फक्त ठरतो पूज्य येथे यादवीचा चेहरा...!

Submitted by सुशांत खुरसाले on 19 April, 2013 - 01:51

का मना भुललास पाहुन त्या कळीचा चेहरा?
निर्दयी प्रत्येक आहे या जगीचा चेहरा !

पाहुनी बहरास सारे मुग्ध व्हाया लागती
पण बरे विसरून जाती पालवीचा चेहरा..?

चेहरे घेऊन आता शब्दसुद्धा नांदती
सभ्यतेचा एक अन् दुसरा शिवीचा चेहरा!

तोच आहे घोष आणिक पालखीही तीच पण
राहिला नाही विठू त्या पालखीचा चेहरा!

देश हा आहे असा की शांतता नाकारतो
फक्त ठरतो पूज्य येथे यादवीचा चेहरा..!

नेमका आहे कसा तो सांग मज आतातरी
रोज जो अंधार करतो त्या रवीचा चेहरा..

रे 'सुशांता' व्यक्त व्हाया लाख तुजला चेहरे
पण तुला का पाहिजे आहे कवीचा चेहरा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन सुशांतजी! सुंदर गझल!

पाहुनी बहरास सारे मुग्ध व्हाया लागती
पण बरे विसरून जाती पालवीचा चेहरा..?

चेहरे घेऊन आता शब्दसुद्धा नांदती
सभ्यतेचा एक अन् दुसरा शिवीचा चेहरा!

तोच आहे घोष आणिक पालखीही तीच पण
राहिला नाही विठू त्या पालखीचा चेहरा!

देश हा आहे असा की शांतता नाकारतो
फक्त ठरतो पूज्य येथे यादवीचा चेहरा..!

नेमका आहे कसा तो सांग मज आतातरी
रोज जो अंधार करतो त्या रवीचा चेहरा..

रे 'सुशांता' व्यक्त व्हाया लाख तुजला चेहरे
पण तुला का पाहिजे आहे कवीचा चेहरा?

अप्रतिम, कामयाब व सुंदर शेर!
अभिनंदन सुशांत!

मतला थोडा बदलायला हवा.............

एक मतला आम्हास सुचला पहा कसा वाटतो ते............हा तुमच्या मतल्याला पर्यायी शेर नव्हे!

का मना भुललास बघुनी भोवतीचा चेहरा?
निर्दयी, निष्ठूर असतो, वळचणीचा चेहरा!..........इति कर्दनकाळ!

तुमच्या गझललेखनास कर्दनकाळाच्या हार्दिक शुभेच्छा! जोमाने व असेच चव घेत घेत लिहा!

************कर्दनकाळ

मनापासून आभार कर्दनकाळजी!
मतल्याबाबत तुमचा उला मिसरा चांगला वाटतोय..
बघतो अजून काही सुचतेय का....

आपणही विठ्ठलाच्या मागे लागलात वाटते...>>>नाही हो विठूनेच आम्हाला लळा लावलाय..एखादा दुसरा शेर सुचला तर लिहितो त्याच्यावरचा..
बेफिजींचा तो सुंदर शेर वाचलात का?

भाबडा ओवीतुनी रांगायचा
झिंगतो गझलेमधे विठ्ठल अता

सर्वांचे आभार!

देश हा आहे असा की शांतता नाकारतो
फक्त ठरतो पुज्य येथे यादवीचा चेहरा..!
<<
तुम्हाला पूज्य अभिप्रेत आहे का?
कवितेत शुद्धलेखनाच्या सवलती घेतात वगैरे ऐकून आहे, पण इथे पहिला उकार केल्यावर अर्थच बदलतो.

ओ हो ...दुरूस्त केलेय..सॉरी!
लक्षात आणून दिल्याबद्दल आभार!

खुरसाले , बेफीजींचा अजून एक विठ्ठलाचा शेर आहे तो वाचलात का

अर्ज दरवर्षी कराया लोक नेती पालख्या
विठ्ठलाला सांगती की पंढरी सोडून दे

सर्वांचे आभार!

>>>>खुरसाले , बेफीजींचा अजून एक विठ्ठलाचा शेर
आहे तो वाचलात का
अर्ज दरवर्षी कराया लोक नेती पालख्या
विठ्ठलाला सांगती की पंढरी सोडून दे>>>>>
हो हो वाचला होता ..त्या गझलेतला अजून एक शेर फार आवडला होता

कान राधेचे कुठे पळतात का खोटारड्या
धर्म दे स्थापून आता बासरी सोडून दे

रे 'सुशांता' व्यक्त व्हाया लाख तुजला चेहरे
पण तुला का पाहिजे आहे कवीचा चेहरा?

हा शेर फार फार आवडलाय