" असे का होते?"

Submitted by अमेय२८०८०७ on 3 May, 2013 - 14:58

आजकाल असेच होते..

देवळात जाताना, इंद्रियभोगांसाठी काढून भिरकावून
दिलेल्या कपड्यांसारखी
बेवारस मुले, नेमाने दिसतात.

सूर्योदयाची तरल लाली विरून जाते,
सूर्यास्ताचे विदग्ध रक्तरंग मात्र
डोळ्यांत साठून राहतात.

उमलत्या शैशवाच्या सायस्पर्शाहून
विझत निघालेल्या वार्धक्याचे
रखरखीत हात अधिक मृदू भासतात.

अंकुराच्या पहिल्या सृजनोद्गारापेक्षा
भुईत रुजलेल्या अश्वत्थमुळ्यांच्या
व्यथा काळजाला उत्कटतेने भिडतात.

जेत्याच्या उन्मादी रणविजयी आवेशापेक्षा
लढून हरलेल्या पराभूताचे मूक आक्रोश
कानात बराच काळ रुंजी घालतात.

बेभान, अमर्याद निळाईकडे पाठ फिरवून
विरहात झरत चाललेल्या कोरड्या वाळूचे
क्लेश समजून घ्यावेसे वाटतात.

आजकाल असे… का होते ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेचा नायक समोर दिसणार्‍या गोष्टींच्या पलिकडे जाऊन खोलवर विचार करतो, काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न करतो हा आशय चांगला मांडलाय.
शेवटचे कडवे सर्वात विशेष वाटले.

---------------------------------------------------------------------------------------------------------------
बेवारस मुले कुठेही, कधीही दिसू शकतात. देवळात जाताना ती दिसतात यातून नक्की काय सूचित करायचे आहे ते लक्षात आलं नाही

विस्कळीत वाटली कविता. रादर हे एक स्वगत वाटले... कवीला प्रश्न का पडलेला आहे ह्याची उकल होत नाहीये. जे होतेय त्याच्या उलट झाले असते तर काय झाले असते हेही कवितेत कुठे येत नाही.

हा चुका काढण्याचा प्रयत्न नसून चांगली चर्चा होईल का ते बघत आहे.

गै.न.

जे होतेय त्याच्या उलट झाले असते तर काय झाले असते हेही कवितेत कुठे येत नाही.>>>

मयेकर,

ज्या घटनांचा उल्लेख केलेला आहे त्या कवितेतल्या नायकाला विचित्र वाटताहेत असे दिसत आहे परंतू काय होत नाही म्हणून कवीला हा प्रश्न पडलेला आहे आणि जे काही होत नाही तेच होत नाही म्हणून प्रश्न पडलेला आहे का? हे निदान मला तरी कवितेतून कळले नाही.

मला ह्यावर अमेय ह्यांची विचारधारा जाणून घ्यायला आवडेल. अर्थात आपणांस कविता माझ्यापेक्षा अधिक समजलेली असू शकते. तसे असल्यास आपले मतही/अंडरस्टँडींगही लिहा.

धन्यवाद!

सर्वांशी सहमत
भारतीताईंशी जास्त

एक अक्खी कविता करण्यापेक्षा ६ वेगवेअगळे हाय्कू करताना सुलभ ठरेल असे वाटले
(पहिल्याच कडव्यात वाटले ६व्या नंतर माझे मलातरी पटले)

प्रतिसादाबद्दल आभार. खरेतर मीही या लिखाणाबद्दल साशंकच आहे. वेगवेगळी मते जाणून घ्यायची इच्छा होतीच. लिहायचा आशय शब्दांत मावेना झालाय खरा. काही दिवस बाजूला ठेवतो, मार्ग सापडेल पुनर्र्चनेचा, पुनर्लिखाणाचा.
उल्हासजी, देवळात जाताना यात असे म्हणायचे आहे की एरवी देवाच्या ओढीने देवळात जाताना इकडचे तिकडचे काही दिसत नव्हते सध्या मात्र देवळाभोवती पसरलेले दैन्य जास्त उठून दिसतेय. बाकीची कडवीही अशाच एरवी प्रिय वाटणार्‍या सुखावणार्‍या गोष्टींपेक्षा हल्ली त्यामानाने रुक्ष, लौकिकार्थाने सुंदर नसणार्‍या गोष्टीकडे लक्ष जाऊन विचार करावसा का वाटतो ह्या प्रश्नाची उदाहरणे म्हणून आली आहेत.
विजयजी सध्या तरी हे प्रश्न आहेत एवढीच अनुभूती आहे, त्यांची कारणे आणि शेवटी झाली तर उकल ह्या बाबी असेच विचार सुरू राहिले तर नक्की येतील.

या कवितेचा सध्याचा फायदा म्हणजे भरत मयेकर यांनी संदर्भ दिलेली उत्कृष्ट कविता. त्याबद्दल त्यांचे खास आभार.

अमेय ,अपले मत वाचले

मीही प्रतिसाद दिला होता त्यावर तुम्ही काहीतरी म्हणाल असे वाटले होते
तुम्ही दुर्लक्ष केलेले दिसते आहे .....तसे स्पष्ट जाणवते आहे

असो
या पुढे आपल्याला प्रतिसाद देताना योग्य ते भान राखेनच याची ग्वाही देवू शकेन पण आपण निदान माझे मत वाचले असून मी असे मत देणे आपल्याला पटले नसल्यास ते उघडपणे नमूद केले पाहिजे असे वाटते

दुर्लक्षिले गेल्याचा मला बराच राग आला पण होईल तितके संयमित मत लिहिले आहे
गोड मानून घ्या

आपण यापेक्षा अधिक उत्तम लिहू शकता हे मला माहीतच आहे Happy

वैभवजी अहो खरेच असे काही नाही. तुमचे मत अर्थातच मी वाचले पण त्यावर काय लिहावे याचा विचार सुरू होता. क्दाचित तसे तरी मी लिहायला हवे होते. पण प्रतिसाद एवढा भला मोठा दिसू लागला की लवकर आवरावेसे वाटले, क्षमस्व.
तुम्ही उत्तम कवी गझलकार आहात, कसे काय प्रतिसाद द्यायचे काय करायचे हे तुम्हाला कळतेच.
लोभ असावा. Happy

भारतीताई तुमचेही आभार, पण आपला संवाद इथे व इतरत्र असतोच सुरू.

अमेय Happy तुमचा आवाका खूप मोठा आहे,पण एखादी कविता काहीशी वेगळी असते आणि तीही कोणाला तरी विशेष आवडते तेव्हा तिचेही काही प्रयोजन असतेच.

मला आवडली कविता.

'आजकाल असे का होते' असा प्रश्न कवितेतच आला आहे. मग त्या प्रश्नाची उकलही कशाला हवी?

सहमत.

मात्र कविता अधिक नेटकी करता येऊ शकली असती, असे वाटते.

तरी पण कविता अप्रतिमच. Happy

मला असे वाटते की 'असे का होते' असे म्हणत जे प्रश्न नोंदवले गेलेले आहेत ते जरी वरवर एका मोळीत बांधण्यासारखे वाटले नाहीत तरी त्यांच्या मुळाशी कवीची एक अशी मनस्थिती आहे जी समान आहे. त्या मनस्थितीमुळे नेमके 'इतर बहुतेकांच्या बाबतीत जे होते ते माझ्याबाबतीत उलटे का होते' किंवा 'माझ्याबाबतीत आधी जे व्हायचे त्याच्या नेमके उलट आता का होते' हे प्रश्न पडत आहेत. ही मनस्थिती कशामुळे अशी झाली आहे हे सांगणे कवीला येथे महत्वाचे वाटत नाही. म्हणजे, कवी त्याची मनस्थिती वर्णू इच्छित आहे, पण ती तशी का आहे याचा शोध घेऊ इच्छित नाही. त्याने तो शोध घ्यावा व तेही नोंदवावे अशी अपेक्षा नकळतपणे एखाद्या रसिकाने व्यक्त करणे हे खरे तर कवीचे व कवितेचे यशच म्हणावे लागेल. याचे कारण काहीतरी रसिकाच्या मनात रेंगाळत ठेवणे हा 'इंपॅक्ट' साधण्याचे वैशिष्ट्य या कवितेत आहे.

कविता आवडली व जेवढी समजली त्यावरून वरील मत मांडले. चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

गंगाधर मुटेजी व बेफिकीरजी,
प्रतिसादाबद्दल आभार. खूप चांगले वाटले आपल्या प्रतिक्रिया वाचून. धन्यवाद.