यमन-रंग

Submitted by श्रीयू on 30 April, 2013 - 23:00

तिन्ही सांजा सूरमयी
अंगणी चांदणं प्रसन्न
वृन्दावनी तुळशीच्या
मंद तेवतो 'यमन' ||1||

भाळी रिषभाची तीट
गाली निषादाची खळी
धुंद गंधाराचा गंध
शोभे षड्ज सोनसळी || 2||

किती स्वरांग लोभस
भासे सुहास वदन
रूप सोवळे सोज्वळ
सखा स्नेहल 'यमन' ||3||

येता आठव प्रियेची
होता सैर भैर मन
ऋणझुणतो प्रियेचा
गोड पैंजणी 'यमन' ||4||

धुंद श्वासांची मैफल
रंगे स्पर्शाचा सोहळा
देह्भरून प्रियेच्या
उरे 'यमन' आगळा ||5||

संगे टाळ चिपळ्यांच्या
रंगे कैवल्य सोहळा
उभा 'यमन' कीर्तनी
मनी विठ्ठल दाटला ||6||

कधी कीर्तनी रंगतो
'ख्याली' आनंदे दंगतो
'यमन' गझल सखा
कधी दोहे आळवितो ॥7||

कधी 'शाहीदी' यमन
कधी 'राशिदी' यमन
करी विकल मनाचे
आर्जवुनी शांतवन ||8||

शाम रंग खुलवितो
गाली राधेच्या 'यमन'
चिंब भिजवितो कृष्णा
आर्त मीरेचा 'यमन' ||9||

किती रुपात राधेला
भेटे सावळा श्रीरंग
तैसा मनास माझीया
भुलवितो 'यमन-रंग' ||10||

-श्री.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< भाळी रिषभाची तीट
गाली निषादाची खळी
धुंद गंधाराचा गंध
शोभे षड्ज सोनसळी >>

..... प्रसन्न प्रसन्न. व्वा व्वा श्रीरंग ....
सा रे ग प ध सां .....

धन्यवाद वैभव.

यमन खूप गोड राग आहे. मन प्रसन्न करणारा राग आहे. आपण रोज ऐकतो त्यातली कितीतरी गाणी याच रागावरची आहेत. गझल,भक्तीसंगीत,चित्रपट गीते अशा कितीतरी रुपात यमन भेटत असतो. तेच शब्दात मांडण्याचा हा लहानसा प्रयत्न.

रंजीशी सही -- यमन
घरसे निकलते ही -- यमन
भय इथले संपत नाही -- यमन
श्री राम चंद्र कृपाळू -- यमन
मागे उभा मंगेश -- यमन
देवाघरचे ज्ञात कुणाला - यमन
पराधीन आहे जगती - यमन

आणि अशी कितीतरी गाणी…

अतीशय प्रासादिक आणी मनापासून आलेलं काव्य...मस्त एकदम

आणी यमन जिवापाड अवडतो,म्हणून ही आमच्या कडून यमनांची भेट

निगाहें मिलाने को जी चाहता है...

आंसू भरीं है..ये जीवन की राहे...

जेथे सागर धरणी मिळते..

जाता है तु कंहां...रे बाबा जाता है तुं कंहां...

तुम दिल की धडकन मै रहेते हो...रेहेते हो...

शाहीदी-राशिदी यमन? >>>> बहुतेक शाहिदभाईंनी (उ. शाहिद परवेझ) वाजवलेला व राशिदभाईंनी ( उ. राशीद खान) गायलेला म्हणायचे असेल ....

वाह! छान Happy अजून यमनाशी गाठ घडली नाहीये (शिकतांना), तेव्हा त्याचे आरोह अवरोह आणी चलन कुणी शिकवले तर कवितेची गोडी वाढेलच Happy

शाहीदी-राशिदी यमन? >>>> बहुतेक शाहिदभाईंनी (उ. शाहिद परवेझ) वाजवलेला व राशिदभाईंनी ( उ. राशीद खान) गायलेला म्हणायचे असेल .... >>>
Right on . . अगदी हेच म्हणायचं होतं . . दोघांचाही यमन मला खूप आवडतो .

खूप सुंदर कवितीक परिचय यमनाच्या रूपांचा.(ही रचनाही यमनात गाता येईल का ?)
अजून राग-रंग येऊ द्यात श्रीयू..

धन्यवाद भारती ताई. बर्याच दिवसांनी सुचलेली ही पहिलीच कविता.
मायबोली वरील सगळ्या रसिकांचे आभार.