’मी आहे ना सांग?’

Submitted by मुग्धमानसी on 15 May, 2013 - 07:19

’आताच दमू नकोस फार
जायचं आहे लांब’ म्हण
एकदा तरी हात धरून
मला ’थोडं थांब’ म्हण...

माझं गुर्‍हाळ तक्रारिंचं
कुरकुर करु लागलं की
जवळ बसवून मला फक्त
’ऐकतो मी तू सांग’ म्हण...

कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...

कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...

मी हसताना उधाणलेले
मी रडताना गहिवरलेले
अश्रू माझे टिपून ठेव अन्
’जपून ठेवलंय वाण’ म्हण...

मोठेपण सोसणार नाही
पायांत त्राण उरणार नाही
तेंव्हा कुशीत घेऊन मला
’बाळ माझी छान’ म्हण...

फार काही मागत नाही
माझी तहान भागत नाही
हरलेच कधी मी तर हसून
’मी आहे ना सांग?’ म्हण...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद... माझ्या या साध्याच बाळबोध कवितेला... भरून आलं मला! धन्यवाद तरी किती देऊ समजत नाहिये. शब्दच नाहियेत.
मी इतकं छान लिहीते हे आजवर कुणीच मला असं कळू दिलं नव्हतं. मला माझी नव्याने ओळख करून दिल्याबद्दल लक्षावधी धन्यवाद मायबोली!!!!

अजून एक सुंदर कविता !!
वा वा
_______________________________

एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद... माझ्या या साध्याच बाळबोध कवितेला.<<<<<<

खरय !! तुकोबाराय म्हणालेच होते ....कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे

सगळ्यांनी इतकं भरभरुन लिहीलं आहे कि मी आणखी वेगळं काय लिहू!

संपूर्ण कवीता कोट करावी लागेल...
छान ... खुपच छान! Happy

'कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे' + १००!

basss ....max aavadliye...mi hi kavita kitihi vela vachu shakto...arthat thodya divsat pathch hoil mhana Happy

अप्रतीम!!!! कित्ती साधी सोपी, तरीही सहज-सुंदर!!!! सगळीच कडवी थेट भिडली आतपर्यंत!!!
'धन्यवाद' तर आम्ही तुला म्हणायचं मुग्धमानसी!!!!

पुन्हा एकदा... किती सहज किती सुंदर.

मुग्धमानसी, तुझं वाचलं की अजून काही वाचायचं नाही असं काय म्हणून करून ठेवतेस बाई?.. आज पुन्हा एकदा... हे असच.
(खूप आतलं, तरल तरीही सहज शब्दांत किती अचुक पकडतेस... माझ्या... आमच्या स्वार्थासाठी हे कध्धी कध्धी बदलू दे नको, देवा)

Pages