याची सुरुवात जरा बदलून पाहू ...........
-(एक तांत्रिक बाब म्हणजे चंद्रबिंब तळ्यात पडले आहे म्हणजे चंद्रकिरण पडून ते परावर्तीत झाले आहेत...
मग चंद्रबिंब व प्रत्यक्ष चंद्र यात फरक आहे असे सूक्ष्मपणे दाखवावे लागेल मग तुम्हाला जे म्हणायचे आहे ते चटकन् पटण्यासारखे होईल )
- आणि मग सूर्याचाच किरणच का हवा त्यामागची आपली भूमिका काय हेही जरा यायला हवे

.........करून बघूयातरी कसे वाटते ते !!! Happy
==================================================

मध्यरात्रीच्या नीरव शांततेतून
मनाच्या विश्वातील अणुअणुत
भरून राहिली होती
एक निःशब्द जाणीव
एखाद्या एकाकी तळ्यासारखी...!

रात्रीच्या निराशय गर्भात
ती शोधत होती
चन्द्रस्पर्शाने जेव्हा पाण्यावर
तरंग उठतील तो क्षण...!

पण आता ती
अप्राप्य चंद्राच्या ..
रखरखीत प्रतिबिंबाचे ....
अभिशाप झेलत ;

आतुरतेने वाट पाहत आहे.......
सूर्याच्या तप्त रंध्रातून
प्रकट होणारा
पहिला सत्यदर्शी किरण
देहावर पडण्याची...!!!

-चेतन

====================================================

माझ्याकडे आज बराच वेळ होता म्हणून म्हटले एखाद्या आवडलेल्या गोष्टीत घालवूया त्यात तुमची कविता समोर आली म्हणून हा प्रतिसादप्रपंच बाकी काही नाही !!
गैरसमज नसावा
आणि......
धन्यवाद मला सहन केल्याबद्दल Happy
~वैवकु

>>>ती चंद्रस्पर्शाने पाण्यावर जेव्हा तरंग उठतील तो क्षण शोधत आहे असे आपण म्हणालात ना.... मग लगेच पुढे ते अभिशाप कसे झाले आणि सूर्यकिरण देहावर पडण्याची वाट पाहत राहायची वेळ कशी आली हे काय गुपीत समजले नाही बघा.
<<< अभिशाप झाले कारण 'चंद्रबिंब व प्रत्यक्ष चंद्र यात फरक आहे' हे मी गृहीत धरले आहे … चंद्रबिंब हे तळ्याला मृगजळाप्रमाणे भासते आहे.

>>> चंद्रबिंब व प्रत्यक्ष चंद्र यात फरक आहे असे सूक्ष्मपणे दाखवावे लागेल.
<<< फरक आहेच ना Happy

>>>पण आता ती
अप्राप्य चंद्राच्या ..
रखरखीत प्रतिबिंबाचे ....
अभिशाप झेलत ;

<<< हा बदल तितकासा रुचला नाही.

>>> सूर्याच्या तप्त रंध्रातून
प्रकट होणारा
पहिला सत्यदर्शी किरण
देहावर पडण्याची...!!!

>>> हे लई भारी केलंत बघा Happy

>>>>>>>>>>>>>>>>> मनापासून आभार एवढ्या खोलात जाऊन विचार करून आपल मत मांडल्याबद्दल Happy