कैक झाले जन्म माझे, का न मिळती उत्तरे?

Submitted by कर्दनकाळ on 6 May, 2013 - 13:17

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा

कैक झाले जन्म माझे, का न मिळती उत्तरे?
धूमकेतूसारखा हा प्रश्न माझा भिरभिरे!

जाहलो निष्पर्ण त्याचे दु:ख नाही वाटले....
पालवीसाठी जगाच्या, जीव हा माझा झुरे!

रुक्ष होती माणसे ती वाळवंटांसारखी!
पाहतो त्यांच्यातही मी आज झुळझुळते झरे!!

काय अत्याचार होती, केवढा आकांत हा!
काळजाला, सांग, कोणाच्या किती पडली घरे?

मी न माझ्या वेदनांची कौतुके केली कधी!
लेखणी माझी जगाच्या वेदनांनी पाझरे!!

या न माझ्या चेह-याच्या फक्त नुसत्या सुरकुत्या.....
ही अरे, मी भोगलेल्या प्राक्तनाची लक्तरे!

वय कधीही माणसाचे काय जाते झाकले?
वय किती माझे कळाया, मोज तू माझे चरे!

वृक्ष गजबजला दवाने रामप्रहरी केवढा!
सूर्यकिरणांनी उडाली बघ, दवाची पाखरे!!

ही नजर देतेच धोका, पाहिले मी कैकदा!
जे खरे नाही तयाला मानतो मी का खरे?

पुस्तके वाचून नाही माणसे कळली कधी;
वाचते वार्धक्य आता माणसांचे चेहरे!

लागली गोडी मला त्या नामस्मरणाची तुझ्या!
मोहमायेचे मला कळतात आता पिंजरे!!

हरवली माणूसकी कोठे तुझी रे माणसा ?
शोध आता काळजाचे सर्व कानेकोपरे!

मी मुलांना शिकवताना नेहमी पान्हावतो!
हे न विद्यार्थीच नुसते, हीच माझी वासरे!!

रंग जमिनीचाच मजला वाटतो आहे खरा!
जाहली पाहून, न्याहाळून सारी अंबरे!!

एक पांजरपोळ आहे माझिया हृदयामधे.....
नांदती जेथे स्मृतींची एकजूटीने गुरे!

कानफाटे काय पडले नाव माझे एकदा!
माझिया माथ्यावरी फुटतात आता खापरे!!

काय मी बोलून जातो, हे कुठे स्मरते मला?
ऐकणा-याच्या कसे अंगात भरते कापरे?

एक हाडाचाच मी शिक्षक! न मी पडतो कमी!
सरळ मी करतो मुलाला, जे कितीही वाबरे!!

एक झोपाळू तरीही, काय वांदे जाहले!
ढेकणांनी पार झोपेचेच केले खोबरे!!

प्रीय मजला मायबोलीकर, कसेही ते असो!
वाटती काटे गुलाबाला कधी का बोचरे?

*******************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कैक झाले जन्म माझे, का न मिळती उत्तरे?<<<<<<

तिलकधारी आला आहे

तिलकधारीला आधीपासूनच वाटत होते की हा कर्दनकाळ कोणी तोतया असावा. तोतयाच निघाला. पहिली ओ़ळ सांगतेच आहे तसे. गझलक्षेत्रात तोतयांची संख्या वाढत आहे. ही बाब दुर्लक्षणीय नाही. चिंताजनक बाब आहे. तिलकधारीला तोतया पाहून संताप येऊ शकतो.

एक झोपाळू तरीही, काय वांदे जाहले!
ढेकणांनी पार झोपेचेच केले खोबरे!!<<< हा शेर कोणत्याही मापदंडान्वये 'एक गझलेचा शेर' ठरू शकत नाही.

प्रीय मजला मायबोलीकर, कसेही ते असो!
वाटती काटे गुलाबाला कधी का बोचरे?<<< प्रीय हे बरोबर आहे का?

झीट आणणारे र्‍हस्व दीर्घातील बदल, मोगलाई असल्याप्रमाणे ढेकूण, गाढवे वगैरेंना गझलेसारख्या तरल काव्यात दिले जाणारे स्थान, सुलतान असल्याप्रमाणे काफियांच्या मुसक्या बांधून त्यांना शेरात घुसडणे हे प्रकार थांबवणे आवश्यक झालेले आहे.

तिलकधारी निघत आहे.

तिलकधारीला आधीपासूनच वाटत होते की हा कर्दनकाळ कोणी तोतया असावा. तोतयाच निघाला. पहिली ओ़ळ सांगतेच आहे तसे. <<<<<<<<<<<<

फारच शारिरीक अर्थ मिस-याचा घेऊन अत्यंत संकुचित अर्थ आपण काढत आहात तिलकधारीजी!

तिलकधारीला तोतया पाहून संताप येऊ शकतो. <<<<<<
तुम्हाला तर राग येऊ शकतो, पण कर्दनकाळांना तर तोतयांचा सदैव राग व चीड येते!

एक झोपाळू तरीही, काय वांदे जाहले!
ढेकणांनी पार झोपेचेच केले खोबरे!!<<< हा शेर कोणत्याही मापदंडान्वये 'एक गझलेचा शेर' ठरू शकत नाही. <<<<<<<<<<<<<<

गझलेच्या शेराच्या कोणत्या मापदंडान्वये ही द्विपदी शेर ठरू शकत नाही? शेर व्हायला काव्यविषयाचे काही दंडक असतात काय?

सुलतान असल्याप्रमाणे काफियांच्या मुसक्या बांधून त्यांना शेरात घुसडणे

प्रीय मजला मायबोलीकर, कसेही ते असो!
वाटती काटे गुलाबाला कधी का बोचरे?<<< प्रीय हे बरोबर आहे का?

प्रीय हे बरोबरच आहे!

झीट आणणारे र्‍हस्व दीर्घातील बदल, मोगलाई असल्याप्रमाणे ढेकूण, गाढवे वगैरेंना गझलेसारख्या तरल काव्यात दिले जाणारे स्थान, सुलतान असल्याप्रमाणे काफियांच्या मुसक्या बांधून त्यांना शेरात घुसडणे हे प्रकार थांबवणे आवश्यक झालेले आहे.

ढेकूण, गाढवे वगैरेंना गझलेसारख्या तरल काव्यात दिले जाणारे स्थान<<<<<<<<<
कोण म्हणते या प्राण्यांना काव्यात स्थान देऊ नये म्हणून ? आहो हे प्राणी जर माणसांच्या दैनंदीन जीवनातही तळ ठोकून बसत असतील, तर त्यांना काव्यातही स्थान का मिळू नये? माणूसरूपी ढेकूण नसतात काय? माणसांच्या वेषातली गाढवे काय कमी असतात का समाजात? काय या प्राण्यांतही तरलता नसते काय?

सुलतान असल्याप्रमाणे काफियांच्या मुसक्या बांधून त्यांना शेरात घुसडणे

<<<<<<<<हा बघणा-याचा दृष्टीकोन आहे जो वस्तुनिष्ठ नाही, व्यक्तिसापेक्ष आहे!

शेरात काय घुसडावे/घसडू नये...........हे व्कतिसापेक्ष आहे!

*************इति कर्दनाकाळ

टीप

गझलक्षेत्रात तोतयांची संख्या वाढत आहे. ही बाब दुर्लक्षणीय नाही. चिंताजनक बाब आहे. तिलकधारीला तोतया पाहून संताप येऊ शकतो. >>>>

oh well look who's talking!

:हहगलो::हाहा::फिदी::हहगलो:

हमारी तो यही आदत है कि हम चुप ही रहते है Wink
____________________________________________________________

People who live in glass houses (shouldn't throw stones)

काय अत्याचार होती, केवढा आकांत हा!
काळजाला, सांग, कोणाच्या किती पडली घरे?
.
लागली गोडी मला त्या नामस्मरणाची तुझ्या!
मोहमायेचे मला कळतात आता पिंजरे!!

हे आवडलेत.