केवढा घेतोस मोठा घास बाळा!

Submitted by कर्दनकाळ on 24 April, 2013 - 11:18

केवढा घेतोस मोठा घास बाळा!
काय वय, अन् काय हा भलताच चाळा!!

जिंदगी आ वासुनी बघते तुझीही......
लावतो तुझियाच तू प्रगतीस टाळा!

वांझ शब्दांचीच आहे रोषणाई!
गझल कोठे? फक्त गझलांचा धुराळा!!

कोणती नस तोडली गेली कळेना.....
कैक लोकांना किती आला उमाळा!

ह्या दिलाशांची, खुलाशांचीच भीती!
बेगडी जग, बेगडी त्यांचा जिव्हाळा!!

पिंड माझा अन् तुझा आहे निराळा!
व्हायचो तुजसम न मी नामानिराळा!!

झाकुनी एकास दुस-या दाखवावे!
सारखा वाटे उन्हाळा, पावसाळा!!

पावसानेही किती अंगांग पोळे!
त्या उन्हापेक्षा सवाई पावसाळा!!

वाटते बरसात हल्ली जीवघेणी!
दे मला तू आज त्यापेक्षा उन्हाळा!!

चार थेंबांना कसा मोताद झालो?
बरसला तुझिया कृपेचा मेघ काळा!

सांग वागावे कसे वागू नये ते!
ताप होतो, नियम पाळा वा न पाळा!!

ओठ हे मी टाचले माझे अखेरी....
का उगा मुख आपले आपण विटाळा?

भुंकणे सोडा तुम्ही श्वानाप्रमाणे!
वाघ, सिंहांसारखे आता पिसाळा!!

ऐट अन् भपका तुम्हा लखलाभ तुमचा!
मी बरा आहे, जसा आहे गबाळा!!!

पाहिजे तेथे फणा काढा खुबीने!
पाहिजे तेथे शिताफीने मवाळा!!

नाटके करतात, ती नुसती निहाळा!
तोतयांना योग्य वेळेला पिटाळा!!

बोलणे घेऊ नये त्याचे मनावर!
चाड ज्ञानाची, वयाची ना टवाळा!!

शायरी माझी कशी त्यांना रुचावी?
बाज माझा आणि त्यांचा निरनिराळा!

********************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद किरण!
गझलगौरवोद्गाराबद्दल!
काहींना कितपत सोसेल/रुचेल माहीत नाही!

<<<पावसानेही किती अंगांग पोळे!
त्या उन्हापेक्षा सवाई पावसाळा!!

वाटते बरसात हल्ली जीवघेणी!
दे मला तू आज त्यापेक्षा उन्हाळा!!>>> दोघांमध्ये एकच खयालाची पुनरावृत्ती झालीये असं नाही वाटंत का? त्यापेक्षा एक शेर हिवाळ्यावर करायला हवा, वै.म. कृ.गै.स.न.

माफ करा सर. मघाशी हीच गझल कुठलाही एक संदर्भ नसल्याने आवडली. मतल्यातील किंवा कुठल्याही शेरातील व्यक्ती कोण हा गौण मुद्दा असावा असं माझ़ मत आहे.
(मी सर्वांच्याच गझला यथाशक्ती पाहतो. आवडली तर आनंद घेतो, गझल/ कविता कुणाची आहे हा मुद्दाही गौण ! )

किरण अरे थट्टा केली बाळा! आमच्या मनात कोणीही नव्हते! विश्वात्मक होणे हे कामयाब काव्याचे प्रमुख लक्षण असते! काव्यातून कवी बाजूलाच जायला हवा या मताचे आम्ही आहोत!

हर्षल, हा घे हिवाळ्याचा शेर खास तुझ्या आग्रहास्तव, तुला सस्नेह भेट आमच्याकडून........

याद सुद्धा गोठली आहे तुझी ती!
सोसवेना का मला यंदा हिवाळा?...............इति कर्दनकाळ

<<< कूट प्रश्न ........................
मतल्यातली भलताच चाळा लागलेली आसामी कोण असावी? >>>

ह.भा.शिंदे