फार कठीण आहे...

Submitted by मुग्धमानसी on 19 May, 2013 - 17:02

फार कठीण आहे... तुला जाताना बघणं
तुझ्यामागे माझं असं कोरडं कोरडं जगणं

वाट बघणं एवढं तरी काम असायचं तेंव्हा
नकोसं वाटतं आताशा ते उंबरठ्यावर झुरणं

रात्रभर मी पावसाच्या सरी झेलत र्‍हायचे
भेगाळलेल्या मनाला आता झेपत नाही भिजणं

युगे युगे चालून तुझ्या जवळ आले होते
तुला बरं जमलं क्षणात क्षितीज दूरचं गाठणं

झोपेत बदलावी कूस तसं नातं पालटून जातं
कुठवर सोसेल तुला-मला हे नातं राखत जागणं?

प्रवाहातल्या दिव्यांसारखे सोडून दिलेत तुझे विचार
प्रेम, सवय, कर्तव्य, माया... जमतंय का तीर गाठणं?

जमून गेलंय आताशा पाऊस कोरडं राहून झेलणं
तरीही फार कठीण आहे... तुला जाताना बघणं!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा !! जमलय की .......

मलातरी ही जवळ्जवळ गझलच दिसतेय !!!!! एखाद्दुसरी मात्रा कुठेतरी जास्त झाली असेल पण फरक नाही पडतय इतकं छान लिहिलय्त तुम्ही

रात्रभर मी पावसाच्या सरी झेलत र्‍हायचे
भेगाळलेल्या मनाला आता झेपत नाही भिजणं

युगे युगे चालून तुझ्या जवळ आले होते
तुला बरं जमलं क्षणात क्षितीज दूरचं गाठणं

>> व्वा!!

तुला बरं जमलं क्षणात क्षितीज दूरचं गाठणं
>> ही फारच आवडली! थेट!