कागदी होती फुले अन् बेगडी सन्मान होते!

Submitted by कर्दनकाळ on 1 May, 2013 - 14:00

गझल
कागदी होती फुले अन् बेगडी सन्मान होते!
हे समजण्या एवढे मजला कुठे व्यवधान होते?

गरजणा-या त्या विजांनाही अता माहीत झाले....
की, पुन्हा उमलून फुलण्याचे मला वरदान होते!

मी न गेलो सिद्ध करण्यास्तव कधी अस्तित्व माझे;
हे चराचर जाणते की, काय माझे स्थान होते!

मी तुला भासू दिले नाही कधी नजरेत माझ्या;
वेदनांचे माझिया हृदयामधे थैमान होते!

वाटले त्यांना जणू आकाश झाले मालकीचे!
खुद्द चंद्राशी जणू त्यांचे म्हणे संधान होते!!

वेंधळा मी, चालण्यामध्येच इतका गर्क झालो;
गाव माझे येवुनी गेले, कुठे मज भान होते?

उंदराला मांजराने साक्ष द्यावी त्याप्रमाणे.....
एक म्हटला छान की, सगळेच म्हणती छान होते!

जो मला भेटेल त्याला वाटले काळीज माझे....
मी कसे मागू परत, ते मी दिलेले दान होते!

कावळ्याने काय एका सूर धरला, तोच सा-या...
कावळ्यांना वाटले ते कोकिळेचे गान होते!

मानसन्मानांमधे झिंगायचा हा पिंड नाही!
माझियासाठी कशाचे मान अन् अपमान होते!!

हाक केव्हाही मला तू द्यायची होतीस मृत्यो!
मी सडा होतो, कुठे माझे असे सामान होते?

पाहिले मी ते मणी एकाच माळेतील होते!
मी कसा लागेन नादी? लोक ते नादान होते!!

डाव हातातून निसटत चालला होता जिण्याचा....
मी तरी माझ्यात उसने आणले अवसान होते!

******************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तुला भासू दिले नाही कधी नजरेत माझ्या;
वेदनांचे माझिया हृदयामधे थैमान होते!

छान

वेंधळा मी, चालण्यामध्येच इतका गर्क झालो;
गाव माझे येवुनी गेले, कुठे मज भान होते?

ग्रेट !!!!

कागदी होती फुले अन् बेगडी सन्मान होते!
हे समजण्या एवढे मजला कुठे व्यवधान होते?

दुसरी ओळ अर्थाला काय विशेष हातभार लावत आहे ? जे म्हणायचं आहे ते एका ओळीतच झालंय की !

गरजणा-या त्या विजांनाही अता माहीत झाले....
की, पुन्हा उमलून फुलण्याचे मला वरदान होते!

विजांचे गरजणे आणि (कुणाचेही) उमलून फुलणे ह्यात काय संबंध ? विज गरजली की (कुणीही) कोमेजतं का ? कैच्याकै आपलं !

मी न गेलो सिद्ध करण्यास्तव कधी अस्तित्व माझे;
हे चराचर जाणते की, काय माझे स्थान होते!

'जाणती' म्हणायचे असावे इथे.
असो. जर सगळे जाणत होते, तर विषयच संपला. सगळे जाणत असताना सिद्ध करायची गरजच नाही. हे पण कैच्याकै !

मी तुला भासू दिले नाही कधी नजरेत माझ्या;
वेदनांचे माझिया हृदयामधे थैमान होते!

आवडला ! पण बुळबुळीत विचार आहे. किती वेळा मांडून झाला आहे, ह्याचा हिशेब लावणे अशक्य.

वाटले त्यांना जणू आकाश झाले मालकीचे!
खुद्द चंद्राशी जणू त्यांचे म्हणे संधान होते!!

म्हणजे ?

वेंधळा मी, चालण्यामध्येच इतका गर्क झालो;
गाव माझे येवुनी गेले, कुठे मज भान होते?

अपेक्षा काय ? घोडा पाठवावा का ?

उंदराला मांजराने साक्ष द्यावी त्याप्रमाणे.....
एक म्हटला छान की, सगळेच म्हणती छान होते!

शेरात म्हण कोंबली की विचार उत्तुंग होतो हा तुमचा गैरसमज कधी दूर होईल ?

जो मला भेटेल त्याला वाटले काळीज माझे....
मी कसे मागू परत, ते मी दिलेले दान होते!

भेटेल…. वाटले… ? 'वाटतो' म्हणायचे आहे का ?

कावळ्याने काय एका सूर धरला, तोच सा-या...
कावळ्यांना वाटले ते कोकिळेचे गान होते!

आवरा ! ह्याला शेर म्हणावा की 'काव काव' ??

मानसन्मानांमधे झिंगायचा हा पिंड नाही!
माझियासाठी कशाचे मान अन् अपमान होते!!

'हा' भरीचा आहे. [शेर नव्हे, शब्द - 'हा' (तसे तर सगळेच शेर 'भरीचे'!!)]

हाक केव्हाही मला तू द्यायची होतीस मृत्यो!
मी सडा होतो, कुठे माझे असे सामान होते?

मायच्यान काय बी कल्ला नाय !!

पाहिले मी ते मणी एकाच माळेतील होते!
मी कसा लागेन नादी? लोक ते नादान होते!!

शेरात म्हण कोंबली की विचार उत्तुंग होतो हा तुमचा गैरसमज कधी दूर होईल ? एका ओळीत 'म्हण' आणि दुसऱ्या ओळीत 'गण'.... की झाला शेर, लै भारी फॉर्म्युला !

डाव हातातून निसटत चालला होता जिण्याचा....
मी तरी माझ्यात उसने आणले अवसान होते!

आवडला !!

--------------------------------------

बाकी काही म्हणा. इतके आयडी बदलून, प्रत्येक वेळी आपला सध्याचा आयडी कोणता आहे हे भान ठेवून कुठलाही गोंधळ उडू न देणे, हे मात्र क्रेडिटेबल !

खरा वाचक(खरे नाव दडवलेला),

आपली खरी शेरनिहाय मते आपल्या प्रतिभेची/प्रज्ञेची व एकंदर काव्यबोधाची चुणुक दाखवतात व साक्ष देतात!
वाखाणणी करावी तेवढी थोडीच आहे! शब्द अपुरे पडत आहेत!

कोणत्या शब्दात वर्णावी तुझी सौंदर्यदृष्टी?
कल्पना सा-या थिट्या, प्रत्येक उपमा तोकडीसी!............इति कर्दनकाळ