तव विरहाच्या ग्रीष्मझळा

Submitted by भारती.. on 20 April, 2013 - 04:22

तव विरहाच्या ग्रीष्मझळा

तव विरहाच्या ग्रीष्मझळा
वना वेढती घननीळा
शांतव धेनू तुझ्या अता
वाजव पावा गोपाळा

भोळी गोपांची बाळे
तुझ्यासवे त्यांचे खेळे
रानभरी झाली देवा
तुला शोधता वेल्हाळा

असा तुझ्यावर जीव जडे
चित्त दुभंगे दोहीकडे
वंशवनाच्या एकांती
कुणी वाहवी नेत्रजळा

कुठे श्रीहरी लपलासी
कुठे दुर्गमी वसलासी
.. सुहृदांशी ऐसी दूरी
काय म्हणावे तुझ्या छळा

भारती बिर्जे डिग्गीकर
https://www.youtube.com/watch?v=J8kxyppgalg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !
असा तुझ्यावर जीव जडे
चित्त दुभंगे दोहीकडे
वंशवनाच्या एकांती
कुणी वाहवी नेत्रजळा>>>
'वंशवन' खूप आवडला

नेहमीप्रमाणेच सर्वांगसुंदर कविता!

असा तुझ्यावर जीव जडे
चित्त दुभंगे दोहीकडे
वंशवनाच्या एकांती
कुणी वाहवी नेत्रजळा ...

वा सुंदर कविता

धन्स सुशांत,शशांकजी,जो एस..
वंशवन खरेच विशेष आहे.. ते बांबूचं बेट आहे तसंच जणू मानववंशाचंही मूळस्थान. .. त्याच्या एकांतातच नेत्रजळ वाहवू शकते ती कुणी एकजण ,दुभंग चित्ताने.

सुरेख !!

भारतीताई तुमच्या कवितेच वैशिष्ट्य म्हणजे अनोखी शब्दकळा असूनही कविता लगेच समजते

ही पण आवडली

जिवाला भूल पाडणारी कविता

वंशवनासोबतच रानभरी हा शब्दही आवडला

चित्त दुभंगे दोहिकडे>>>>>>> चरमोत्कर्षबिंदू!!!!!

बेहद्द आवडली

खूप खूप धन्यवाद या कवितेसाठी

आभार सर्व आत्मीयांचे.
एक करावा वाटतो असा उल्लेख 'धेनूं''चा, गो-पाळाच्या या गायी म्हणजे इंद्रियांच्या भांबावलेल्या चित्तवृत्ती याचे भान लिहिताना होते..
ही रचना एका घाईघाईने बसवलेल्या कार्यक्रमात गायलीही गेलीय.बर्‍याचशा त्रुटींसह, पण देतेच इथे..
(संपादित करून लिंक टाकलीय मूळ कवितेत.)

असा तुझ्यावर जीव जडे
चित्त दुभंगे दोहीकडे
वंशवनाच्या एकांती
कुणी वाहवी नेत्रजळा

कविता आवडली.