तुझ्याविना सख्या मला...

Submitted by मुग्धमानसी on 7 May, 2013 - 03:45

तुझ्यापासून दूर नेणारा राजमार्ग नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता

सूर सारे, ताल सारे, शब्द सारे सांडले
ओतताना जीव माझा गीत वेडे माखले
ऐकता करवादले ते - हा उसासा नको होता...
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

वाट अश्रुंची कुणी अडवायला आलेच नाही
अन् मलाही का कधी बोलावता आलेच नाही
कोरड्या भेटीस अपुल्या शाप ओला नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

तू उन्हाशी खेळताना आग सारी झेलली
मी तुझ्या पायांत चांदणरात माझी ओतली
पण तू आगीचा खुळा तुज गारवा तो नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

तुच अंथरलीस ही सुमने अशी रस्त्यात माझ्या
डकवल्या या चांदण्या अन् दीप उंबरठ्यात माझ्या
पण तुझ्या आठवात झुरता उंबरा मज नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy छान आहे

डकवल्या या चांदण्या अन् दीप उंबरठ्यात माझ्या>>> डकवल्या ऐवकी पेरिल्या किंवा अजुन काही छानसा शब्द वापरलास तर अधिक उठाव येईल हे मा.वै.मत

छान गीत आहे हे
आवड्ले

_______________________--
अरे रिया तू पण इथेच आलीस बेफीजींनी त्यांच्या धाग्यावरून आपल्याला हुसकावल्यावर

काय योगातोग आहे नै !!!

छान!

आवडली

फेसबुक... चेहरा पुस्तक!!!... चेपु.... भन्नाट! ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद! Lol
चेपुवर शेअर केली तर चालेल.

तू उन्हाशी खेळताना आग सारी झेलली
मी तुझ्या पायांत चांदणरात माझी ओतली
पण तू आगीचा खुळा तुज गारवा तो नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!

हे खूप आवडलं..

वा वा सुरेखच! याला छान चाल लावता येईल. खूप सुरेख, सुरेल गाणे होईल याचे . वा !
>>>डकवल्या या चांदण्या... >>> सजवल्या या चांदण्या... असे केले तर?

सुरेख रचना...
एकूण कवितेतील गेयता आणि तिसरे कडवे...तार झंकारल्यागत जाणवते!

>>>उंबरा झुरताच ठेवायचा होता...तर येण्याच्या स्वप्नाचे चांदणे 'डकवले' म्हणणेच योग्य वाटले!

अभिनंदन...शुभेच्छा!