गुरुपूजन!

Submitted by झुलेलाल on 1 November, 2008 - 14:05

आतमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि शाळेचं कॅन्टीन चालवणारा महाराज खांद्यावरच्या कळकट टॉवेलला हात पुसत धावतच हॉलच्या दरवाज्याशी आला.
हॉलमध्ये टाळ्या वाजतच होत्या, आणि स्टेजवर राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून तो बराच वेळ तसाच बसला होता...
महाराजला हेच दृश्‍य अपेक्षित होतं.
काही वेळानं टाळ्या थांबल्या. खचाखच भरलेल्या हॉलमध्ये केवळ शांतता पसरली होती.
... आणि सगळ्यांचे डोळे पाण्यानं भरले होते.
राणे सरांच्या पायावर डोकं ठेवून त्यानं सरांची पावले हातांनी गच्च धरली होती, आणि तोही मुसमुसून रडत होता.
पण त्या रडण्याला दुःखाची जराशीदेखील छटा नव्हती.
राणे सरांनी त्या अवघडलेल्या स्थितीतच डोळ्यांवरचा चष्मा काढून कोटाच्या खिशातल्या रुमालानं आपले डबडबलेले डोळे पुसले, आणि अगोदरच वयोमानानं वाकलेलं आपलं शरीर आणखी वाकवून पायावर झुकलेल्या त्याला थरथरत्या हातांनी त्यांनी उठवलं...
आता तोही सावरला होता. उठून त्यानं राणे सरांना घट्ट मिठी मारली, आणि तोवर फक्त गहिवरलेल्या सभागृहातल्या सर्वांचाच बांध फुटला.
राणे सरांच्या गळ्याला घट्ट मिठी मारून तो उभा होता.
स्टेजवरच्या खुर्च्यांवर बसलेले सगळेच स्तब्ध, स्तब्ध झाले होते.
कोपऱ्यावरच्या खुर्चीत बसलेल्या श्रोत्री बाईंनी हलकेच आपली खुर्ची मागे सरकवली, आणि थकल्या पावलांनी चालत त्या या दोघांच्या जवळ आल्या. हलक्‍या हातांनी राणे सरांभोवतीची त्याची मिठी त्यांनी सोडवली, आणि डोळे पुसत त्या पुन्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या.
आणि इतका वेळ केवळ गहिवर भरलेल्या त्या सभागृहाचा बांध फुटला.
फक्त अश्रूंचीच सोबत असलेल्या त्या स्तब्धतेत आता हलकेसे हुंदकेही ऐकू येत होते...
जराशानं जड पावलांनी राणे सर आपल्या खुर्चीवर बसले, आणि सभागृहाकडे पाहून मान झुकवत विनयशील नमस्कार करून तोही स्टेजवरून खाली उतरला. सभागृहातल्या मागच्या एका रांगेतल्या आपल्या खुर्चीवर जाण्यासाठी खुर्च्यांच्या गर्दीतून वाट काढत असताना, सगळ्यांच्या माना त्याच्या गतीने मागेमागे होत होत्या...
दरवाज्यातच उभ्या असलेल्या महाराजनं आपले पाणावलेले डोळे खांद्यावरच्या टॉवेलनं टिपले, आणि स्वतःशीच जोरजोरात मान हलवत तो कॅंन्टीनमध्ये परतला.
कॅन्टीनमध्ये फारशी गर्दी नसली, की महाराज कोपऱ्यातल्या एका बाकड्यावर जाऊन एकटाच बसायचा.
त्या वेळी त्याचं कुणाकुणाकडे लक्ष नसायचं...कुठल्यातरी आठवणीत हरवून गेल्यासारखं, शून्यात नजर लावून बसलेल्या महाराजाचे डोळे तेव्हा मध्येच चमकायचे, कधी तो स्वतःशीच खुदकन हसायचा, आणि अचानक त्याच्या रापलेल्या चेहऱ्यावर दुःखाची एखादी सुरकुतीही उमटायची...
कॅन्टीनच्या त्या कळकट कोपऱ्यातल्या त्या बाकड्यानं गेली कितीतरी वर्षं महाराजाला त्या एकटेपणात जिवाभावाची साथ दिली होती.
त्याच्या मनात उमटणाऱ्या आठवणींच्या लहरी अगदी जवळून पाहिल्या होत्या...
ओठावर नुकती मिसरूड फुटलेली असताना कधीतरी गावाकडून आलेल्या या पोराच्या ओठावरच्या मिशा आता पांढऱ्याफटक झाल्या होत्या.
तेव्हा शेगडीखालच्या विस्तवाला पंख्यानं वारा घालत आग फुलविताना त्याच्या डोळ्यात उमटणारी चमक आता इतक्‍या वर्षांनंतर काहीशी विझत चालली होती...
आज मात्र महाराज काहीतरी वेगळाच वाटत होता.
बऱ्याच दिवसांनी त्याच्या डोळ्यांतली ती चमक जागी झाली होती...
हॉलमधून येऊन त्या नेहमीच्या बाकड्यावर बसल्यावर एकदाच त्यानं डोळे पुसले, आणि तो स्वतःशीच हसला...
त्याची नजर नेहमीसारखीच पलीकडच्या कोपऱ्यात खिळली...
भूतकाळाच्या पट त्याच्या डोळ्यासमोरून स्पष्टपणे सरकत होता...
आजचा दिवस त्याच्यासाठी काहीतरी वेगळाच आनंद घेऊन आला होता...
-------- ----------- -----------
तो इथं आला, तेव्हापासून आजवर कितीतरी मुलं या शाळेत शिकून बाहेर पडली होती.
महाराजच्या हातचा चहा हा त्यातल्या अनेकांचा आजही "वीक पॉईंट' होता.
अजूनही कधीकधी कुणी माजी विद्यार्थी शाळेत आले, की आवर्जून महाराजला भेटत. त्याच्या त्या चहाच्या चवीचा पुन्हा अनुभव घेताना सुखावलेल्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहाताना महाराजही आतून कुठंतरी सुखावून जायचा..
... आजही, हॉलमधला तो कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर महाराजच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, आणि महाराज सुखावला.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामुळे आज महाराजला त्याच्या जिव्हाळ्याचे अनेकजण कितीतरी वर्षांनी पुन्हा भेटले होते...
मेळाव्याला आलेल्या सगळ्यांचीच पावलं सभागृहाआधी कॅंन्टीनकडे वळली होती.
या सुखाच्या क्षणांनी महाराजच्या आठवणींच्या कप्प्यात आनंदाचा नवा शिडकावा केला होता.
आस्थेनं त्याची विचारपूस करणाऱ्यांमध्ये कुणी महाराजच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देत होते, तर कुणी अगदी अलीकडच्या गमती आठवत महाराजशी हास्यविनोद करीत होते.
कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी कितीतरी जण महाराजला भेटून गेले होते... कित्येक वर्षांनंतरच्या भेटीनंतरही, अनेकांशी ओळख पटल्यानं महाराज आनंदून गेला होता.
कार्यक्रम सुरू होत असल्याचं सांगत एक शिपाई कॅंन्टीमध्ये आला, आणि कॅंन्टीनमधली गर्दी पांगली.
महाराजनंही सगळ्यांना हसतमुखानं निरोप दिला, आणि कोपऱ्यातल्या आपल्या नेहमीच्या बाकड्याकडे त्याची पावलं वळली...
.... आणि बाकड्यापाशी येताच तो थबकला!
त्याच्या त्या बाकड्यावर कुणीतरी अगोदरच एकटाच, महाराजसारखीच, कोपऱ्यात कुठेतरी नजर खिळवून बसलेला होता.
त्याच्या कपड्यांवरून, आणि व्यक्तिमत्वावरून, सुखाची सारी शिखरं त्याच्या पायाशी असावीत, हे चटकन लक्षात येत होतं.
महाराज पुढं झाला, आणि त्यानं त्या व्यक्तीला आदबीनं नमस्कार केला.
आपल्याच विचारत गढलेल्या त्या व्यक्तीनं महाराजकडे बघितलं, आणि बाकड्यावरच बाजूला सरकून महाराजला बसायची खूण केली.
क्षणभरासाठीच महाराज अवघडला.
आणि त्यानं त्या व्यक्तीच्या डोळ्यात खोलवर बघितलं... कुठेतरी ओळखीची खूण पटली. नक्की आठवत नव्हतं, पण या सुखवस्तू चेहऱ्यातल्या बालपणीच्या खुणा आपल्या नात्याच्या आहेत, असं महाराजला वाटत होतं.
थोडासा धीटाईनंच महाराज हलकेच त्याच्या बाजूला बाकड्यावर बसला आणि त्या व्यक्तीकडे बघून त्यानं अविश्‍वासानं, पण ओळखीच स्मित केलं...
कपाळावरची भरदार रुपेरी झुलपं मानेच्या झटक्‍यानंच मागं करत त्या व्यक्तीनं महाराजच्या पाठीवर जोरदार थाप मारली, आणि एकदम ओळख पटली...
महाराज नुकताच कॅंन्टीनमध्ये कामाला लागला होता...
त्याच दिवसांत, शाळेतला एक मुलगा, नेहमी जेवणाच्या सुट्टीत कॅंन्टीनमध्ये यायचा.
गल्ल्यावरच्या मालकानं खूण केली, की महाराजच त्याच्यासमोर उसळपावची प्लेट ठेवायचा...
काही न बोलता हा मुलगा ती प्लेट संपवायचा, आणि उठून निघून जायचा...
काऊंटरवरच्या मालकानं कधीही त्याच्याकडे पैसे मागितले नव्हते.
महाराजला याच गोष्टीचं नेहमी आश्‍चर्य वाटायचं, आणि उसळपाव संपवून बाहेर पडणाऱ्या त्या गरीब, केविलवाण्या मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो दिसेनासा होईपर्यंत पाहात महाराज तसाच उभा असायचा.
गल्ल्यावरचा मालक ओरडला, की महाराजचे हात कामाला लागायचे...
असे कितीतरी दिवस गेले.
तो मुलगा वर्षागणिक मोठा होत होता.
त्याची भूक वाढत होती.
एकादी उसळपावची प्लेट त्याची वाढती भूक भागविण्यासाठी पुरेशी नाही, हे ओळखून गल्ल्यावरच्या मालकाने त्याच्यासाठी दुपारच्या वेळी "थाळी'ची सोय केली होती.
तो आला, की महाराज थाळी भरून त्याच्यासमोर ठेवत असे.
नेहमीसारख्याच निमूटपणाने जेवण करून तो तसाच बाहेर पडत असे.
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात स्तब्ध व्हायची महाराजची सवय तेव्हाही तशीच होती. मालक ओरडला, की महाराजचे हात कामाला लागत...
...अकरावी पास झाल्यानंतर एकदा हा मुलगा मुद्दाम कॅंन्टीनमध्ये आला होता, तेही आज महाराजला आठवलं...
त्या वेळी आपल्या हातानं महाराजच्या तोंडात पेढा भरवताना, त्याच्या डोळ्यात दाटलेलं पाणी पाहून महाराज उगीचच गलबलून गेला होता.
इतक्‍या वर्षांत कधीही एकमेकांशी संभाषण झालं नव्हतं, तरीही आपलं काहीतरी नातं परस्परांशी जुळलंय, याची त्या क्षणानं त्या दोघांना जणू खात्रीच पटली होती.
आज पाठीवर थाप पडताच, महाराजला पेढा भरवतानाचा तो आठवला, आणि आणखी जवळ सरकत त्यानं त्या व्यक्तीला "सलाम' केला...
आज प्रथमच ते दोघं एकमेकांशी बोलणार होते.
... हॉलमधला कार्यक्रम बहुधा सुरूही झाला होता.
"महाराज, आज मी तुला काहीतरी विचारणार आहे. काहीही लपवून न ठेवता तू मला ते सांगितलं पाहिजेस'... महाराजच्या डोळ्यात आपली धारदार नजर मिसळत ती व्यक्ती महाराजला म्हणाली, आणि महाराजनंही, सहजपणे, नकळत होकारार्थी मान हलविली.
"तुला आठवतंय? मला तू रोज उसळपाव, थाळी द्यायचास... मालकानं कधीही पैसे मागितले नव्हते... कोण देत होतं ते पैसे?'..
त्याच्या त्या थेट, अनपेक्षित प्रश्‍नानं महाराज एकदम चमकला. त्याची मान खाली गेली.
बोलावं की नाही, हा संभ्रम त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला होता.
त्यानं पुन्हा महाराजच्या पाठीवर हात फिरवला, आणि त्याचा पेढा भरवतानाचा चेहरा महाराजच्या डोळ्यासमोर आला.
ते जुनं नातं पुन्हा जागं झालं होतं.
"राणे सर...' कसंबसं महाराज बोलला, आणि त्यानं मान फिरवली.
त्या व्यक्तीनंही झटक्‍यात महाराज पाठीवरचा हात मागं घेतला.
कॅंन्टीनमध्ये त्या क्षणाला ते दोघंच होते.
दोघांच्याही डोळ्यातून अचानक धारा वाहू लागल्या होत्या..
पुन्हा शब्दांचा संवाद खुंटला... ते दोघं केवळ एकमेकांचा हात हातात पकडून स्तब्ध बसले होते...
काही वेळानंतर तो भानावर आला... महाराजचा हात सोडवून घेत त्यानं एकवार हलकंसं हसून महाराजच्या खांद्यावर प्रेमानं थोपटलं, आणि झपाट्यानं तो बाहेर पडला...
--------- ----------- ---------
तो हॉलमध्ये आला, तेव्हा भाषणं सुरू होती.
माजी विद्यार्थी शाळेसोबतचं आपलं नातं हळुवारपणे जागं करत होते...
मधूनच हास्याचे फवारे उमटत होते, मध्येच कधी कुणाच्या हळव्या जाणीवा जाग्या होत होत्या...
टाळ्यांचा कडकडाट होत होता...
संथपणे चालत तो हॉलमध्ये आला, आणि मागच्या रांगेतल्या एका रिकाम्या खुर्चीत त्यानं जागा पकडली.
मिनिटभर बसल्यानंतर तो आणखीनच अस्वस्थ झाला होता.
त्यानं आजूबाजूला पाहिलं. कुणाचीच ओळख पटत नव्हती...
एक भाषण संपलं, आणि टाळ्या संथ होताच तो जागेवरच उठून उभा राहिला.
शाळेतल्याच सवयीनं त्यानं जागेवरूनच हात उंचावला.
स्टेजवरून कुणीतरी त्याचा उंचावलेला हात बघितला, आणि सगळे स्तब्ध झाले...
"सर, मला बोलायचंय'... भारावल्या आवाजात तो बोलला.
आणि स्टेजवर मधोमध बसलेल्या व्यक्तीनं- तोही शाळेचा माजी विद्यार्थीच होता- त्याला परवानगीही दिली.
दमदार पावलं टाकत तो स्टेजपर्यंत आला, आणि पायऱ्या चढण्यापूर्वी त्यानं पहिल्या पायरीवर मस्तक टेकवलं.
सारं सभागृह शांत, स्तब्ध होतं.
तो माईकसमोर आला.
त्याच्या भरीव व्यक्तिमत्वाची छाप सभागृहावर पडल्याचं जाणवत होतं.
स्टेजवर बसलेल्या सर्वांकडे पाहात मंद हास्य करून त्यानं नमस्कार केला, आणि बोलायला सुरुवात केली.
"...मराठवाड्यातल्या खेड्यातून मी मुंबईला मामाकडे शिकण्यासाठी आलो, तेव्हा मी जेमतेम बारा वर्षांचा होतो. हातावरचं पोट असलेल्या मामाच्या घरात डोईवरचं छप्पर मिळालं, हेच तेव्हा माझ्यासाठी खूप काही होतं... मी खूप सुदैवी होतो. कारण मला मुंबईत येताच या शाळेत ऍडमिशन मिळाली होती...'
बोलताबोलता तो क्षणभर थांबला. बहुधा पुढचे शब्द जोडण्यासाठी तो मन घट्ट करत असावा.
सभागृह स्तब्ध होतं.
"शाळेत, मधल्या सुट्टीत सगळी मुलं घरून आणलेले डबे खायची, तेव्हा मी कुठल्यातरी कोपऱ्यात लपून राहायचो... त्यांचे डबे बघितल्यावर उगीचच भूक जागी व्हायला नको, असं सारखं वाटायचं... पण ते व्हायचंच... मग तिथंच रडत बसायचो... एकदा मला आपल्या कॅंन्टीनच्या मालकानं बोलावलं, आणि उसळपाव दिला...'
आता हॉलमधल्या हास्यविनोदाच्या वातावणाला एक वेगळीच किनार मिळाली होती.
तो बोलत होता...
"त्या दिवशी मी अक्षरशः आधाशासारखा तो उसळपाव संपवला... मुंबईत पहिल्यांदाच, उपाशी, भुकेल्यापोटी मिळालेल्या त्या उसळपावच्या प्लेटनं मला भरभरून समाधान दिलं होतं... मी ती प्लेट संपवली, आणि उलट्या मनगटानं तोंड पुसत तसाच बाहेर पडलो...
त्या दिवसानंतर रोज कॅंन्टीनमध्ये मला उसळपाव मिळत होता.
मी मोठा होत गेलो, तशी माझी भूकही वाढत गेली... तेव्हा मला थाळी मिळत होती...
त्या थाळीतलं अन्न खाऊन मी या शाळेतून बाहेर पडलोय... आज मी जिथे आहे, तिथून रोज मागे वळून पाहातो... शाळेतल्या त्या दिवसांचं ऋण आजही त्यामुळे जिवंत आहे. त्यामुळेच, मी वर्षानुवर्षं अस्वस्थ आहे...'
तो बोलत होता, आणि समोरच्या गर्दीतून त्याच्याशी ओळख पटल्याचे काही सूर सभागृहात घुमले...
"आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे, असं समजलं, आणि त्या अस्वस्थतेनं मला या कार्यक्रमात ओढून आणलं...'
आणि त्यामुळेच, माझी वर्षानुवर्षांची अस्वस्थताही संपली...
ती उसळपावची प्लेट आणि ती थाळी, यांमुळे मी आज इथवरचा, माझ्या आयुष्यातला यशाचा पल्ला गाठलाय...
पण मला घास भरवणारा तो अज्ञात कोण होता, याच्या शोधात मी स्वतःशीच जळत होतो...
राणे सर, तुम्ही थोडं पुढं यावं, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे...'
त्याचं हे वाक्‍य संपलं, आणि सभागृह पुन्हा आणखी स्तब्ध झालं...
राणे सरांच्या डोळ्यातून एव्हाना अश्रुधारा सुरू झाल्या होत्या...
थरथरत्या शरीरानं राणे सर खुर्चीतून उठून पुढे आले.
पुढचा क्षण केवळ अवर्णनीय होता...
काही मिनिटे तशीच गेली...
सारे काही स्तब्ध, स्तब्ध होते...
तिथं भाषणं नव्हती, टाळ्याही नव्हत्या...
राणे सर आणि "तो' एकमेकांना आसुसल्यासारखे कुरवाळत होते...
समोर अवघे सभागृह अक्षरशः "पाझरत' होते...
श्रोत्री बाईंनी उठून मोठ्या कष्टानं, जडपणे तो क्षण संपवला...
दरवाज्यातून तो क्षण पाहणाऱ्या "महाराज'नं आपल्या खांद्यावरच्या कळकट टॉवेलनं डोळे पुसले आणि तो मागं वळून त्या बाकड्यावर बसला.
एकटाच!
...........
http://zulelal.blogspot.com

गुलमोहर: 

खूपच मस्त लिहिलयत तुम्ही झुलेलाल. अगदी मनापासुन आवडल.

मस्त लिहिलय . !!!

मस्त लिहिलं आहे!

फार सुन्दर
डोळ्यात पाणि आले
मला पण एकदअ असाच अनोळखि माणसाने मदत केलि होति
ते आठ्वले

सूरेख !! वाचताना डोळ्यात पाणी आल॑!!!

छान लिहिलय...आवडलं !!!

प्रतिक्रीया काय द्यावी हे सुचत नाहीये.

अप्रतिम !!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शुभ दिपावली .......... Happy

शोधिसी मानवा राउळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी

इथे "तो" राणे सरांच्या अंतरात नांदत होता Happy

शहर (दक्शिण) मुम्बईतल्या एका मराठमोळ्या वस्तीतल्या एका नामाकित शाळेतल्या एका अलीकडच्या कार्यक्रमातील एका प्रसंगावर आधारित. तो प्रसंग समजला, तेव्हापासूनची ती अस्वस्थता अखेर इथे उमटली, इतकंच...

कुठली शाळा झुलेलाल? मी दक्षिण मुंबईतच मराठमोळ्या वस्तीतच वाढलेय.

नेहेमीप्रमाणेच पाणी आणलं डोळ्यात झुलेलाल... जिओ !!

खूपच छान कथानक...... मनाला भावली......

छान लिहिलंय....

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

अप्रतिम! छान लिहिलय...आवडलं !!!

झुलेलाल, सुरेख... अप्रतिम!
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

खुपच छान.............

डोळे ओलावले, मित्रा.
खुप सुंदर.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

खूप खूप छान रे...... पाणावले डोळे.....

simply superb!!!...

```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```
“Confusion is always the most honest response.”

.

Pages