वैराग्य नशीले होते..

Submitted by बागेश्री on 6 May, 2013 - 14:34

कधी मेघ नभीचा होते
कधी रंग ऋतूंचा होते,
मी वणव्याच्या वैशाखी
झुळूक अबोली होते..

कधी धुंद गारवा होते,
कधी श्वास मारवा होते
मी काळाला हरणारे,
वैराग्य नशीले होते..

कधी जाग कळ्यांची होते
कधी रूप दवाचे होते,
मी हलका हलकासा
शिवरी कापूस होते..

कधी बिंब तुझेच होते
कधी सूर तुझाच होते,
मी एकरंग होताना
सावरी तुझीच होते...

कधी लाज दाटली होते
कधी गंधभारली होते,
मी जगता जगताना
साजणी जाहले होते..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जियो Happy

अधुम मधुन महाबळेश्वरसारख्या ठिकाणांना भेटी देत जा, मग असं काहिसं उतरतं लेखणीतून Wink

कविन Lol

ठीकठाक वाटली.

कडव्यातील चार ओळींमध्ये घट्ट संबंध क्वचित जाणवला.त्यापेक्षा सुट्या ओळी अधिक प्रभावी आहेत. चुभुदेघे.

छान! पण आनंदयात्री म्हणतात तसे वाटले खरे थोडेसे. सुटी प्रत्येक ओळ मस्त!

कधी लाज दाटली होते
कधी गंधभारली होते,
मी जगता जगताना
साजणी जाहले होते.. >>>> आवडले!

यांशी सहमत !!! (आधी चुकून अया असे लिहिले होते ती चूक संपादनातून सुधारली आहे )
पण आवडलीच आहे हे वेगळे सांगणे न लगे

वैराग्य नशीले होते..<<< एक मिसरा आठवला .माझा नाही ....>>>>> मला ब्राम्हण्य आल्यावर नशीले आचमन होते<<<<<<

अरेरे असय होय !...अया म्हटल्यावर अय्या म्हटल्यासारखं काहीसं वाट्तय वगैरे म्हणून का.......!!

बर बर करतो एडिट !!!!

तुझ्या सावळ्या रंगात एकरूप होता होता- ॠतूनुसार, वेळेनुसार, कारणानुसार, तुझ्या आवडीनुसार रुपं धारण करणारी मी.. आणि हे करण्याचं शेवटी, कारण शोधताना तुझी साजणी झाल्याचं लक्षात येतंय..... माझं अस्तित्वच बाजूला सारल्यानंतर उरणारा तू अन तुझ्या॑ श्यामल रंगात मी कुठेतरी

नचिकेत, तू एक दोन ठिकाणी कडव्यांमधला अर्थ सशक्त न लागल्याचं म्हणालास, पण प्रत्येक वेळी समारोप करताना मी तो राखला जाईल असा यत्न केलाच होता.... तो पोहोचला नाही, ह्याचं वाईट वाटलं!

पण ही रचना सुपूर्द झाली आहे, ह्या रचनेने साकारताना मला खरंच निखळ आनंद दिलाय, इतकं सांगेन Happy

मनाच्या विविध अवस्थांचं छान वर्णन.
"कधी बिंब तुझेच होते
कधी सूर तुझाच होते,
मी एकरंग होताना
सावरी तुझीच होते..." >>> हे सर्वात विशेष वाटलं.

Pages